ऐंशी वर्षांचे आजोबा पुन्हा एक वर्षाचे झाले; कसे ? वाचा ही बोधकथा!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 23, 2021 08:32 PM2021-01-23T20:32:40+5:302021-01-23T20:33:05+5:30
आयुष्याचे ध्येय कळत नाही, तोपर्यंत आपण जिवंत असतो, परंतु आयुष्याचा अर्थ कळला की आपण जगायला लागतो. जिवंत असणे आणि जगणे या दोहोत नेमका फरक काय आहे, त्याचा उलगडा या बोधकथेतून होईल.
एकदा एक ब्रह्मज्ञानी संत महात्मा एका गावात आले होते. त्यांच्या दर्शनासाठी अनेक भाविक सज्जन जमले. संत महात्म्यांकडून त्यांनी ब्रह्मज्ञानाची प्राप्ती केली. त्या भाविक सज्जनांमध्ये एक ऐंशी वर्षांचे म्हातारे गृहस्थ होते. त्यांनी संत महात्म्यांना घरी चरण लावण्याबद्दल विनंती केली. महात्म्यांनी पुढच्या वर्षी याच दिवशी नक्की येईन असे आश्वासन दिले. म्हातारे बाबा खूपच आनंदित झाले.
पाहता पाहता वर्ष संपले. दिलेलेल्या शब्दाप्रमाणे संत महात्मा त्या म्हाताऱ्या बाबांकडे आले. संत महात्म्यांच्या आगमनाने त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांनी स्वागताची सर्व तयारी करून ठेवली होती. म्हातारपणामुळे त्यांचे हातपाय थरथरत होेते पण त्या दिवशी त्यांच्यामध्ये कमालीचा आनंद आणि उत्साह संचारला होता.
प्रसन्न होत महात्म्यांनी विचारले, 'बाबा तुमचे वय काय'
बाबा म्हणाले, 'एक वर्ष'
महात्म्यांनी विचारले, 'ते कसे काय?'
बाबा म्हणाले, 'माझे सारे आयुष्य मी प्रपंचात, मोह मायेत घालवले. परंतु गेल्यावर्षी याच दिवशी आपण ब्रह्मज्ञान देऊन या मायेतून सोडवले. मला नवीन जन्म मिळाला. जोपर्यंत मी ईश्वरापासून दूर होतो, तोपर्यंत माझे आयुष्य फुकट गेले. ज्याक्षणी तुम्ही मला ईश्वराशी जोडले, त्यादिवसापासून माझा जन्म सार्थकी लागला. म्हणून माझे खरे वय एकच वर्षे आहे.'
पुन्हा इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर महात्म्यांनी विचारले, `बाबा, तुम्हाला मुले किती? तुमच्या परिवारात सदस्य किती?'
बाबा म्हणाले, 'महात्माजी, मला एकच मुलगा आहे आणि परिवारातील सदस्य विचाराल, तर तुमच्या सहवासात आहेत, तेवढे सदस्य माझ्या परिवारात आहेत.'
'बाबा, तुम्हाला तीन मुले आहेत ना?' महात्माजी म्हणाले.
'होय, त्यातली दोन मायेची आहेत. हा एकच माझा खरा पुत्र! तुमच्यासारखी महान विभूती घरी येणार असूनही दोघे पुत्र दुकानदारी सोडून आले नाहीत. त्यांना संतसेवेपेक्षा धन दौलत महत्त्वाची वाटते. पण हा माझा पुत्र सगळ्या अडचणी बाजूला ठेवून संतसेवेसाठी धावत आला. संतसेवेसाठी जो पुढे येईल, तोच माझा आहे.'
'बरं, तुमची धन दौलत संपत्ती किती आहे?' महात्म्यांनी पुढचा प्रश्न विचारला.
'माझ्याजवळ धन दौलत संपत्ती करोडो रुपये आहेत असे लोक म्हणतात. पण आतापर्यंत संतसेवेत जेवढे धन मी खर्च केले, तेवढेच माझे होते. ज्या धनाचा उपयोग सेवेसाठी होत नाही, ते धन असून काय उपयोग?'
म्हाताऱ्या बाबांचे ते विचार आणि त्यांना आलेली समज पाहून संत महात्मा प्रसन्न झाले.
जीवनात सद्गुरू लाभल्याशिवाय सत्य असत्याची समज येत नाही. ईश्वराची ओळख झाल्यानंतरच जीवन जगण्याचा खरा अर्थ समजू लागतो.