Food Habit: रोजच्या अन्नात प्रसादत्त्व उतरावे म्हणून जेवणाआधी म्हणा 'हा' श्लोक; आजारपणापासून होईल सुटका!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 01:38 PM2023-11-08T13:38:43+5:302023-11-08T13:41:26+5:30
Food Habit: जेवणासंबंधीचा हा श्लोक तुम्ही पाठ केलात आणि मुलांकडून करून घेतलात तर अन्न फेकण्यासाठी कधीच धजावणार नाही; मुलांनाही जरूर शिकवा.
अन्न हा आपल्या जीवनाचा सर्वात अविभाज्य भाग आहे. हे जीवन अन्नाच्या जोरावरच चालत आहे. सजीवांमध्ये जीवन आणि चैतन्य अन्नामुळे आहे. अन्न आपल्या शरीराला ऊर्जा देते, म्हणून ते घाईघाईत सेवन न करता शांतपणे सेवन केले पाहिजे आणि ज्याच्या कृपेने दोन वेळचा घास पोटात जात आहे त्या भगवंताचे आभार मानले पाहिजेत. ते अन्न आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या शेतकरी दादाचे आणि आपल्या ताटात सुग्रास भोजन वाढणाऱ्या सुगरणीचे स्मरण करून मगच अन्नाचे सेवन केले पाहिजे. तसे केले असता अन्न वाया न घालवण्याची जबाबदारी आपोआपच आपल्यावर येईल आणि रोजचेच जेवण प्रसादरूपी गोड वाटेल.
सद्यस्थितीत आपले जीवन एवढे धावपळीचे झाले आहे की दोन घास जेवतानाही आपण शांत पणे जेवण करत नाही. हाताशी मोबाईल, समोर टीव्ही, फोनवर गप्पा मारत जेवतो. त्यामुळे अन्नाचे नीट पचन होत नाही आणि विविध आजार उद्भवतात. मात्र, अन्न सेवनाबाबत अन्नशास्त्रात अनेक नियम सांगितले आहेत. त्याचे पालन केले असता शरीरावर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.
अन्न कसे खावे आणि त्यापूर्वी आणि नंतर कोणत्या गोष्टींचे सेवन टाळावे याबद्दल धर्मग्रंथात सविस्तर माहिती दिली आहे. त्यात म्हटल्यानुसार -
अन्नं ब्रह्मा रसो विष्णुः पक्ता देवो महेश्वरः.
एवं ज्ञात्वा तु यो भुड़्क्ते अन्नदोषो न लिप्यते
अर्थ: अन्न स्वतः ब्रह्म आहे आणि अन्नापासून बनलेला रस विष्णू आहे. शिजवलेले, परिपक्व अन्न हे महेशाचे रूप आहे. जे जाणून घेत कृतज्ञतेने अन्नसेवन करणाऱ्याला अन्नात दोष दिसत नाहीत आणि अन्नातून दोष निर्माणही होत नाहीत. म्हणून जेवणाआधी देवाचे नाव घेतले पाहिजे.
आता हा श्लोक जाणून घेतल्यावर काय करायचे आहे, की जेंव्हा जेवणाचे ताट तुमच्या समोर येईल तेंव्हा सर्वात आधी हातात पाणी घ्या. ताटाभोवती पाणी फिरवा आणि तसे करताना हा श्लोक म्हणा. यांनतर गोविंद-गोविंद म्हणत अन्नसेवन करा. ऋषीमुनी तर दावा करतात, की श्लोकात दिलेल्या भावनेसह अन्नग्रहण करणाऱ्याला कधीही कोणतेही रोग होत नाहीत. यात चमत्काराचा भाग नसून सावधतेचा भाग आहे. आपण जेवणा आपल्या अन्नसेवनाबद्दल जागरूक होऊ, तेव्हा अतिरिक्त जेवणार नाही, जेवणात काही त्रुटी असतील तर त्या बाजूला करून अन्नसेवन करू. जेवढे लागेल तेवढेच अन्न घेऊ, त्यामुळे आपोआपच शरीराला दुष्परिणाम अनुभवावे लागणार नाहीत आणि शरीर, मन कायम प्रफुल्लित राहील.
हे नियम देखील पाळा
लक्षात ठेवा की शक्यतो मांडी घालून जमिनीवर बसावे. ज्येष्ठांना खाली बसणे जमणार नसेल तर त्यांनी टेबल खुर्चीचा आधार घ्यावा. दक्षिणेकडे तोंड करून अन्न खाऊ नये. जेवण करण्यापूर्वी ते देवाला अर्पण करून प्रसाद म्हणून घ्यावे. त्यामुळे आपोआप आपल्या अन्नातही प्रसादत्त्व उतरते. अन्न खाताना चकरा मारू नये. दुपारचे जेवण सकाळी ११ ते दुपारी १.00 दरम्यान जेवावे आणि संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी जेवणे उचित ठरते. जर तुम्ही या नियमांचे पालन केले तर अन्न नेहमीच फायदेशीर ठरेल आणि शरीराचे पोषण वाढेल.