प्रभू श्रीरामचंद्रांनीदेखील लंकेवर आक्रमणापूर्वी केले होते 'विजया' एकादशीचे व्रत!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: March 8, 2021 10:00 AM2021-03-08T10:00:00+5:302021-03-08T04:30:02+5:30
इथे काही जण प्रश्न उपस्थित करतील, की व्रत करून का लढाई जिंकता येते? नक्कीच नाही. परंतु आपल्या प्रयत्नांना उपासनेचे बळ असावे लागते. व्रत-वैकल्यातून ते बळ आपल्याला मिळते.
माघ कृष्ण एकादशीला 'विजया' एकादशी म्हणून संबोधले जाते. या एकादशीचे व्रत केल्याने जय प्राप्त होतो. प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा नाश करण्यासाठी लंकेवर केलेल्या स्वारीमध्ये जय प्राप्त व्हावा म्हणून बक दाल्भ्य ऋषींच्या सांगण्यानुसार समुद्राच्याकाठी हे व्रत वानरसेनेसह केले होते. परिणामी या व्रताच्या पुण्यप्रभावामुळे रावणासह असंख्य राक्षसांचा वध होऊन प्रभू श्रीरामचंद्रांचा विजय झाला होता. यंदा मंगळवारी अर्थात ९ मार्च रोजी विजया एकादशी आहे.
एकादशी ही भगवान विष्णूंची प्रिय तिथी आहे. त्यांची कृपादृष्टी व्हावी, आपल्या हातून उपासना घडावी, व्रतामध्ये सातत्य राहावे, यासाठी अनेक जण श्रद्धेने महिन्यातून दोनदा येणाऱ्या एकादशीचा उपास करतात. हा उपास इतर उपासासारखा एक वेळ किंवा एकभुक्त नसून दोन्ही वेळेस फलाहार करून किंवा काहीही न खाता करायचा असतो. आपल्या शारीरिक गरजा न थांबणाऱ्या आहेत. त्यावर नियंत्रण मिळवणे, मनावर ताबा मिळवणे आणि मन सन्मार्गी लावणे, हा एकादशी व्रताचा मुख्य हेतू असतो. जेव्हा आपण देहाची आसक्ती कमी करू, तेव्हाच आपल्या हातून हरीनाम घडू शकेल. यासाठी एकादशी व्रताची आखणी केली आहे.
विजया एकादशीबाबत म्हणायचे, तर प्रभू रामचंद्रांनी हे व्रत केल्यामुळे तिचे महत्त्व अधिकच वाढले आहे. इथे काही जण प्रश्न उपस्थित करतील, की व्रत करून का लढाई जिंकता येते? नक्कीच नाही. परंतु आपल्या प्रयत्नांना उपासनेचे बळ असावे लागते. व्रत-वैकल्यातून ते बळ आपल्याला मिळते.
सध्याच्या जीवघेण्या स्पर्धात्मक युगात प्रत्येकाला आपल्या कामात विजय हवा असतो. या विजया एकादशी व्रताने जसा रामाला रावणाशी केलेल्या युद्धात विजय मिळाला, तसा आपल्यालाही मिळेल अशा केवळ मानसिक बळानेही आपल्याला मोठा आधार वाटेल. मनोबलाच्या आधारेच तर आपण प्रतिकू लतेवर जय मिळवू शकतो. प्रयत्न करण्यासाठी ज्या मानसिक आधाराची गरज असते, तो ह्या व्रताने नक्कीच मिळू शकेल. मन:शांती, ताणतणावर कमी करण्यासाठी अशी व्रते फार उपयोगी ठरतात.