दत्तगुरुंच्या चोवीस गुरुंपैकी पहिला गुरु : पृथ्वी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 01:26 PM2020-12-11T13:26:51+5:302020-12-11T13:27:15+5:30
रोज सकाळी उठल्यावर आपण, 'करागे वसते लक्ष्मी' या श्लोकाने सुरुवात करत, 'पादस्पर्शं क्षमस्वमे' म्हणत श्लोक पूर्ण करतो आणि मातृभूमीला ...
रोज सकाळी उठल्यावर आपण, 'करागे वसते लक्ष्मी' या श्लोकाने सुरुवात करत, 'पादस्पर्शं क्षमस्वमे' म्हणत श्लोक पूर्ण करतो आणि मातृभूमीला वंदन करतो आणि आपल्या दिवसाची सुरुवात करतो. हे वंदन का, कशासाठी? यात केवळ कृतज्ञता भाव आहे, की आणखीही काही? याच गोष्टींचा विचार करत दत्तगुरुंनी जे चोवीस गुरु केले, पैकी प्रथम स्थान पृथ्वीला दिले. चोवीस गुरुंचा सविस्तर परिचय देवदत्त परुळेकर देतात-
आता कोणत्या गुरुकडून कोणता गुण घेतला याचे वर्णन अवधुताने करायला सुरुवात केली. अवधुताचा पहिला गुरु कोणता, तर पृथ्वी!
परमार्थी मुख्य शांती, साधकांसी पाहिजे निश्चिती
यालागी प्रथम गुरु क्षीती, निजशांतीलागूनि।
अवधूत म्हणतो, परमार्थामध्ये शांती मुख्य असल्यामुळे साधकाच्या अंगी ती निश्चितपणे असायला पाहिजे. शांतीसाठी अवधूताने पृथ्वीला गुरु केल. अंत:करण आवरणे म्हणजे शांती. बाह्य इंद्रिये आवरणे म्हणजे दांति आणि द्वंद्वे सहन करणे म्हणजे क्षांति होय. क्षांति शिकण्यासाठी क्षितीला म्हणजे धरतीला गुरु करावे.
हेही वाचा : जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु म्या केला जाण- दत्तगुरुंचे चोवीस गुरु; लेखमाला!
अनेक प्रकारचे प्राणी माझी माझी म्हणत पृथ्वीवर हक्क दाखवतात. आपापल्या स्वभावानुसार अनेक प्रकारे तिचे तुकडे करत. परंतु आपले एकपण न मोडता ती नेहमी अखंड राहते. आणि सर्व जीवांचे भिन्नभिन्न व्यवहार व्यापार चालवते. आपणच सर्वत्र आत्मरूपाने सर्व प्राण्यांमध्ये व्यापून आहोत, हे अनुभवल्यामुळे योग्याला द्वंद्वाची बाधा होत नाही. येथे एका सुंदर हिंदी गीताच्या ओळी आठवतात-
मंदीर, मस्जिद, गिरीजाघरमें बाँट लिया भगवानको,
धरती बाँटी, सागर बाँटे, मत बाँटो इन्सानको।
जिथे तुकडे आहेत, द्वंद्व आहे, तेथे परमार्थ नाही. खरा धर्म नाही हे प्रत्येक धर्माच्या उपासकाने लक्षात घेतले पाहिजे. कोणी पूजा केली किंवा मलमूत्र करून गांजली तरी पृथ्वीला एकाचा हर्ष नाही वा दुसऱ्याचा विषाद नाही. आपल्या शांतीमुळे ती अगदी निश्चल राहते. अग्नी पेटवून पृथ्वी जाळली किंवा नांगर घालून फाळली, विंâवा लाथा मारून तोडली, झाडली तरी तो अपराध मनात न आणता ती प्राण्यांवर प्रसन्न होऊन नाना प्रकारच पिके पिकवून उदर भरण करते. तृप्त करते. अशा प्रकारच्या अभिनव शांतीसाठी पृथ्वीला गुरु करावे.
माणगावचे श्रेष्ठ दत्तभक्त पू. टेंबे स्वामी म्हणजेच श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी श्री दत्तमहात्म्य या ग्रंथाची रचना केली आहे. या ग्रंथातही दत्तात्रेयांच्या चोवीस गुरुंचे वर्णन स्वामींनी केले आहे. स्वामी धरणीमातेच्या तोंडून सांगतात-
सर्वथा मी मातेपरी, हे जीव पोरापरी,
यांत काही केले तरी, म्या अंतरी न धरावे।