हिरा सगळ्यांनाच आवडतो, पण त्याचा खरा गुणधर्म कोणता ते माहितीय? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 03:13 PM2022-03-23T15:13:50+5:302022-03-23T15:14:12+5:30

चकाकणारी प्रत्येक गोष्टच मौल्यवान नसते. वस्तूचे मूल्य वाढते ते त्याच्या गुणधर्मामुळे. हिऱ्याचे गुणधर्म जाणून घेऊ!

Everyone loves a diamond, but who knows what its true properties are? Find out! | हिरा सगळ्यांनाच आवडतो, पण त्याचा खरा गुणधर्म कोणता ते माहितीय? जाणून घ्या!

हिरा सगळ्यांनाच आवडतो, पण त्याचा खरा गुणधर्म कोणता ते माहितीय? जाणून घ्या!

googlenewsNext

एका राजाचा दरबार भरला होता. प्रत्येक जण आपापली फिर्याद घेऊन राजासमोर येत होते. राजा त्यांच्या प्रश्नांचे निवारण करत होता. अशातच एक व्यापारी राजासमोर आला आणि भरदरबारात म्हणाला, 'राजा, माझ्याकडे दोन हिरे आहेत. त्यात एक खरा आहे आणि दुसरा खोटा. यातला खर हिरा, जर तुमच्या राज्यातल्या बुद्धीमान व्यक्तीने ओळखला, तर तो तुमच्या सरकारीतिजोरीत जमा होईल आणि हिरा ओळखता आला नाही, तर तुम्ही हिऱ्याची रक्कम मला देऊ कराल. मंजूर आहे?'

राजाने दरबारात नजर फिरवली आणि सर्वांच्या चेहऱ्यावरचे कुतुहल पाहत आव्हान स्वीकारले. त्या व्यक्तीने दोन मंचकावर दोन हिरे ठेवले आणि राजाच्या अनुमतीने प्रत्येकाला परीक्षण करण्याची संधी दिली. काही जणांनी पुढाकार घेतला. हिऱ्याची पारख केली. परंतु असली-नकलीचा भेद त्यांना करता आला नाही. मंत्र्यांना घाम फुटला. हिरा ओळखता आला तर ठिक, नाहीतर हिऱ्याची रक्कम अदा करण्याचे खापर आपल्या डोक्यावर फुटायचे. या विचाराने त्यांनी माघार घेतली. 

कोणीच उत्तर देत नाही पाहून राजाने स्वत: परीक्षण करायचे ठरवले. तेवढ्यात त्याला सेवकांकडून निरोप आला. त्याच्याच राज्यातली एक अंध व्यक्ती हिरा ओळखून दाखवणार असे म्हणाली. राजाने त्या व्यक्तीला संधी द्यायची ठरवली. अंध व्यक्तीने राजाला अट घातली, हे परीक्षण मी दरबाराबाहेर खुल्या आसमंताखाली करू इच्छितो. हिऱ्याच्या व्यापाऱ्याने आणि राजाने दोघांनी अनुमती दिली.  

टळटळीत दुपार होती. परीक्षण करणारी व्यक्त अंध होती. तिच्यासाठी उजेड आणि अंधार दोन्ही समान असताना तिने हा हट्ट का केला असावे, याचा विचार राजाच्या मनात घोळत होता. दरबारबाहेर खुल्या प्रांगणात दोन मंचकावर दोन हिरे ठेवण्यात आले. काही वेळाने अंध व्यक्तीने हातात हिरा घेत म्हटले, 'हा आहे असली हिरा'. व्यापारी चक्रावला. जो भेद डोळस करू शकले नाही, तो अंध व्यक्तीने ओळखला. शब्द दिल्याप्रमाणे व्यापाऱ्याने तो हिरा राजाच्या हाती सुपूर्द केला. सर्वांना आनंद झाला. 

राजाने अंध व्यक्तीचा यथोचित सन्मान केला आणि हिऱ्याची पारख कशी केली, ते विचारले. अंध व्यक्ती म्हणाली, 'राजा, दरबारातल्या शांत शितल वातावरणात हिऱ्याची पारख करता आली नसती. उन्हात नेल्यामुळे सूर्यप्रकाशात काचेचा हिरा चटकन तापला परंतु खरा हिरा थंड राहिला. यावरून खऱ्या हिऱ्याची मी पारख केली.'

तात्पर्य, कठीण काळात जो तडकतो, ती काच असते आणि जो थंड राहून चकाकत राहतो, तो हिरा असतो. हिऱ्याकडून ही शिकवण घेण्यासारखी आहे. प्रतिकूल परिस्थितीतही शांत, थंड आणि लखलखत राहता आले पाहिजे. तसे करणाऱ्या व्यक्तीलाच हिऱ्याची शान आणि हिऱ्याचा मान मिळतो.

Web Title: Everyone loves a diamond, but who knows what its true properties are? Find out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.