अखेर मंदिराचे द्वार पुन्हा उघडणार आणि भक्त भगवंत भेटीचा सोहळा रंगणार, 'या' गाण्यासारखाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 05:00 PM2021-10-06T17:00:43+5:302021-10-06T17:01:06+5:30

अनेकदा आनंद व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात तेव्हा मोजक्या काव्यपंक्तीदेखील आपल्या भावनांचे माध्यम बनतात. 

Finally, the doors of the temple will be reopened and the ceremony of meeting the devotee will be performed, just like this song! | अखेर मंदिराचे द्वार पुन्हा उघडणार आणि भक्त भगवंत भेटीचा सोहळा रंगणार, 'या' गाण्यासारखाच!

अखेर मंदिराचे द्वार पुन्हा उघडणार आणि भक्त भगवंत भेटीचा सोहळा रंगणार, 'या' गाण्यासारखाच!

Next

आषाढी कार्तिकीची वारी करताना वारकऱ्यांना जेवढा आनंद होतो ना, अगदी तसाच आनंद समस्त भाविकांना झाला आहे. कारण कोरोना महामारीच्या काळात सुरक्षा हेतूने बंद केलेली धार्मिक स्थळांची दारे ७ ऑक्टोबर रोजी पुन्हा खुली होत आहेत. देव मंदिरात, अंतरात सामावलेला आहे, हे मान्य! परंतु त्याच्या दर्शनाने होणारा आनंद शब्दातून व्यक्त करायचा झाला, तर कवी जगदीश खेबुडकर लिखित भोळी भाबडी या चित्रपट गीताचा आपल्याला आधार घेता येईल. 

टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संग,
देवाजिच्या द्वारी आज, रंगला अभंग।।

काळानुकाळची वारीची परंपरा, कधी नव्हे ती यावर्षी खंडित झाली. परंतु, भक्तांच्या मनीचा भाव किंवा भगवंताप्रती असलेली ओढ यत्किंचितही कमी झाली नाही. मंदिराची दारे बंद असतानाही भाविक चंद्रभागेचे दर्शन घेऊन पांडुरंगाच्या मंदिराच्या पायरीवर मस्तक ठेवून समाधान मानत होती. आता, तर तोही अडसर दूर झाला आहे. पुन्हा एकदा आनंदाचा सुकाळू येईल आणि पंढरपुरच्या प्रांगणात टाळ, चिपळ्या, मृदुंगाचा गजर होत विठुनामाने पंढरी दुमदुमून निघेल. त्याच भावावस्थेचे यथार्थ वर्णन खेबुडकरांनी प्रस्तुत काव्यात केले आहे. 

अभंग गायनाची खासियत अशी, की तो देवाच्या द्वारी उभा राहून गायला, तर त्यात रंग भरतोच, परंतु जिथे असू तिथे तल्लीन होऊन अभंग गायला, तर आपल्या सभोवतालचा परिसर गाभाऱ्यासारखा पवित्र होतो. समाधीस्थ अवस्था तयार होते आणि त्या आनंदात टाळ, चिपळ्या, मृदंगही नाचू लागतात. सगळे विठ्ठलमय होतात. तिथे रंक-राव असा भेदभाव उरतच नाही. कारण तो दरबार ईश्वराचा असतो. त्याचा कृपाप्रसाद सर्वांना सारखा मिळतो. सर्व विषयांशी संग सुटतो आणि केवळ विठुनामाचा संग जडतो.

दरबारी आले रंक आणि राव,
सारे एकरूप नाही भेदभाव
गाउ नाचू सारे होऊनि नि:संग।

विठ्ठलनामात रंगुन गेलेला वारकरी मैलोनमैलाचे अंतर पायी कापत कधी पायरीचे तर कधी कळसाचे दर्शन घेऊन परत जातो. एरव्ही कोणी पायी चालत जा म्हटले, तर जवळचे अंतरही नकोसे होते, मात्र भगवन्नाम घेत वारीला निघालेली पावले कधीच थकत नाहीत, असा भाविकांचा अनुभव आहे. याचे वर्णन करताना खेबुडकर लिहितात, 

जनसेवेपायी काया झिजवावी,
घाव सोसुनिया मने रिझवावी,
ताल देऊनी हा बोलतो मृदंग

या ओळींवरून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वाक्य आठवते, त्यांनी आपल्या वहिनीला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, 

अमर होय वंशलता, निर्वंश जिचा देशा करिता,
दिगंती पसरे सुगंधिता, लोकहित परिमलाची ।

जी फुले खुडली गेल्यावर रामचरणी वाहिली जातात, ती धन्य होतात. त्याप्रमाणे ज्यांचा वंश देशकार्यासाठी निर्वंश होतो, त्यांचे आयुष्य फुलाप्रमाणे सुगंधित होऊन, त्यांच्यापश्चातही परिमळ दरवळत राहतो. खेबुडकरांनीदेखील हाच धागा पकडून जनसेवेपायी काया झिजवावी, असे म्हटले आहे आणि त्याचा दाखला देताना मृदंगाचे उदाहरण दिले आहे. 

ब्रह्मानंदी देह बुडुनिया जाई,
एक एक खांब वारकरी होई,
कैलासाचा नाथ झाला पांडुरंग।

हा ब्रह्मानंद वेगळाच आहे. तो सांगून कळणारा नाही, त्याची अनुभूती घ्यायची असते. पंढरपुराच्या कणाकणातून विठ्ठल नाम उमटते. हे सांगताना खेबुडकरांची काव्यप्रतिभा उच्चांक गाठते. ते मंदिराच्या खांबालाही वारकऱ्याचे रूप देतात आणि हा सोहळा स्वर्गसुखाचा आनंद देणारा आहे, म्हणून पंढरपुराला कैलासाची उपमा देत, पांडुरंगाला कैलासपती संबोधतात.

Web Title: Finally, the doors of the temple will be reopened and the ceremony of meeting the devotee will be performed, just like this song!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.