हनुमंताला कुंडलिनीचे प्रतीक का म्हटले असावे, जाणून घ्या.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 08:00 AM2021-05-15T08:00:00+5:302021-05-15T08:00:02+5:30
आपल्या देहाची म्हणजे पिंडाची रचना ब्रह्मांडाप्रमाणेच आहे. अशी आपली अध्यात्मिक धारणा आहे. पिंडी ते ब्रह्मांडी अशी म्हण त्यावरूनच पडली आहे.
ज्याप्रमाणे सप्त स्वर्ग व सप्त लोक पिंडात आहेत त्याप्रमाणे ब्रह्माण्डाला आधारभूत असणारी शक्ती मानवी शरीरातही आहे. तिलाच कुंडलिनी अशी संज्ञा आहे. संहिताभागात तिला आत्म्याची शक्ती, तर उपनिषदात देवात्मशक्ती असे म्हणतात. समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधात लिहिले आहे,
ब्रह्मांडी तेचि पिंडी असे, बहुत बोलती ऐसे,
परंतु याचा प्रत्यय विलसे, ऐसे केले पाहिजे
आपल्या देहाची म्हणजे पिंडाची रचना ब्रह्मांडाप्रमाणेच आहे. अशी आपली अध्यात्मिक धारणा आहे. पिंडी ते ब्रह्मांडी अशी म्हण त्यावरूनच पडली आहे. ब्रह्माण्डातील सर्व चौदा भुवने शरीराच्या वेगवेगळ्या अवयवात आहेत. संध्यादि कर्माच्या पूर्वी केल्या जाणाऱ्या न्यासाच्या जर सूक्ष्म अर्थ बघितला, तर त्या न्यासाची योजना ब्रह्मांडी ते पिंडी या तत्त्वावर केली आहे, असे लक्षात येईल.
हनुमानाने जन्मतःच सूर्यबिंबाचा ग्रास करण्यासाठी केलेले उड्डाण आणि कुंडलिनी शक्तीचे जागृत होताच ब्रह्मरंध्राच्या दिशेने होणारे उड्डाण या दोहोंवरून असा निष्कर्ष सहज येतो कि हनुमानाची जन्मकथा हे एक रूपक असून, कुंडलिनी जागृतीचे ते वर्णन आहे. कुंडलिनीच्या ब्रह्मरंध्रापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन करताना ज्ञानेश्वरांनी असे म्हटले आहे की, ती जेव्हा हृदय स्थानाच्या पुढे जाते, तेव्हा वायूने सुवर्णरुपी वस्त्राचा त्याग करावा व तो अदृश्य व्हावा, त्याप्रमाणे कुंडलिनी अदृश्य होते, वायुरूप धारण करते. हनुमानाचे वायुरूप तेच आहे. मूलाधारातून सहस्रार गाठणे हीच हनुमानाची जन्मकाळाची अलौकिक उडी आहे. या उल्लेखांवरून हनुमान हे कुंडलिनीचेच प्रतीक असल्याचे सिद्ध होते. त्याला पुष्टी देणारी आरती समर्थ रामदास स्वामींनी लिहिली आहे.
त्या हनुमानाचा आदर्श ठेवून आपणही आपली कुंडलिनी जागृत करण्याचा आणि सत्राणें उड्डाणे घेण्याचा प्रयत्न करूया.