'भय इथले संपत नाही...' कवी ग्रेस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सुप्रसिद्ध कवितेला उजाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 10:05 AM2021-05-10T10:05:53+5:302021-05-10T10:06:14+5:30

भयाच्या क्षणी आठवण येते, परमेश्वराची, आप्तजनांची, जिवलगांची! कारण आनंदाच्या क्षणी न बोलवता सगळे येतात, पण दु:खात, एकाकी क्षणात फक्त आपलेच सोबती असतात.

'Fear does not end here ...' Light up his well-known poem on the occasion of poet Grace's birthday! | 'भय इथले संपत नाही...' कवी ग्रेस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सुप्रसिद्ध कवितेला उजाळा!

'भय इथले संपत नाही...' कवी ग्रेस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सुप्रसिद्ध कवितेला उजाळा!

googlenewsNext

सद्यस्थिती पाहता हे भयावह चित्र आणखी कुठवर पाहायचे, याचा अदमास लागत नाही. काळाच्या पडद्याआड गेलेल्या, नातेसंबंधांनी दुरावलेल्या, एका छताखाली असून मनाने विभक्त झालेल्या व्यक्ती केवळ आठवणींपुरत्या मर्यादित राहतील का, अशी स्थिती निर्माण होते, तेव्हा कवि ग्रेस यांची सुप्रसिद्ध कविता ओठावर येते, 'भय इथले संपत नाही...!'

कवि ग्रेस यांच्या कविता थोड्या अनवट वळणाच्या, गूढ अर्थाच्या आणि सर्वसामान्यांना बोजड वाटतील अशा! पण सर्वांना आकलन व्हावे, असा रचनाकाराचा आग्रह नसतोच मुळी! कविमन मूळातच संवेदनशील. व्याकरणाच्या चौकटीत स्वत:ला अडकवून न घेणारे, भावभावनांची मुक्त शाब्दिक उधळण करणारे, तरी मनामनाला भिडणारे! ग्रेस यांच्या कविताही अशाच 'ग्रेसफुल' होत्या. पैकी सर्वांना आवडणारी ही कविता. त्याचे भावगीतात रुपांतर केले, पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि त्या शब्दात प्राण फुंकले स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी!

भयाच्या क्षणी आठवण येते, परमेश्वराची, आप्तजनांची, जिवलगांची! कारण आनंदाच्या क्षणी न बोलवता सगळे येतात, पण दु:खात, एकाकी क्षणात फक्त आपलेच सोबती असतात. पण तेही दुरावले, तर जगण्याचे भय वाटू लागते आणि ते भय आणखी किती काळ टिकून राहील याची शाश्वती नसते. एकवेळ दिवस निघून जातो, परंतु संध्याकाळ हुरहूर लावणारी असते. तिलाच 'कातरवेळ' असेही म्हणतात. त्या संधीप्रकाशात आठवते, जीवनगाणे...

अवतीभोवती निसर्गसौंदर्य आहे, परंतु त्याच्याकडे लक्ष जाण्यासाठी मन शांत असायला हवे ना? निसर्ग मानवाला घडवतो, समृद्ध करतो, या मातीतून जन्माला आलो या मातीतच आपला शेवट आहे, याची शिकवण देतो. परंतु ते शिकण्यासाठी कोणी सोबती, सखा, सवंगडी हवा! कारण, हा प्रवास एकट्याने करणे शक्य नाही...

अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहे असे म्हणतात. पण कवीमनाला विचारले, तर `जगण्याचे बळ देणारे शब्द' ही एवढीच मानवाची खरी भूक आहे, असे ते सांगेल. कौतुकाच्या, धीराच्या, प्रेमाच्या, सहानुभूतीच्या शब्दांसाठीच मनुष्य आयुष्यभर झुरत असतो. ते वेळच्या वेळी मिळणेही गरजेचे आहे. शब्द जगायला प्रेरणा देतात. ध्येय देतात. संकटाशी लढण्याचे बळ देतात. म्हणून तर अशोकवनात सर्व असूरांमध्ये राहूनही सीतेचे मनोबल खचले नाही. राम येतील, हे आश्वासक शब्द तिला जगण्याची उभारी देत होते.

या जगाात दु:खाची कमतरता नाही. आपले दु:खं सांगायला जावे, तर समोरच्याकडे आपल्याहून अधिक दु:खाचा डोंगर असतो. कोणाजवळ मन मोकळे करावे, ही मोठी व्यथा असते. शांतपणे आपले दु:खं ऐकून घेणारी, आपल्याला `लढ म्हणणारी', केवळ नजरेतून, शब्दातून, स्पर्शातून आपले दु:ख समजून घेणारी व्यक्ती दुरावते, तेव्हा भयाचा काळोख अधिक गडद होत जातो.

पण हे चित्र आता आणखी नको. भय आता संपावे आणि नवचैतन्याची पहाट यावी, हीच प्रार्थना!

Web Title: 'Fear does not end here ...' Light up his well-known poem on the occasion of poet Grace's birthday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.