२०२४ चे पहिले चंद्रग्रहण: मार्च महिन्यात कधी आहे ग्रहण? पाहा, सूतक काल अन् मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 01:12 PM2024-03-03T13:12:03+5:302024-03-03T13:12:49+5:30
First Lunar Eclipse Chandra Grahan 2024: हे ग्रहण भारतात कुठे दिसणार? मार्चमधील यंदाच्या पहिल्या चंद्रग्रहणाविषयी जाणून घ्या...
First Lunar Eclipse Chandra Grahan 2024: सन २०२४ चा मार्च महिना सुरू झाला आहे. या वर्षीचे पहिले चंद्रग्रहण मार्च महिन्यात लागणार आहे. वास्तविक पाहता चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे. पौर्णिमेच्या दिवशी सूर्याची चंद्राशी प्रतियुती असते चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी येते, पृथ्वीची चंद्रावर सावली पडते, तेव्हा चंद्रग्रहण लागते, असे म्हटले जाते. चंद्रग्रहणाचे विविध प्रकार सांगितले जातात. २०२४ मधील पहिले चंद्रग्रहण कधी आहे? भारतात कुठे दिसणार? स्पर्श, मध्य आणि मोक्ष वेळा जाणून घ्या...
सूर्य-चंद्राची युती किंवा प्रतियुती राहू किंवा केतू या बिंदूजवळ होईल तेव्हाच ग्रहणे होतात. म्हणजेच सूर्य अमावास्येला अगर चंद्र पौर्णिमेला राहुच्या किंवा केतुच्या जवळच असावा लागतो. प्रत्येक अमावास्या आणि पौर्णिमेला ग्रहण लागत नाही. २५ मार्च २०२४ रोजी फाल्गुन पौर्णिमेला पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. या दिवशी धुलिवंदन आहे. तर, दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी फाल्गुन पौर्णिमा समाप्त होणार आहे. फाल्गुन पौर्णिमेला लागणारे हे चंद्रग्रहण छायाकल्प प्रकारातील चंद्रग्रहण आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आताच्या घडीला राहु मीन राशीत तर केतु कन्या राशीत आहे. ग्रहणावेळी चंद्र कन्या राशीत असेल, त्यामुळे या पौर्णिमेला चंद्रग्रहण लागेल, असे सांगितले जात आहे.
कधी दिसेल चंद्रग्रहण?
चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीभोवतीच्या फिकट सावलीतून प्रवास झाला, तर उपछाया चंद्रग्रहण दिसते. उपछाया चंद्रग्रहणाच्या वेळी पौर्णिमेच्या तेजस्वी चंद्राचा प्रकाश काहीसा मंदावलेला दिसतो. जेव्हा चंद्र पूर्णपणे लपत नाही आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडत नाही तेव्हा त्याला छायाकल्प चंद्र ग्रहण म्हणतात. हे चंद्रग्रहण २५ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी सुरू होणार असून, दुपारी ०३ वाजून ०२ मिनिटांपर्यंत छायाकल्प चंद्रग्रहण असणार आहे. मात्र, हे चंद्रग्रहण भारतात कुठेही दिसणार नाही. चंद्रग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे कोणतेही वेधादि नियम पाळू नयेत, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, पौर्णिमेला केले जाणारी पूजा-अर्चा नियमित पद्धतीने केली जाऊ शकते. कोणत्याही प्रकारची खाण्यापिण्याची पथ्ये पाळली नाही, तरी चालतील. धार्मिक पथ्ये किंवा अन्य पथ्ये पाळावीत, असे सांगितले जात नाही. तसेच ग्रहणाचे वेधादि नियमही पाळू नये, असे सांगितले जाते. हे चंद्रग्रहण आयलँड, इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल, हॉलँड, बेल्जियम, नॉर्वे, स्वित्झलँड, इटली, जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, जपान, रशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, पॅसिफिक, अटलांटिक, आर्क्टिक आणि अंटार्क्टिका या भागांमध्ये दिसू शकेल, असे समजते.