पहिला श्रावणी रविवार: सूर्योपासनेचे महत्त्व सांगणारे आदित्य राणूबाई व्रत, ‘असे’ करावे पूजन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 10:38 AM2024-08-10T10:38:43+5:302024-08-10T10:41:09+5:30
Shravan Ravivar Aditya Ranubai Vrat 2024: पहिल्या श्रावण रविवारी आदित्य राणूबाई व्रत करण्याची प्रथा आहे. हे व्रताचरण कसे करावे? काही कारणास्तव शक्य झाले नाही तर काय करावे? जाणून घ्या...
Shravan Ravivar Aditya Ranubai Vrat 2024: चातुर्मासातील महत्त्वाचा मानला गेलेला श्रावण मास सुरू आहे. श्रावणातील व्रते, सण यांना केवळ धार्मिक, सांस्कृतिक महात्म्य आहे असे नाही, तर आरोग्य तसेच निसर्गाच्या दृष्टीनेही तितकेच महत्त्व आहे. हे सण साजरे करण्यामागे, तशाच पद्धतीने व्रताचरणामागे विशेष भूमिका आपल्या पूर्वजांची असलेली पाहायला मिळते. श्रावणी सोमवार, मंगळागौर, बुध-बृहस्पति पूजन, जिवतीची पूजा, नृसिंह अश्वत्थ मारुती पूजन झाल्यानंतर श्रावणातील पहिला रविवार येत आहे. या दिवशी आदित्य राणूबाई व्रत केले जाते. जाणून घेऊया...
सूर्योपासनेचे महत्त्व अधोरेखित करणारे हे व्रत आहे. श्रावणात ऊन पावसाचा खेळ सुरू असतो. सूर्यदर्शन कधीतरी घडते. अशावेळी कोवळी उन्हे अंगावर घेता यावे, तसेच सूर्यपूजेचे महत्त्व सांगणारेही हे व्रत आहे. श्रावणातील रविवारी हे व्रत करण्याची प्रथा आहे. हे स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे. स्नानानंतर विड्याच्या पानावर सूर्याचे चित्र रक्तचंदनाने काढावे. बाजूला एका वर्तुळात षटकोन काढावा. नंतर सहापदरी दोऱ्याला सहा गाठी माराव्यात. सूर्यचित्र, षटकोन आणि सहा गाठी मारलेला सहापदरी दोरा या सर्वांची एकत्रित पूजा करावी, असा व्रतविधी सांगण्यात आला आहे.
या व्रतानंतर पुन्हा गतवैभव लाभले
राणूबाई ही सूर्याची पत्नी. तिची पूजा या व्रतात केली जाते. तिची कथा न ऐकल्याने एका राणीला दारिद्र्यावस्था प्राप्त झाली. तिला या गोष्टीचा खूप पश्चात्ताप झाला. यानंतर तिने आदित्य राणूबाईची पूजा केली. व्रताचा संकल्प करून आदित्य राणूबाईचे मनोभावे पूजन केले. या व्रतानंतर तिला पुन्हा गतवैभव लाभले. अशा आशयाच्या कथा आढळून येतात.
महाराष्ट्रात आदित्य राणूबाई व्रताची विशेष परंपरा
महाराष्ट्रातील खानदेशात हे व्रत विशेष प्रचलित आहे. खानदेशातील बऱ्याच घरांमध्ये कुठल्याही मंगलकार्याच्या आधी राणूबाई आणि सूर्याचे लग्न लावण्याची रीत आहे. कुठल्या ना कुठल्या रूपात सूर्यपूजा करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत आहे. त्यापैकी ही एक प्रथा म्हणावी लागेल. श्रावण महिना हा उपवासांचा, व्रत-वैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. साहजिकच श्रावणी रविवार हा आदित्य-राणूबाईंच्या पूजेसाठी राखला गेला असावा. ज्यांना शक्य असेल, त्यांनी विधिवत हे व्रत करावे. शक्य नसेल, त्यांनी स्नानादी नित्यकर्म करून सूर्य आणि राणूबाईंची मानसपूजा करून गायत्री मंत्रजप करावा, असे सांगितले जात आहे.
आदित्य राणूबाई व्रत करणे शक्य नसेल तर...
आदित्य राणूबाई व्रत करणे शक्य नसल्यास श्रावणातील प्रत्येक रविवारी आदित्याची पूजा करुन त्याला खिरीचा नैवेद्य दाखवावा. केवळ श्रावणातील रविवारी नाही, तर वर्षभरातील सर्व रविवारी सूर्यपूजा करावी. मात्र, शास्त्रोक्त पूजन शक्य नसल्यास केवळ भक्तिपूर्वक नमस्कार करावा. दुपारी बारा वाजण्याच्या आधी गायत्री मंत्राचा यथाशक्ती जप करावा, असे सांगितले जाते.