मराठी वर्षातील शेवटची पापमोचनी एकादशी: ‘असे’ करा व्रत पूजन; पाहा, कथा, महात्म्य अन् मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 10:06 IST2025-03-24T10:03:13+5:302025-03-24T10:06:06+5:30
Falgun Papmochani Ekadashi March 2025: मराठी वर्षातील शेवटच्या पापमोचनी एकादशीचे व्रत कसे करावे? जाणून घ्या...

मराठी वर्षातील शेवटची पापमोचनी एकादशी: ‘असे’ करा व्रत पूजन; पाहा, कथा, महात्म्य अन् मान्यता
Falgun Papmochani Ekadashi March 2025: मराठी वर्षाची सांगता आता जवळ आली आहे. ३० मार्च २०२५ रोजी गुढीपाडवा आहे. विश्वावसू नामक संवत्सर सुरू होणार आहे. हिंदू नववर्ष चैत्र महिन्यापासून विविध सण-उत्सव, व्रत-वैकल्यांचा शुभारंभ होणार आहे. परंतु, तत्पूर्वी फाल्गुन महिन्यात वद्य एकादशीला पापमोचनी एकादशी व्रत केले जाणार आहे. हिंदू नववर्षातील ही शेवटची एकादशी असून, या एकादशीचे महत्त्वही अनन्य साधारण असेच आहे. व्रत पूजाविधी, महत्त्व, महात्म्य आणि व्रतकथा जाणून घेऊया...
फाल्गुन महिना संपायला अवघे काही दिवस राहिले आहेत. चैत्राची चाहूल सर्वांना लागली आहे. फाल्गुन महिन्यातील वद्य एकादशीला पापमोचनी एकादशी म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार, या एकादशीच्या व्रतामुळे जन्मांतरीच्या पापांपासून मुक्ती मिळत असल्यामुळे याला पापमोचनी एकादशी असे म्हटले जाते. या एकादशीबाबत अनेक मान्यता आहेत. होळीनंतर येणाऱ्या या एकादशीला अनन्य महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंच्या चतुर्भुज रुपाची पूजा केली जाते. या दिवशी व्रत करणाऱ्यांनी श्रीमद्भागवताचे पठण केले पाहिजे, असे सांगितले जाते. पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्याला सकाळी आणि सायंकाळी धूप, दीप, नैवेद्य दाखवावा. या व्रताने मनोवांच्छित इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.
श्रीकृष्णाने अर्जुनाला पापमोचनी एकादशीच्या व्रताबाबत सांगितले
२५ मार्च २०२५ रोजी पापमोचनी स्मार्त एकादशी असून, २६ मार्च २०२५ रोजी भागवत एकादशी आहे. पापमोचनी एकादशीचे व्रत मनोभावे करावे. हे व्रत करणाऱ्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात, असे म्हटले जाते. श्रीकृष्णाने अर्जुनाला पापमोचनी एकादशीच्या व्रताबाबत सांगितले होते. या व्रतामुळे मनुष्याच्या मोक्षाची द्वारे खुली होतात, अशी मान्यता आहे. पापमोचनी एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी एकादशीला उपास करावा. सकाळी उठल्यानंतर स्वच्छ वस्त्रांनी या व्रताचा संकल्प करावा आणि पूजेची सर्व तयारी करावी. पूजेची तयारी करताना पंचामृत, फुले, अक्षता, धूप, दीप, नैवेद्य, तुळशीची पाने यांचा समावेश करावा. संकल्प करून पूजेला सुरुवात करावी.
पापमोचनी एकादशी व्रतपूजन कसे करावे?
पूजेचा संकल्प केल्यानंतर भगवान विष्णूंच्या चतुर्भुज स्वरुपाची स्थापना करावी. श्रीविष्णूंना पंचामृत, गूळ, चण्यांची डाळ अर्पण कराव्यात. यानंतर तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले अर्पण करावीत. चंदन अर्पण करावे. यानंतर धूप, दीप दाखवावे. मनोभावे पूजा करून नैवेद्य दाखवावा. ही पूजा केल्यानंतर पापमोचनी एकादशीच्या व्रताच्या कथेचे पठण करावे. अनावधानाने झालेल्या चुकांबाबत भगवान विष्णूंना क्षमायाचना करावी. 'ओम नमो भगवते वासुदेवाय' या मंत्रांचा जप करावा. तसेच एकादशीला जागरण करावे, असा पूजाविधी सांगण्यात आला आहे.
ऋषिंची तपसाधना भंग करण्याचा प्रयत्न
पौराणिक कथेनुसार, श्रीकृष्ण अर्जुनाला पापमोचनी एकादशीचे व्रत आणि कथा यांबाबत माहिती देतात. एकदा राजा मांधना यांनी लोमश ऋषिंना अनावधानाने झालेल्या पापातून मुक्तता कशी मिळेल, असा प्रश्न विचारला होता. तेव्हा लोमश ऋषिंनी राजाला सुंदर वनातील च्यवन ऋषींचे पुत्र मेवाधी ऋषि यांची कथा सांगितली. मेवाधी ऋषि तपसाधनेत मग्न असताना मंजुघोषा नामक अप्सरा तेथे आली. ऋषिंच्या रुपावर ती भाळली आणि ऋषिंची तपसाधना भंग करण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात कामदेव तेथून मार्गक्रमण करीत होते. अप्सरेची मनस्थिती त्यांनी ओळखली आणि तिच्या मदतीला धावून गेले. कामदेव आणि अप्सरा यांनी ऋषिंची तपसाधना भंग केली. कामदेवांच्या प्रभावामुळे ऋषिदेखील त्या अप्सरेवर मोहीत झाले. काही वर्षांनंतर ऋषिंना तपसाधना सोडण्याच्या चुकीची जाणीव झाली. यानंतर तपसाधना भंग केल्याबद्दल ऋषि अप्सरेवर अत्यंत क्रोधित झाले आणि तिला शाप दिला.
पापमोचनी एकादशीचे व्रत अतिशय पुण्यदायी
ऋषिंनी दिलेल्या शापामुळे अप्सरा दुःखी झाली. शापातून मुक्तता व्हावी, यासाठी क्षमायाचना करू लागली. याचवेळी देवऋषि नारद तेथून मार्गक्रमण करीत होते. नारदांनी ऋषि आणि अप्सरा या दोघांना पापमोचनी एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. नारदांनी सांगितलेल्या पूजाविधीप्रमाणे दोघांनी पापमोचनी एकादशीचे व्रत केले. या दोघांनाही पापातून मुक्तता मिळाली, अशी या व्रताची कथा सांगितली जाते. या कथेच्या श्रवणाने आणि पठन करण्याने अनेक पापांतून मुक्तता मिळते. यामुळे हे व्रत अतिशय पुण्यदायी आहे, अशी मान्यता आहे.