प्रत्येक कृती ही योगच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 06:24 AM2020-07-08T06:24:29+5:302020-07-08T06:24:47+5:30

योग म्हणजे एखादा विशिष्ट सराव किंवा अंग वेडेवाकडे पिळणे नव्हे. तुमच्या सर्वोच्च स्वरूपात सिद्ध होण्यासाठी जी काही कृती किंवा पद्धत तुम्ही अवलंबता तिला ‘योग’ असे म्हणतात.

Every action is right | प्रत्येक कृती ही योगच

प्रत्येक कृती ही योगच

googlenewsNext

- सद्गुरू जग्गी वासुदेव

योग म्हणजे एखादा विशिष्ट सराव किंवा अंग वेडेवाकडे पिळणे नव्हे. तुमच्या सर्वोच्च स्वरूपात सिद्ध होण्यासाठी जी काही कृती किंवा पद्धत तुम्ही अवलंबता तिला ‘योग’ असे म्हणतात. तुम्ही वापरत असलेल्या या तंत्रज्ञानाला योग म्हटले जाते. प्रत्येक व्यक्ती भिन्न-भिन्न मार्गांनी नकळतपणे योगाचा वापर करत असते. तुम्ही सिनेमाला जाता, तेव्हा तुम्ही एकप्रकारचा योगच करत असता. कारण त्या ठिकाणी तुम्ही बसून एकटक, संपूर्ण एकाग्र होऊन चित्रपट पाहता. त्याला धारणा म्हणतात आणि हे योगाचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे, पण तो आवश्यक त्या जागरूकतेशिवाय आणि त्यासाठी लागणाऱ्या व्यवस्थेशिवाय; पद्धतशीरपणाच्या अभावाने घडत असते आणि म्हणूनच हा ढोबळ प्रकारचा योग आहे. त्याचप्रमाणे, एका सुंदर फुलाकडे पाहूनसुद्धा तुम्ही आनंदी होऊ शकता. जेव्हा तुम्ही त्या फुलाकडे पाहिलंत, तेव्हा तुम्ही काहीतरी आत्मसात केलंत, काहीतरी सामावून घेतलंत, तुम्ही त्यात सामावून गेलात; समरस झालात, आणि तुम्ही अतिशय आनंदी झालात. तुमच्याबाबत तसे घडले कारण किंचित योग घडला आणि तुम्ही त्या फुलाला तुमचाच एक अविभाज्य घटक आहे असं अनुभवलंत. ‘योग’ शब्दाचा शब्दश: अर्थ म्हणजे ‘मिलन’ किंवा ‘ऐक्य’; अर्थात संपूर्ण सृष्टीशी एकरूप होणे असा आहे म्हणून काहीशा छोट्या प्रमाणात, त्या फुलाला तुम्ही तुमचाच एक अविभाज्य घटक बनवलंत. तिथे दोघं होते, आणि ते एक झाले. योग घडला पण तो ढोबळ स्वरूपात घडला. आयुष्याच्या प्रत्येक बाबतीत तुमचा श्वास, तुमचे चालणे, तुमची कार्यकृती या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही एकप्रकारे योगच करत असता. पण तो योग्य त्या जाणीवेशिवाय आणि ढोबळ स्वरु पात घडत असतो. योग म्हणजे त्या सर्व गोष्टींना एक व्यवस्थित, सुसंगत स्वरूप देणे, जेणेकरून तुम्हाला एका विशिष्ट दिशेने वाटचाल करायची आहे हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवून, प्रत्येक गोष्ट हाताळाल.

Web Title: Every action is right

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.