मारुती स्तोत्रात समर्थ रामदासांनी हनुमंताला 'धूर्त वैष्णवगायका' असे का संबोधले आहे, जाणून घ्या!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: April 3, 2021 08:00 AM2021-04-03T08:00:00+5:302021-04-03T08:00:06+5:30
शत्रूशी वागण्याचा धुर्तपणा त्याच्या ठायी होता आणि स्वामी भक्तीचे गायन करण्याचा नम्र भावही त्याच्याजवळ होता, म्हणून समर्थ त्याला धूर्त वैष्णव गायका म्हणतात.
धूर्त या शब्दाला नकारात्मक छटा आहे. एखादी व्यक्ती फसवी असेल, लबाड असेल तर तिला आपण धूर्त म्हणतो. परंतु, हनुमंताची स्तुती करणारे मारुती स्तोत्र, त्यात समर्थ रामदास स्वामींना धूर्त शब्द का वापरावा वाटला असेल?
हनुमंत हा शक्ती, भक्ती आणि युक्तीचा समन्वय साधणारा रामभक्त आहे. कुठे कोणत्या प्रकारे शक्ती प्रदर्शन करावे, कुठे युक्ती प्रदर्शन करावे आणि कुठे भक्ती प्रदर्शन करावे, हे त्याला बरोबर ठाऊक होते. लंकेत सीता माईचा शोध घ्यायला गेलेल्या हनुमंताला सीता माईला कैद केलेली पाहून प्रचंड मनःस्ताप झाला. त्याने रावणाची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्याला आपल्या स्वामींचा संदेश दिला. परंतु अहंकारी रावणाने शांतिदूत म्हणून आलेल्या हनुमंताला बसायला आसन तर दिले नाहीच, पण त्याने रावणाच्या सुंदर वाटीकेची नासधूस केली म्हणून शेपटीला आग लावण्याची शिक्षा दिली. परंतु हनुमान घाबरला नाही. उलट त्याने स्वतःची शेपूट गोलाकार रचून रावणापेक्षा उंच आसन तयार केले आणि त्यावर जाऊन तो बसला. यातून त्याने शिकवण दिली, कोणी कितीही वाईट वागणूक दिली तरी आपल्याला आपले स्थान निर्माण करता आले पाहिजे.
हनुमंत स्वरचित आसनावर बसला. ते आसन उंचावर नेऊन रावणाला मान वर करून बोलायला भाग पाडले. एवढे करून आपल्या स्वामींची स्तुती बेधडकपणे रावणाच्या दरबारी गायली आणि निघता निघता सोन्याची लंका आपल्या जळलेल्या शेपटीने पेटवून शत्रूचे नुकसान केले.
शत्रूशी वागण्याचा धुर्तपणा त्याच्या ठायी होता आणि स्वामी भक्तीचे गायन करण्याचा नम्र भावही त्याच्याजवळ होता, म्हणून समर्थ त्याला धूर्त वैष्णव गायका म्हणतात. गाणे तुम्ही आम्ही सुद्धा गातो. पण ते आपल्या घरात किंवा समारंभात. परंतु शत्रूच्या गोटात शिरून आपल्या स्वामींचे गुणगान करण्यासाठी प्रखर स्वामीभक्ती असावी लागते, ती हनुमंताजवळ होती, म्हणून तो श्रेष्ठ रामभक्त म्हणवला जातो...!