मे महिन्यात बदलत्या ग्रहस्थितीमुळे राशीनुसार आपण कोणते बदल केले पाहिजेत, जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 12:46 PM2021-05-11T12:46:12+5:302021-05-11T12:46:29+5:30
वृषभ संक्रात सुरू होत आहे, आपल्या राशीत होणारे बदल जाणून घ्या.
मे महिन्यात बुध, शुक्र आणि सूर्यदेव आपले स्थान बदलून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्यदेवाचा वृषभ राशीत प्रवेश यालाच वृषभ संक्रात असेही म्हणतात. त्यामुळे केवळ या एकाच राशीवर नाही, तर या ग्रहस्थितीचा परिणाम अन्य राशींवर दिसणार आहे. काही राशींसाठी हे बदल सकारात्मक ठरतील तर काहींसाठी नकारात्मक! अशा वेळी आपल्या राशीनुसार आपल्याला कोणती काळजी घेतली पाहिजे, आपल्या वागण्या बोलण्यात कोणते परिवर्तन केले पाहिजे, ते पाहूया.
मेष : योग्य निर्णय घेतलेत, तर सन्मान वाढेल. सहलीचे, प्रवासाचे योग आहेत, परंतु सद्यस्थिती प्रवासासाठी अनुकूल नाही त्यामुळे घरी राहा, सुरक्षित राहा. तुमच्या संबंधित क्षेत्रात यश मिळू शकते. काही काळ नवीन खरेदी टाळा.
वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात उत्साहाने काम कराल. कार्यस्थळी नवीन जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. विवेकबुद्धीने निर्णय घ्या.
मिथुन : उच्च अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. अन्यथा मानसिक ताण येऊ शकतो. एखाद्याला कोणत्याही आजारापासून किंवा संकटापासून सुटका मिळू शकते.
कर्क : काही काळ भावी योजना गोपनीय ठेवा. तुमच्या कार्यक्षेत्रात पदोन्नती मिळू शकते. खर्च वाढल्यामुळे आर्थिक घडी विस्कटू शकते. परंतु घरच्यांचे सहकार्य लाभल्यामुळे कौटुंबिक जीवन मधुर राहील.
सिंह : ग्रहस्थिती पाहता लांबचा प्रवास लाभदायक ठरेल, परंतु सद्यस्थिती पाहता बाहेर जाणे, फिरणे टाळणे जास्त उचित ठरेल. 'सिर सलामत तो पगडी पचास!' त्यामुळे भावी काळात राहिलेल्या सहली पूर्ण करा. दरम्यान तुमच्या क्षेत्रात कामाचे कौतुक होईल आणि आरोग्य चांगले राहील.
कन्या : कोणताही निर्णय घेण्यास घाई करू नका. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ही वेळ चांगली आहे, तरीदेखील थोडे सबुरीने निर्णय घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घ्या.
तूळ : कामामध्ये यश मिळवण्यात अडचणी येतील. अप्रिय लोकांचा, प्रसंगाचा सामना करावा लागेल. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. मन शांत ठेवा आणि ईश्वराचे स्मरण करा.
वृश्चिक : एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. आनंद होईल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. त्यामुळे हा काळ आनंदाचा ठरेल. कार्यक्षेत्रात काही चढउतार होऊ शकतात. परंतु, लवकरच सगळे काही पूर्ववत होईल. कुटूंब सौख्य लाभेल.
धनु : आपल्या निर्णयांवर ठाम रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कामाच्या ठिकाणी सहकारी कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतील. पैशाबाबत कुटुंबात तणाव असू शकतो. मन अस्वस्थ राहील.
मकर : निर्णय सुज्ञपणे घेण्याची गरज आहे. एखाद्या चांगल्या कंपनीत किंवा संस्थेत काम करण्याची संधी मिळू शकते. कौटुंबिक जीवनात चढउतार होतील. आरोग्याची काळजी घ्यावी.
कुंभ : तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही उत्साही आणि मेहनती आहात. तुमच्या प्रयत्नांना यशाची जोड मिळेल. दरम्यान खर्च वाढू शकतो. आहारपद्धतीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
मीन : कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नाचे कौतुक होईल. नोकरीत बदल होऊ शकतो. नातेवाईकांच्या भेटी होतील. नकारात्मकतेपासून दूर राहण्याची गरज आहे. अन्यथा मानसिक तणाव येऊ शकतो.