Eknath Shashthi 2022: आषाढी वारीइतकाच रंगतदार असतो पैठणचा तीन दिवसीय एकनाथ षष्ठी सोहळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 05:04 PM2022-03-22T17:04:48+5:302022-03-22T17:30:48+5:30

Eknath Shashthi 2022: २३ मार्च रोजी एकनाथ षष्ठी आहे. तिथून तीन दिवस हा उत्सव साजरा होतो आणि तो बघायला देशा-विदेशातून पर्यटक येतात.

Eknath Shashthi 2022: Paithan's three-day Eknath Shasthi ceremony is as colorful as Ashadhi Wari! | Eknath Shashthi 2022: आषाढी वारीइतकाच रंगतदार असतो पैठणचा तीन दिवसीय एकनाथ षष्ठी सोहळा!

Eknath Shashthi 2022: आषाढी वारीइतकाच रंगतदार असतो पैठणचा तीन दिवसीय एकनाथ षष्ठी सोहळा!

googlenewsNext

श्रीएकनाथष्ठी हा दिवस महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर श्रीएकनाथमहाराज जलसमाधी दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. विशेषत: पैठणमध्ये सहा ते सात लाख भाविक ह्या सोहळ्यास उपस्थित असतात.पैठण येथील नाथषष्ठीची वारी वारकरी संप्रदायातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी असून पंढरपुरच्या आषाढी वारी नंतर ह्या वारीस मोठया प्रमाणावर वारकरी समाज एकत्रित होतो. विविध ठिकाणांहून आलेल्या ४७५ दिंडया, "भानुदास-एकनाथ" चा गजर हयामुळे संपूर्ण परिसर न्हाऊन निघतो.

फाल्गून वद्य षष्ठी, सप्तमी व अष्टमी (साधारणत: मार्च महिना) ह्या दिवसांत हा उत्सव साजरा करण्यात येतो. द्वितीयेस गावातील नाथमंदिरातील रांजणाच्या पूजेनं उत्सवाची सुरूवात होते. द्वितीया ते पंचमीपर्यन्त श्रीकेशवस्वामीकृत नाथ चरित्राचे पारायण करण्यात येते. पंचमीच्या दिवशी मानकऱ्यांना उत्सवाचे आमंत्रण दिले जाते.

षष्ठी - षष्ठीच्या दिवशी पहाटे २ वाजता श्रीविजयी पांडुरंगाच्या मूर्तीस महाभिषेक करण्यात येतो. नाथवंशजांची मानाची पहिली दिंडी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गावातील मंदिरातून श्रीएकनाथमहाराजांच्या समाधी मंदिराकडे प्रस्थान करते. मंदिरात नाथवंशजांच्या वतीने वारकरी व हरिदासी कीर्तने करण्यात येतात. गावातील मंदिरात परतल्यानंतर आरती होते. सोहळ्यासाठी आलेल्या सर्व दिंडया नगर प्रदक्षिणा करुन गोदाकाठी आपापल्या फडात/मठात विसावतात.

सप्तमी - सप्तमीच्या दिवशी रात्री १२ वाजता नाथांच्या पादुकांची गावातून मिरवणूक काढण्यात येते. त्यास छबिना असे म्हणतात. पहाटेच्या सुमारास पालखी वाळवंटात आल्यानंतर पादुकांना गोदास्नान घालण्यात येते, भारुड सादर केली जातात. सकाळी ७ वाजेच्या सुमारास पालखी गावातील मंदिरात येते. वारकऱ्यांच्या फडांमध्ये भजन कीर्तनादींचे आयोजन करण्यात येते. वाळवंटात कीर्तन ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी जमते.

अष्टमी - अष्टमीच्या दिवशी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास गावातील नाथमंदिरातून काला दिंडी निघते. उदासीमठाजवळील पायऱ्यांवर पावल्या खेळण्यात येतात. हे दृश्य आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी हजारोंचा समुदाय येथे उपस्थित असतो. समाधी मंदिरात पोचल्यानंतर मंदिराच्या समोरील पटांगणावर टाळमृदुंगाच्या गजरात शेकडो भाविक पावल्या खेळण्यात तल्लिन होऊन जातात. मंदिराच्या बाजूस उंच ठिकाणी गुळ आणि लाह्या यांचे मोठेमोठे लाडू आकर्षकरित्या बांधण्यात येतात.

त्याच्या मध्यभागी काला भरलेली हंडी लटकविलेली असते. सूर्यास्तासमयी ’दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ’ च्या जयघोषात नाथवंशजांकडून काठीच्या सहाय्याने ती हंडी फोडण्यात येते. प्रसाद मिळविण्यासाठी भाविकांची झुंबड उडते. परंपरेचे अभंग, गौळणी, आरती झाल्यानंतर गोदावरीच्या वाळवंटात काला वाटण्यात येतो. या तीनही दिवसांमध्ये श्रीएकनाथमहाराजांच्या पैठणकर फडातील हजारो वारकरी दिंडीत सहभागी होत असतात. शिवाय इतरही दिंड्‍या आपआपल्या पध्दतीनं सोहळ्याचा आनंद लुटतात. सद्यस्थितीत पैठण येथे सोहळ्यास येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खान्देश आदी ठिकाणांहून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे तसेच कोकण, मुंबई, कर्नाटक आदी परिसरातून दिंडया घेवून येण्यासाठी भाविक उत्सुक असल्याने येथे वारकऱ्यांची नव्यानेच भर पडत आहे. नाथषष्ठी हा उत्सव विदेशी लोकांच्याही आकर्षणाचा विषय बनला असुन अनेक विदेशी पर्यटक सोहळा पाहण्यासाठी पैठणास येतात.

उत्सवाचा इतिहास - फाल्गुन वद्य षष्ठी ह्या दिवशी पाच घटना घडल्याने त्यांना पंचपर्वश्रेणी असं म्हणतात. नाथ स्वत: आपल्या गुरुंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून यादिवशी उत्सव साजरा करीत. पुढे नाथांनीही ह्याच दिवशी जलसमाधी घेतल्याने श्रीएकनाथषष्ठी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला.

माहिती स्रोत : शांतीब्रह्म श्री एकनाथमहाराज मिशन, भ्रमणध्वनी : ९४२१४१११३५
https://santeknath.org/

Web Title: Eknath Shashthi 2022: Paithan's three-day Eknath Shasthi ceremony is as colorful as Ashadhi Wari!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.