हिंदू धर्मातील पूजनीय पाच पुरातन वटवृक्ष कुठे आहेत, ते जाणून घ्या.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 04:45 PM2021-02-24T16:45:47+5:302021-02-24T16:46:06+5:30
हिंदू शास्त्रात वटवृक्षाला अतिशय महत्त्व आहे. सौभाग्यवती स्त्रिया आपल्या सौभाग्यासाठी वट पौर्णिमेचे व्रत करतात. असे जुने वटवृक्ष पाहिले, की आपले हात विनम्रतेने जोडले जातात. पंचवट, अक्षयवट, वंशीवट, बौद्धवट आणि सिद्धवट हे प्राचीन वटवृक्ष मुख्यतः पुजले जातात.
एखादा विस्तीर्ण पसरलेला वटवृक्ष पाहिला, की आपल्याला तो पुराणपुरुषासमान भासतो. आजही अनेक वृक्ष अस्तित्वात आहेत, ज्यांचे आयुर्मान शे-पाचशे हुन अधिक वर्षे आहे. वनस्पती तज्ञांनी याची पुष्टी दिली आहे. अशाच वृक्षांपैकी काही वटवृक्ष हजारो वर्षांपूर्वी देवी देवतांनी लावले आहेत. पैकी पाच वटवृक्ष प्रसिद्ध आहेत. ते कोणते व कुठे आहेत, ते जाणून घेऊ.
हिंदू शास्त्रात वटवृक्षाला अतिशय महत्त्व आहे. सौभाग्यवती स्त्रिया आपल्या सौभाग्यासाठी वट पौर्णिमेचे व्रत करतात. असे जुने वटवृक्ष पाहिले, की आपले हात विनम्रतेने जोडले जातात. पंचवट, अक्षयवट, वंशीवट, बौद्धवट आणि सिद्धवट हे प्राचीन वटवृक्ष मुख्यतः पुजले जातात.
नाशिक येथे पंचवटी क्षेत्रात सीता मातेच्या गुहेजवळ पाच वटवृक्ष आहेत. त्या जुन्या वटवृक्षांवरून त्या क्षेत्राला पंचवटी अशी ओळख मिळाली आहे. वनवासाच्या कालावधीत प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी काही काळ तिथे वास्तव्य केले होते. त्यामुळे त्यांचे धार्मिक महत्त्व अधिकच वाढले आहे.
मुगल काळात हिंदूंच्या श्रद्धेवर घाव घालण्यासाठी प्राचीन वृक्ष तोडण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु तो प्रयत्न असफल ठरला. कारण वटवृक्ष जितका बाहेर विस्तृत दिसतो, तेवढाच तो जमिनीच्या आत घट्ट रुतलेला असतो. पंचवटी परिसरात ते प्राचीन वटवृक्ष आजही पाहायला मिळतात. अन्य वटवृक्षाची परिस्थिती काय आहे पाहूया.
उज्जैनच्या भैरवगड येथे शिप्रा नदीच्या तटावर सिद्धवट स्थान आहे. त्याला शक्तिभेद तीर्थ असेही म्हणतात. हिंदू पुराणात या स्थानाचा महिमा कथन केला आहे.
सिद्धवटचे पुजारी पंडित नागेश्वर कन्हैय्यालाल यांच्या सांगण्यानुसार स्कंद पुराणात म्हटले आहे, की हा वृक्ष माता पार्वतीने लावला होता. त्या वृक्षाला शिव स्वरूप मानून त्याची पूजा केली जाते.
पार्वती पुत्र कार्तिकेय यांनी तिथेच तारकासुराचा वध केला होता.
प्रयाग येथील अक्षयवट, मथुरा वृंदावन येथील वंशीवट, गया येथील गयावट ज्याला बौद्धवट असेही म्हणतात आणि उज्जैन येथे सिद्धवट या वटवृक्षांना अधिक महत्त्व आहे.
सिद्धवट येथील वटवृक्षाची पूजा केली असता संतती, संपत्ती आणि सद्गती प्राप्त होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तिथे मोठ्या प्रमाणात कालसर्प शांती केली जाते.
सद्गती अर्थात पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तिथे अनुष्ठान केले जाते. संतती आणि संपत्ती प्राप्तीसाठी सिद्धवट येथील वटवृक्षाला धागा बांधून भाविक नवस बोलतात आणि नवस पूर्ण झाला की धागा सोडतात. हा वृक्ष सिद्धी देणारा आहे, म्हणून त्याला सिद्धवट असे म्हणतात.