आधी गुरुपारख, मगच गुरुसेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 02:56 PM2020-12-10T14:56:29+5:302020-12-10T14:57:32+5:30

गुरुभक्ती करायची म्हणजे काय? त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरुची सेवा असे तुम्हाला वाटते का? त्याच्या देहाची सेवा करणे ही गुरुची सेवा करणे नसते. गुरु सांगेल तसे वागणे, हीच त्याची खरी सेवा.

First Guruparakh, then Guruseva! | आधी गुरुपारख, मगच गुरुसेवा!

आधी गुरुपारख, मगच गुरुसेवा!

googlenewsNext

सद्यस्थितीत स्वयंघोषित गुरुंची संख्या वाढत चालली आहे. त्याला कारण असतात, ते म्हणजे त्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवणारे भक्तगण. गुरु श्रद्धेला खतपाणी घालतात, अंधश्रद्धेला नाही. ते शिष्याचे चित्त स्थिर करतात, अस्थिर नाही. ते शिष्याला चिरंतन आनंदाची वाट दाखवतात, समस्येवर तात्पुरता उपाय देत नाहीत. या सर्व गोष्टी लक्षात घेण्यासाठी शिष्याची सद्सदविवेकबुद्धी शाबुत असायला हवी. गुरु ज्याप्रमाणे शिष्याची पारख करून घेतात, तशी शिष्यानेही डोळसपणे आपले गुरु निवडले पाहिजेत. चुकीचे गुरु भेटले, तर आयुष्य चुकीच्या वळणावर जाऊ शकते. म्हणून गुरुंशी विचारपूर्वक स्नेह जोडावा आणि मगच त्यांची आत्मियतेने सेवा करावी. ती सेवा कशास्वरूपाची असायला हवी, हे सांगत आहेत, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज.

हेही वाचा : हिताचिया गोष्टी सांगू एकमेका, शोक, मोह, दु:खा निरसू तेणे -चांगल्या गोष्टींचे 'शेअरिंग' महत्त्वाचे! (पूर्वार्ध)

साधनाची आटाआटी कुठपर्यंत करायची? जप, तप, नेम, याग वगैरे आपण कशाकरिता करतो? तर देवाची प्राप्ती व्हावी म्हणून! तोच देव जर आपल्या घरी आला, तर साधनाची आटाआटी कशाला करायची? म्हणून साधनाची आटाआटी करण्याचे कारणच नाही. नाहीतर त्याचाच अभिमान होतो आणि मिळवायचे ते बाजूलाच राहून उलटा तोटा होतो. जे जे घडत असते, ते ते माझ्याच इच्छेने झाले, असे समजत जा आणि त्यात आनंद माना. तुम्ही जी जी गोष्ट कराल त्यात मला आठवा. गुरुभक्ति करायची म्हणजे काय? त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरुची सेवा असे तुम्हाला वाटते का? त्याच्या देहाची सेवा करणे ही गुरुची सेवा करणे नसते. गुरु सांगेल तसे वागणे, हीच त्याची खरी सेवा.

माझ्याजवळ जे येतात, ते कुणी मुलगा मागतात, कुणी संपत्ती मागतात, कुणी रोग बरा होऊदे म्हणतात. म्हणजे माझी सेवा करायला तुम्ही येता, की तुमची सेवा करवून घ्यायला तुम्ही येता? माझ्याजवळ येऊन मनुष्यदेहाचे सार्थक होईल असे करा. तुम्ही मागाल त्याप्रमाणे मी देणार नाही असे ना, पण ते काढा घेण्याकरीता गुळाचा खडा देण्यासारखे आहे. 

मला सर्व कळते असे माझ्याबद्दल तुम्ही म्हणता, पण ते मनापासून नव्हेच, कारण ज्याला असे खरोखरच वाटत असेल, त्याच्या हातून पापकर्म होणारच नाही. ज्याची वृत्ती माझ्याशी एकरूप होईल त्यालाच कळले की, मला सर्व कळते आहे. गुरुला अनन्य शरण जाणे म्हणजे इतके की त्याचे मन आणि आपले  एक झाले पाहिजे. म्हणजे दैववशात जरी आपण गुरुपासून दूर असलो तरी मनाने त्याच्याशी संलग्न असल्यावर त्याच्यापाशीच असू. आपण आपल्या आईशी जसे बोलतो तसे माझ्यापाशी बोलावे, आपले सर्व दु:ख मला सांगत जावे. तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता, पण तुम्हाला रिकामे परत जाताना पाहून मला वाईट वाटते. माझ्याजवळ जे आहे ते व्यावहारिक जगात कुठेही तुम्हाला मिळायचे नाही. ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम. सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल, तर ती नामस्मरणात आहे. ज्याला मी भेटावा असे वाटते, जो माझा म्हणवतो, त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे. 

हेही वाचा : हिताचिया गोष्टी सांगू एकमेका, शोक, मोह, दु:खा निरसू तेणे -चांगल्या गोष्टींचे 'शेअरिंग' महत्त्वाचे! (उत्तरार्ध)

Web Title: First Guruparakh, then Guruseva!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.