घरात वैभवलक्ष्मी नांदावी यासाठी वास्तू शास्त्रात दिल्यानुसार मिठाचा वापर अवश्य करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 12:40 PM2022-02-15T12:40:57+5:302022-02-15T12:41:30+5:30
मीठ समुद्रातून मिळते त्यामुळे त्याला लक्ष्मीचा भाऊ म्हटले जाते. त्याचा वापर केल्याने घरात वैभवलक्ष्मी नांदते असे म्हणतात. त्यासाठी उपाय कोणते, हे जाणून घेऊया.
मीठ हा आपल्या जेवणाचा आणि जिवनाचा अविभाज्य भाग आहे. मीठ जास्त असेल, तर पदार्थ खारट आणि नसेल तर पदार्थ अळणी होतो. म्हणून त्याचे प्रमाण संतुलित असावे लागते. जिवनातही प्रत्येक गोष्टीचा वापर मीठासारखा संतुलित प्रमाणात करावा लागतो. मिठाला केवळ अन्नशास्त्रात नाही, तर वास्तुशास्त्रातही आगळे वेगळे स्थान आहे. मीठाचे साधे सोपे उपाय करून वास्तुदोष दूर करता येतात, असे वास्तुशास्त्रज्ञ सांगतात. मीठ समुद्रातून मिळते त्यामुळे त्याला लक्ष्मीचा भाऊ म्हटले जाते. त्याचा वापर केल्याने घरात वैभवलक्ष्मी नांदते असे म्हणतात. त्यासाठी उपाय कोणते, हे जाणून घेऊया.
मीठाने दूर होते नकारात्मक ऊर्जा:
आपल्या अवती भोवती ऊर्जेचे वलय असते. ते वलय सकारात्मक असेल, तर कामाला गती मिळते आणि नकारात्मक असेल, तर कामे खोळंबतात. घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश झाला, तर सतत वाद विवाद, कलह होत राहतात. यासाठी मीठाचा वापर सुचवला आहे. आपल्या घराच्या बाथरूममध्ये छोट्या वाटीत खडे मीठ ठेवावे. घरातील नकारात्मक ऊर्जा मीठ शोषून घेते. तसेच घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहते. घरातील दोष दूर होत नाहीत, तोवर हा प्रयोग दर काही काळाने करत राहावा.
मीठ आणि लवंग :
मीठ आणि लवंग यांचा एकत्रित वापर वास्तूसाठी अतिशय परिणामकारक ठरतो. एका छोट्या वाटीत नैसर्गिक मीठ आणि चार ते पाच लवंगा एकत्र करून ती वाटी घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात ठेवून द्यावी. या प्रयोगाने घरातील केवळ नकारात्मक ऊर्जा नष्ट होत नाही, तर आर्थिक अडचणीदेखील कमी होऊ लागतात. मीठ आणि लवंग यांच्या मिश्रणाचे पाणी घरात फवारले असता हलका सुगंध दरवळत राहतो.
मीठाच्या पाण्याने आंघोळ :
आपल्याला जेव्हा खूपच थकवा येतो, तेव्हा आपण गरम पाण्यात मीठ घालून पाय बुडवून ठेवतो. तसे केल्याने शरीरातील थकवा चुटकीसरशी दूर होतो. हाच प्रयोग आपण आंघोळीच्या वेळेस केला, तर त्याचाही निश्चितच फायदा होऊ शकेल. आठवड्यातून एक दिवस आंघोळीच्या गरम पाण्यात थोडेसे मीठ घालून आंघोळ करून पाहा. शरीराला आलेली मरगळ, मनावर चढलेला आळस दूर होऊन मन आणि शरीर प्रसन्न होईल.
मीठाचे पाणी :
घरात विविध कोपऱ्यात मीठ मिसळलेले पाणी ठेवावे. त्यामुळे वास्तुदोष दूर होतात. परंतु, हे पाणी कुठेही सांडणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. तसेच दर आठवड्याला ते पाणी बाथरूममध्ये ओतून नव्याने पाणी ठेवावे.
मीठाने स्वच्छता :
मीठ हा स्वच्छता करणारा नैसर्गिक घटक आहे. घरात शोभेसाठी ठेवलेल्या मूर्ती वरचेवर काळवंडत असतील, तर त्या मीठाने धुवून पहा, लख्ख होतील. मूर्तींकडे पाहून आपसुखच सकारात्मक ऊर्जा जाणवेल.