चैत्र नवरात्रीत कोणत्या राशीच्या लोकांनी कोणता फलाहार करणे आरोग्यदायी ठरेल, ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 06:03 PM2021-04-13T18:03:12+5:302021-04-13T18:03:30+5:30
गरिबांना महाग फळे विकत घेणे परवडत नाही. अशा वेळी सण वाराच्या निमित्ताने किंवा शक्य असेल तेव्हा गरजू लोकांना फळांचे दान करावे. त्यांच्या सदिच्छांपेक्षा मोठे फळ कोणते...?
हिंदू धर्मात सण, उत्सव, परंपरा यांची सांगड ऋतुमानानुसार घातलेली दिसते. त्या त्या ऋतूत असलेल्या फळा-फुलांचा सण उत्सवात समावेश केला जातो. त्यामुळे स्वाभाविकच निसर्गाशी आपले नाते जोडले जाते. आजपासून चैत्र नवरात्र सुरू झाली आहे. येत्या नऊ दिवसात आपण आपल्या राशीनुसार फलाहार केला, तर ते आपल्या प्रकृतीसाठी लाभदायक ठरू शकेल, असे ज्योतिषशास्त्र सांगते. चला तर जाणून घेऊया, आपल्या राशीला कोणते फळ सेवन करणे उचित ठरेल ते...!
मेष, सिंह आणि धनु राशी अग्नी तत्त्वाच्या राशी मानल्या जातात. मुळात तापट वृत्तीच्या या राशींनी तिखट पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे. तसेच सुका मेवा किंवा कलिंगड, द्राक्ष, पेठा अशी शीत प्रकृतीची फळे खाल्ली पाहिजेत.
वृषभ, कन्या आणि मकर या राशी पृथ्वी तत्वांच्या राशी आहेत. या राशीच्या लोकांनी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे व फलाहारावर भर दिला पाहिजे. अति गोड फळांचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे.
मिथुन, तूळ आणि कुंभ या राशी वायू तत्वाच्या आहेत. त्यांनी कडधान्याऐवजी पालेभाज्या, फळभाज्या यांवर भर दिला पाहिजे. तसेच बदलत्या ऋतूनुसार उपलद्ध होणाऱ्या फळांचा आहारात आवर्जून समावेश केला पाहिजे.
कर्क, वृश्चिक, मिन राशी जलतत्वाच्या निर्देशक आहेत. या राशींनी रसाळ फळे, सरबत, फळांचे रस यांचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे. फळांचे रस न काढता फळे चावून खाल्ली पाहिजेत.
राशीनुसार दिलेले फळांचे सेवन केल्यास व्रत करताना शरीराला अपाय होत नाही. तसेच एरव्हीदेखील या गोष्टी लक्षात ठेवून आहार नियमन केले असता सुदृढ आरोग्य प्राप्त होते. फळ स्वतःसाठी जेवढे लाभदायक आहे तेवढे इतरांसाठीही लाभदायक असते. परंतु गरिबांना महाग फळे विकत घेणे परवडत नाही. अशा वेळी सण वाराच्या निमित्ताने किंवा शक्य असेल तेव्हा गरजू लोकांना फळांचे दान करावे. त्यांच्या सदिच्छांपेक्षा मोठे फळ कोणते...?