आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल, अशी एकमेव व्यक्ती कोण आहे, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 08:00 AM2021-04-20T08:00:00+5:302021-04-20T08:00:06+5:30

एखाद्या गोष्टीचा शोध घेत आपण गावभर फिरतो, दुसऱ्यांचे मार्गदर्शन घेतो, सल्ले घेतो, पण मनाचा कौल घ्यायला विसरतो.

Find out who is the only person who can answer all your questions! | आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल, अशी एकमेव व्यक्ती कोण आहे, जाणून घ्या!

आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल, अशी एकमेव व्यक्ती कोण आहे, जाणून घ्या!

Next

थोरामोठ्यांच्या म्हणण्यानुसार, माणसाला सतत प्रश्न पडत राहणे, हे प्रगतीचे लक्षण आहे. परंतु आपण जस जसे मोठे होत जातो, तसतसे आपले कुतूहल वाढण्याऐवजी कमी कमी होत जाते. आपण आपल्या बुद्धीचा वापर कमी करतो आणि सांगकाम्यासारखे इतर सांगतील त्याचे अनुकरण करतो. त्यामुळे अनेक प्रश्न मनातल्या मनात विरून जातात किंवा अनुत्तरित राहतात. परंतु, अशी एक व्यक्ती आहे, जी आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर देऊ शकते. ती व्यक्ती कोण, ते या कथेतून जाणून घेऊया.

एक शिष्य भगवान बुद्धांजवळ आला आणि म्हणाला, `भगवान, मला एका प्रश्नाचे उत्तर हवे आहे. आपले मन शांत कसे ठेवावे?'
भगवान सांगतात, `मी आता एका कामात व्यस्त आहे, तू आश्रमातल्या दुसऱ्या एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला जाऊन हा प्रश्न विचार.'
शिष्य जातो. वयाने आणि अनुभवाने मोठे असलेल्या एका व्यक्तीला तोच प्रश्न विचारतो.
 
ती व्यक्ती सांगते, `माझे सकाळपासून डोके दुखत आहे. आता मी काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. तू आणखी कोणाकडे जा. तुला उत्तर मिळेल.'
शिष्य आणखी एक-दोघांना जाऊन भेटतो. पण सगळ्यांची आज अचानक डोकेदुखी, पोटदुखी, मानदुखी वाढलेली असते. शिष्य वैतागून भगवान बुद्धांजवळ येतो आणि सांगतो, `भगवान, आपल्या सांगण्यानुसार आश्रमातल्या तीन ज्येष्ठ व्यक्तींजवळ गेलो. तिघांनीही कारणे देऊन मला परतावून लावले. आता मी कोणाकडे जाऊ? म्हणून तुमच्याकडे परत आलो.'

भगवान म्हणतात, `अरे, त्या तिघांनी तुला उत्तर दिले, पण तूलाच ते कळले नाही. तिघे त्यांच्या व्यापात असल्याने त्यांनी सांगितले, तू आणखी कोणाकडे जा. ही व्यक्ती आणखी कोणी नसून, ती तू आहेस. तुझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला लोकांकडे वेळ नाही. तुझी उत्तरे तुलाच शोधायची आहेत. आणि तुला ती निश्चित मिळतील. यासाठी तुला तुझ्या अंतर्मनात डोकावले पाहिजे. आत्मसंवाद साधला पाहिजे. मनाचा आवाज ऐकला पाहिजे. ते शिकलास, की तुला तुझी उत्तरे मिळू लागतील.'

संत तुकाराम आपल्या अभंगात म्हणतात त्याप्रमाणे, `तुझे आहे तुजपाशी, परि तू जागा चुकलासी!' आपल्या प्रश्नांचा शोध आपण स्वत:मध्ये घेतला पाहिजे. स्वत:ला समजून घेतले पाहिजे. दुसरे सांगतात म्हणून नाही, तर कोणतीही गोष्ट आपल्याला पटत आहे का याची शाहनिशा केली पाहिजे. 

एखाद्या गोष्टीचा शोध घेत आपण गावभर फिरतो, दुसऱ्यांचे मार्गदर्शन घेतो, सल्ले घेतो, पण मनाचा कौल घ्यायला विसरतो. दिवसभरातील काही क्षण जर स्वत:शी हितगुज केली नाही, तर फार मोठा संवाद आपण गमावत आहोत, हे लक्षात ठेवले पाहिजे. कारण, सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी ती व्यक्ती दुसरी कोणी नसून आपण स्वत:च असतो!'

Web Title: Find out who is the only person who can answer all your questions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.