पेढा खाता खाता घ्या अध्यात्माची अनुभूती; कशी ते सांगताहेत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 06:29 PM2022-06-16T18:29:38+5:302022-06-16T18:30:00+5:30

पेढा कसा खाऊ हा प्रश्न पडत नाही ना, मग नाम कसे घेऊ हा प्रश्न का पडतो? - ब्रहचैतन्य गोंदवलेकार महाराज

Experience spirituality while eating pedha; learn from Brahmachaitanya Gondwalekar Maharaj! | पेढा खाता खाता घ्या अध्यात्माची अनुभूती; कशी ते सांगताहेत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज!

पेढा खाता खाता घ्या अध्यात्माची अनुभूती; कशी ते सांगताहेत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज!

googlenewsNext

देव आमच्या हाकेला कधीच धावून येत नाही. देव आमचे कधीच ऐकत नाही. देवाला आमची काळजीच नाही. अशा कितीतरी गोष्टींनी आपण देवाला बोल लावत असतो. परंतु, ज्यांच्या मदतीला देव धावून गेला, त्यांनी देवाला जशी आर्त साद घातली होती, तशी आपण आर्त हाक मारतो का? तर नाही. देवाचा आपल्याला आठव होतो, आपण आर्त हाकही मारतो, पण कधी? तर आपल्या संकटकाळी. ही स्वार्थी वृत्ती झाली. संत सांगतात, गरज पडल्यावर कोणीही गयावया करेल, परंतु गरज नसतानाही जो आर्त साद घालतो, त्याला खरे प्रेम म्हणावे आणि ते प्रेम जडण्याचे माध्यम आहे, हरीनाम!

ते कसे घ्यावे, असाही आपल्याला प्रश्न पडतो. याबाबत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात, 'नाम कसे घेऊ हे विचारणे, म्हणजे पेढा कसा खाऊ असे विचारण्यासारखे आहे. पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो. तसे नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करतेच करते. पेढा ज्याने खाल्ला आहे, तो पेढा कसा काऊ म्हणून जसे विचारत नाही, तसे नाम घेणारा माणूस नाम कसे घ्यावे हे विचारत नाही. बी शेतात पडते तेव्हा तिचे तोंड वरच्या बाजूला आहे की खाली, हे पाहत नाही. तो आपले काम करत राहतो. अंकुर आपला मार्ग स्वत: काढतो आणि आपली दिशा आपण ठरवतो.'

जितक्या सहजतेने आपण श्वसन करतो, तितक्या सहजतेने नाम घेतले पाहिजे. दमा झालेली व्यक्ती श्वास घेण्यासाठी कोणती दिशा योग्य हे विचारत नाही, तर आपल्यासाठी श्वसनाचा अनुकूल मार्ग शोधते. नाम घेणारी व्यक्तीदेखील श्वासागणिक नामाशी जोडली जाते आणि जेव्हा जेव्हा शक्य तेव्हा नाम घेत राहते. 

नामस्मरण करण्यासाठी ठराविक मुद्रा हवीच असेही नाही. गोंदवलेकर महाराज सांगतात, 'समजा, तुम्ही पद्मासन घालून नामस्मरणाला बसलात आणि काही वेळाने पाठीला रग लागली, तर नामाकडे कमी आणि देहाला होणाऱ्या यातनांकडे तुमचे लक्ष जाईल. नाम असे घ्यावे, जिथे देहाचा विसर पडेल.'

नाम कधी घ्यावे, कधी नाही, याबाबत बंधने आहेत का? तर नाही. कोणत्याही परिस्थितीत जितक्या सुलभतेने श्वसन सुरू असते, तितक्याच सुलभतेने नाम घेत राहावे. विटाळ देहाला असतो, मनाला नाही. सोहेर-सुतक देहाला असते, मनाला नाही. रोग-आजार देहाला असतात, मनाला नाही आणि नाम हे मनाने घ्यायचे आहे, देहाने नाही. मन हे आत्म्याशी जोडलेले असते, बुद्धी नाही. म्हणून आत्म्याचा आणि परमात्म्याचा संबंध जोडायचा असेल, तर नामरूपी पेढा खाताना विचार करू नका, त्याची गोडी चाखत राहा. 

Web Title: Experience spirituality while eating pedha; learn from Brahmachaitanya Gondwalekar Maharaj!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.