फेंगशुई आणि वास्तूशास्त्र सांगते, 'चित्रे बदला, आयुष्य बदलेल'; काय आहे त्यामागील मानसशास्त्र समजून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 10:23 AM2021-04-19T10:23:02+5:302021-04-19T10:28:36+5:30
आपण वेगवेगळ्या भाषा बोलत असतो, दिवसभर भाषाच वापरत असतो.अंतर्मनाची भाषा कोणती माहीतआहे?चित्रांची!
>> कांचन दीक्षित
फेंग शुई असो वा वास्तुशास्त्र घरातले फोटो,चित्रे यांना महत्त्व प्रत्येक शास्त्र देते. ‘चित्रे बदला,आयुष्य बदला’असेच म्हणता येईल. आपल्या घराला आवरणे,सजवणे म्हणजे चित्र सुंदर करणे आहे.आपल्याला प्रेरणा, उत्साह स्फूर्ती देणारी चित्रे मुद्दाम शोधा आणि वारंवार पहा.आयुष्यातल्या घटना अनुभव बदलायचा असेल तरी मनातली चित्रे बदलून पहा आपोआप कालांतराने बदल घडेल. घरातली, मनातली फोन, लॅपटाॅप वरची एकटेपणा,उदासीनता,वैर भावना निर्माण करणारी चित्रे फेकून द्या.समृद्धी,भरपूर मुबलकता,श्रीमंती,एकता दाखवणारी चित्रे पहा,आणि दाखवा.
सकाळी आणि रात्री झोपतांना आपल्या मनात कोणती चित्रे जात आहेत याची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे,मनात गेलेल्या नकारात्मक प्रतिमा आयुष्यात घटनेच्या रुपात समोर येतात आणि आपण स्वतःच दुःखाला वेदनेला आमंत्रण देतो,आपल्या आयुष्यात काही दुःख वेदना असेल तर आजपासून आपल्या आजूबाजूच्या चित्रांवर काम करायला सुरुवात करा,या विषयावर अनेक अभ्यास पद्धती आहेत.
आपल्या मनाला चित्राची भाषा समजते,समजा ‘पेन’हा शब्द कोणी उच्चारला तर मनाला PEN /पेन हे शब्द दिसत नाहीत तर चित्र दिसतं.आपल्या मनाची भाषाच जर चित्रांची असेल तर मनावर जे काही बरे वाईट परिणाम होत असतील त्याला जवाबदार आपण पहातो (त्याला दाखवतो) ती चित्रंच असणार हे ओघाने आलंच.
आपण डोळ्यांनी चित्रं पाहतो,स्पर्शाने चित्र समजून घेतो,वेगवेगळे वास वेगवेगळी चित्रं मनाला देतात,कानाने ऐकलेले आवाज सुद्धा चित्र तयार करण्यास प्रवृत्त करतात म्हणजे मन कल्पनेने चित्र निर्माण करते, सर्वात महत्वाचे असतात शब्द! बोलले जाणारे, वाचले,लिहिले जाणारे शब्द मनात चित्र उमटवतात.
आपण एखादी कथा ,कविता,शब्दचित्र वाचून म्हणतो सुद्धा की लेखकाने हुबेहूब वर्णन केलेले आहे म्हणजेच काय तर मनात नेमके चित्र निर्माण करण्यास ते शब्द यशस्वी झालेले आहेत.
ही मनामनातली चित्रं आपलं आयुष्य ठरवत असतात आपल्या आयुष्यावर परिणाम,संस्कार करत असतात म्हणूनच रांगोळी,देव देवींच्या प्रतिमा,मंदिरे यांचे महत्व आहे ते मनावर शुभ संस्कार करतात म्हणजे मनाला चांगली चित्रं देतात त्यामुळे मनात चांगल्या भावना,विचार निर्माण होतात.विघ्न दूर करणारा गणपती,बल देणारा मारुती,लक्ष्मी,सरस्वती नुसती चित्रं पाहीली तरी मनात भाव निर्माण होतात.
लहानपणी गणेशोत्सवात सजवलेली मूर्ती,दिवाळीत केलेले मातीचे किल्ले,स्वयंपाक घरात स्वयंपाक करणारी आई... शेवटी आठवणी म्हणजे चित्रं किंवा चलचित्रंच !आपण निवांत एकटे बसतो त्यावेळेस काय आठवते तर हीच चलचित्रे !
याचाच अर्थ मनाला जास्तीत जास्त सकारात्मक चित्रे दिली तर मन आनंदी राहील?तर हो नक्कीच! पण मनाला उदास निराश करण्याचे काम आपण दिवसभर बेसावधपणे करत असतो आणि ‘मला उदास निराश वाटतंय’ अशी तक्रारही आपणच करतो.
सोशल मिडिया, टीव्हीवरची आवाज आणि रंग असलेली चित्रे मनावर किती खोल परिणाम करत असतील! याचा अर्थ सत्यापासून पळायचे का?तर नाही पण ज्या चित्रांची वारंवार गरज नाही त्यांच्यापासून दूर राहायचे.
मनाला दिली जाणारी ही चित्रे संदेश वाटतात आणि ती खरी करण्याचे काम ते सुरु करते कारण तेच वास्तवात आणण्यासाठी काम करायचे आहे असे त्याला वाटते.सकारात्मक आणि नकारात्मक असा भेद त्याला करता येत नाही,आपली आज्ञा पाळणे हेच अंतर्मनाला माहीत असते.
तुमच्यापर्यंत वाईट चित्रे आली तरी दृष्टीकोन बदलून टाका.उदा.अपघात झालेला रुग्ण दिसला तर मनाला शेजारी उभा असलेला आरोग्यदूत डॉक्टर दाखवा.दहा वाईट कामे करणारी माणसे दिसली तरी एक चांगले काम करणारा माणूस दाखवा तो असतोच आपण पहात नाही.
आजकाल समाजात स्त्रियांविषयी घडणा-या नकारात्मक घटनांमागे लोकांच्या अंतर्मनात गेलेल्या नकारात्मक प्रतिमा आहेत,स्त्रियांच्या अंतर्मनात पुरुषांबद्दल आणि पुरुषांच्या अंतर्मनात स्त्रियांबद्दल चुकीची चित्रे गेलेली आहेत त्यामुळे परस्पर आदर कमी झालेला आहे,मनात सतत संदेश देणारी ही चित्रे बदलली नाहीत तर हा आदर कसा निर्माण होईल?
आपल्याला कशी चित्रे पहायची आहेत हे स्वतःला सांगा,निर्णय घ्या,मेंदूला तशी सूचना दिली की मेंदू तशीच चित्रे दाखवेल. आपल्याला नवीन कपडे खरेदी करायचे आहेत असं आपण ठरवलं की रस्त्यावर दररोज न दिसणारी कपड्यांची दुकाने दिसायला लागतात,आजूबाजूच्या लोकांच्या कपड्यांकडे,रंगांकडे आपले लक्ष जाते याचाच अर्थ आपण जे पहायचे ठरवतो तेच आपल्याला दिसायला लागतं,जर निवड आपली असेल तर चांगले निवडण्यातच शहाणपणा आहे !