लग्न जुळवताना मुला मुलीच्या कुंडलीत नेमके कोणते ३६ गुण जुळवले जातात जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 01:50 PM2022-01-21T13:50:18+5:302022-01-21T13:50:51+5:30
हिंदू विवाह पद्धतीत पत्रिका पाहिल्याशिवाय लग्नाची गाडी पुढे सरकत नाही. अशा वेळी कुंडलीत नेमके कोणते दोष गुण पाहिले जातात याची विवाहेच्छुकांनी माहिती करून घ्यावी!
हिंदू धर्मशास्त्रात ज्योतिष विद्येला महत्त्व असल्यामुळे शुभ मुहूर्त, जन्म कुंडली, लग्न कुंडली, ग्रहपीडा, उष्कर्ष, भविष्य, आजार आणि मरणोत्तर विधी या सर्व गोष्टींसाठी पंचांगाचा आधार घेतला जातो. याच आधारे आयुष्यातला मोठा निर्णय अर्थात लग्नाचा, त्यावेळेसदेखील कुंडली बघून लग्न जुळवले जाते. आजही अनेक घरांमधून कुंडली पाहून विवाह ठरवण्याला प्राधान्य दिले जाते. तर काही जण नकार कळवण्यासाठी कुंडलीचा आसरा घेतात. ज्याचा त्याचा दृष्टिकोन आणि ज्याचा त्याचा विश्वास! परंतु इथे आपल्याला जाणून घ्यायचे आहे, ते म्हणजे कुंडली जुळवताना ३६ चा आकडा आला कुठून?
जिथे प्रेमविवाह होतात, तिथे ज्योतिषी कुंडली न पाहण्याचा सल्ला देतात. कारण दोघांनी एकमेकांना दोष गुणांसह स्वीकारूनच लग्नाचा निर्णय घेतलेला असतो. कुंडलीदेखील गुण दोष दर्शवते. पूर्वी व्यक्तीचा स्वभाव, दोष इ माहिती जाणून घेण्यासाठी पत्रिकेचा वापर होत असे. आताची पिढी सोशल मीडिया अकाउंट वरून एकमेकांची सखोल कुंडली शोधून काढते! विनोदाचा भाग सोडा, परंतु लग्न छान टिकावे, परस्पर संबंध जुळावेत, स्वभावाचे, मनाचे मिलन व्हावे या हेतूने कुंडली बघण्याला आजही लोकांची पसंती असल्याचे दिसून येते.
पत्रिका जुळण्यासाठी किती गुण आवश्यक?
वधू वराचे वैवाहिक जीवन सुखी समृद्ध असावे म्हणून ३६ पैकी निदान १८ गुण मिळवणे आवश्यक असते. यालाच आपण काठावर पास होणे असेही म्हणू शकतो. काही जणांचे ३६ गुणदेखील जुळतात आणि त्यांचे विवाह संपन्न होतात. १८ पेक्षा कमी गुण जुळणाऱ्या पत्रिकांचे मिलन होऊ शकत नाही असे नाही. परंतु जेवढे गुण जुळत नाहीत ते जुळवून घेण्याची तयारी दोहोंनी दर्शवली तर तोही विवाह यशस्वी होऊ शकतो. तशीही अनेक उदाहरणे आपल्याला आसपास दिसतील. पत्रिका जुळलेले असो नाहीतर न जुळलेले असो, लग्न झाल्यावर प्रेम, वाद, मौन, टोमणेबाजी, शेरेबाजी ओघाने आलीच. फक्त त्याकडे तुम्ही किती खिलाडू वृत्तीने नाते हाताळता यावर संसाराचे आयुर्मान दिसते. म्हणून पत्रिका मिलनाचा आग्रह!
पत्रिका मिलनात नेमके कोणते ३६ गुण तपासले जातात?
लग्नाच्या वेळी कुंडली जुळताना अष्टकूट गुण दिसतात. यामध्ये नाडीचे ८ गुण, भकूतचे ७ गुण, गण मैत्रीचे ७ गुण, ग्रह मैत्रीचे ५ गुण, योनी मैत्रीचे ४ गुण, नक्षत्राचे 3 गुण, वास्यचे २ गुण आणि वर्णाचे १ गुण जुळले का हे पाहिले जाते. अशा प्रकारे एकूण ३६ गुण आहेत.लग्नानंतर वधू-वर एकमेकांशी मैत्रीपूर्ण असावेत, संतती असावी, सुख, संपत्तीत वृद्धी व्हावी, दीर्घायुष्य लाभावे, यासाठी ही मुख्य चाचणी असते.