मनुष्य आणि प्राणी यांच्या आहारशैलीत कोणता मुख्य फरक असायला हवा ते जाणून घ्या आणि तसा बदल करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 05:10 PM2022-03-10T17:10:08+5:302022-03-10T17:12:44+5:30
शाकाहार आणि मांसाहार असे लोकांमध्ये दोन गट होतेच, त्या आणखी एका गटाची भर पडली आहे, ती 'व्हेगन' नावाच्या आहारपद्धतीची! ...
शाकाहार आणि मांसाहार असे लोकांमध्ये दोन गट होतेच, त्या आणखी एका गटाची भर पडली आहे, ती 'व्हेगन' नावाच्या आहारपद्धतीची! व्हेगन अर्थात अशी आहारपद्धती, जी दूध आणि दूग्धजन्य पदार्थांनाही व्यर्ज्य मानते आणि केवळ शाकाहाराचा पुरस्कार करते. परंतु निसर्ग नियम अथवा शरीर नियम काय सांगतो, याबाबत एक माहिती वाचनात आली. त्यात पशुपक्ष्यांशी मानवदेहाची तुलना स्पष्ट केली असून, मानव निसर्गत: शाकाहारीच होता, असे ठासून म्हटले आहे. ते मुद्दे कोणते, ते पाहुया!
परमेश्वराने सृष्टीत शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन प्रकारचे प्राणी निर्माण केले आहेत. त्यात मानव प्राणी शाकाहारीच बनवला आहे. शरीर रचनेकडे पाहिले, तर शाकाहारी व मांसाहारी प्राण्यांच्या शरीररचनेत फार मोठा भेद दिसून येतो.
>> शाकाहारी प्राणी पाण्यावर ओठ टेकून पाणी पितात. मांसाहारी प्राणी जीभ बाहेर काढून चाखत पाणी पितात.
>> शाकाहारी प्राण्यांचे दात चपटे असतात, पण मांसाहारी प्राण्याचे सर्व दात अणकुचीदार असतात व त्यात फटी असतात.
>> मांसाहारी प्राण्यांची नखे अणकुचीदार असतात व तीक्ष्ण असतात. शाकाहारी प्राण्यानची नखे चपटी असतात व अणकुचीदार नसतात.
>> मांसाहारी प्राण्यांना अंधारात दिसते. परंतु शाकाहारी प्राण्यांना अंधारात अंधुक दिसते.
>> मांसाहारी प्राण्यांच्या पिल्लांचे डोळे जन्मासमयी बंद असतात आणि त्यांचे डोळे जन्मानंतर १०-१५ दिवसांनी उघडले जातात. शकाहारी प्राण्यांच्या बालकाचे डोळे जन्मापासून उघडले जाऊ शकतात.
>> मांसाहारी प्राण्यांना घाम बिलकुल येत नाही. शाकाहारी प्राण्यांना मात्र घाम येतो.
>> मांसाहारी प्राण्यांची आतडी आखूड असतात. शाकाहारी प्राण्यांची आतडी लांब असतात.
वरील वस्तुस्थितीचा विचार केला असता, मानव प्राणी निसर्गत: शाकाहारी आहे, मांसाहारी नाही, याची खात्री पटते.