अपेक्षा हे दु:खाचे मूळ आहे; ते समूळ नष्ट कसे करता येईल, पहा! -गौर गोपाल दास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 03:41 PM2021-07-13T15:41:09+5:302021-07-13T15:42:13+5:30
जोवर आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा करत राहू तोवर आपण दु:खीच राहणार आहोत.
अपेक्षा ठेवली की उपेक्षा पदरात येते, हे माहीत असूनसुद्धा आपण पदोपदी अपेक्षांचे ओझे वाहत असतो. कोणी कसे वागावे, कोणाशी कसे बोलावे, कोणी आपल्याशी कसे बोलावे, आपल्याला काय आवडेल असे करावे? अशा सगळ्या गोष्टींचे वलय एका जागी येऊन थांबते, ते म्हणजे मी. आपल्या अपेक्षा या केवळ एका बाजूने केलेल्या विचारावर अवलंबून असतात.
वास्तविक पाहता कोणी कसे वागावे हे आपण ठरवू शकत नाही. आपण कसे वागावे हे मात्र आपण ठरवू शकतो. जोवर आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा करत राहू तोवर आपण दु:खीच राहणार आहोत. कारण आपले सुख दु:खाचे नियंत्रण आपण कळत नकळत दुसऱ्याच्या हाती सोपवतो. व्यक्ती, परिस्थिती आपल्या मतानुसार घडली, की आपण खुष आणि मनाविरुद्ध घडली, की आपण दु:खी!
जोपर्यंत आपण स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी स्वत:च्या अपेक्षांवर खरे उतरत नाही, तोवर आपण दुसऱ्यांवर सतत अवलंबून राहू. जगातली प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या आनंदाचा शोध घेत धडपडत आहे. तिने आपल्या आनंदासाठी झटावे ही अपेक्षा चुकीची आहे. म्हणून अपेक्षांचे दु:खं टाळायचे असेल, तर सर्वात आधी कोणी आपल्यासाठी काही करेल, केले पाहिजे, करत होते हा विषय टाळा. आपण आपल्यासाठी काय करू शकतो, स्वत:ला सुखी, आनंदी, समाधानी ठेवण्यासाठी आजवर आपण काय काय केले, याचे चिंतन होणे जरूरी आहे.
कोणी आपल्याला आनंदी ठेवणं, हे आपल्या हातात नाही,
परंतु दुसऱ्यांना हाती ठेवणं आपल्या हातात आहे.
कोणी आपल्याला मदत करेल, हे आपल्या हातात नाही,
परंतु, दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणं, आपल्या हातात आहे.
कोणी आपल्यावर प्रेम करावं, हे आपल्या हाती नाही,
परंतु दुसऱ्यांवर अकारण प्रेम करणं, हे आपल्या हातात आहे.
सुख देण्यात आहे. सुख मिळेल ही अपेक्षा दु:खंदायी आहे.म्हणून सुखाची अपेक्षा करत त्याच्या मागे धावू नका. सुख, आनंद, प्रोत्साहन इतरांना देत राहा, त्याचा आनंद तुम्हालाही नक्की मिळेल.फुलं देवाला वाहिली, तरीदेखील त्याचा परिमळ जसा आपल्या हाताला चिकटून राहतो, तसा सत्कर्माचा परिमळ आपल्या आयुष्यात सदैव दरवळत राहतो.