'भूतकाळ विसरा, भविष्य तुमची वाट बघतंय' सांगताहेत भगवान बुद्ध!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 07:00 AM2022-07-08T07:00:00+5:302022-07-08T07:00:02+5:30

भूतकाळात अडकून भविष्यात येणाऱ्या अनेक संधी आपण गमावून बसतो, यासाठी पुढील गोष्ट वाचा.

'Forget the past, the future awaits you' says Lord Buddha! | 'भूतकाळ विसरा, भविष्य तुमची वाट बघतंय' सांगताहेत भगवान बुद्ध!

'भूतकाळ विसरा, भविष्य तुमची वाट बघतंय' सांगताहेत भगवान बुद्ध!

googlenewsNext

भविष्याकडे वाटचाल करताना अनेकदा भूतकाळ आडवा येतो. मात्र भूतकाळामुळे भविष्यच नाही, तर वर्तमानाचा विकासही थांबतो. म्हणून शक्य तेवढ्या लवकर भूतकाळातील गोष्टी विसरून वर्तमानकाळावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हे सोपे नाही, परंतु अशक्यही नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ते प्रयत्न कसे असायला हवेत, वाचा ही गोष्ट!

भगवान गौतम बुद्ध यांच्या असंख्य शिष्यपरिवारापैकी दोन शिष्य भिक्षा मागण्यासाठी गावात गेले होते. गाव मठापासून दूर होते. पावसाचे दिवस होते. सायंकाळी लवकर काळोख होत होता. अशात आभाळ आले आणि काही क्षणात पावसाला सुरुवात झाली. भिक्षा मिळवली होती, परंतु पाऊस थांबण्याची वाट पाहत बसलो, तर मठात पोहोचायला उशीर झाला असता. 

त्या दोघांपैकी एक भिखू तरुण तर दुसरा थोडा बुजूर्ग होता. दोघांनी पावसात भिजत भिजत पुढे निघायचे ठरवले आणि दोघे चालू लागले. वाटेत एक नदी होती. पावसाच्या पाण्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढत होती. आणखी पूर येण्याआधी नदी ओलांडलेली बरी, अशा बेताने दोघे जण नदी पार करण्यासाठी कटीबद्ध झाले.

तेवढ्यात काही अंतरावरून एका तरुणीचा आवाज आला. त्या दोघांनी मागे वळून पाहिले, तर एक तरुणी राजकुमारीसारखा पोशाख आणि अलंकार लेवून मदतीसाठी विनवणी करत होती. दोन्ही शिष्यांना अडवून ती त्यांच्याजवळ पोहोचली. तिने राजकुमारी म्हणून आपली ओळख करून दिली आणि शिकारीसाठी आले असताना शिपायांशी ताटातूट झाली, असे तिने सांगितले. नदीच्या पलीकडे आपल्या वडिलांचा राजवाडा आहे आणि ते आपली वाट बघत असतील. कृपया नदी ओलांडण्यासाठी सहाय्य करावे, असे ती सांगू लागली. 

वास्तविक पाहता संन्यस्त जीवन जगणाऱ्या व्यक्तीने परस्त्रीला स्पर्श करू नये, असा नियम होता. परंतु, तिला मदतीची गरज आहे पाहून तरुण भिखूने तिला खांद्यावर घेत नदी पार करून दिली. पाठोपाठ ज्येष्ठ भिखूदेखील चालत आले. 

दोघेजण मठात पोहोचले. तरुण भिखूने परस्त्रीला स्पर्श केला आणि आजवरची शिकवण वाया घालवली, याचा राग ज्येष्ठ भिखूंच्या मनात होता. रागारागात ते जेवले आणि जेवण झाल्यावर त्यांनी भगवान बुद्धांची भेट घेतली. त्यांना घडलेला प्रसंग सांगितला आणि तरुण भिखू शिष्य म्हणून कामाचे नाहीत, हे पटवून दिले. 

त्यांचे सर्व बोलणे ऐकून भगवानांनी तरुण भिखूला बोलावून घेतले आणि परस्त्रीला स्पर्श केला का, अशी विचारणा केली. त्यावर थोडासा डोक्यावर ताण देत तरुण भिखू म्हणाला, `हो भगवान, मी राजकुमारीला मदत म्हणून खांद्यावर घेतले आणि नदी पार करून तिला तिच्या मार्गाने जाऊ दिले. माझ्या खांद्यावरून राजकुमारी कधीच उतरली, परंतु ज्येष्ठ भिखू अजूनही राजकुमारीला घेऊन इथवर आले आहेत. म्हणजे ओझे कोण वाहतेय ते तुम्हीच ओळखा!'

तरुण भिखुच्या बोलण्यावर मंद स्मित करून भगवान, ज्येष्ठ भिखुला उद्देशून म्हणाले, `परस्त्रीला मदत करण्यासाठी केलेला स्पर्श आणि वासनेने केलेला स्पर्श यात खूप अंतर आहे. तरुण भिखूने मदत केली आणि तो विसरूनही गेला. तुम्ही मनावर ओझे ठेवत त्याची तक्रार केलीत. याचा अर्थ तुम्ही त्या राजकुमारीला प्रत्यक्ष स्पर्श न करताही खांद्यावर घेऊन वावरलात. असे वागण्याची दिक्षा मी दिली नाही. तुम्ही एवढी वर्षे मठात काढूनही जो बोध घेतला नाहीत, तो तरुण भिखूने घेतला. चांगले कार्य करा आणि विसरून जा. भूतकाळात अडकून राहिलात तर आयुष्यात पुढे कधीच जाऊ शकणार नाही. सदैव दुसऱ्यांना मदत करा आणि केलेल्या मदतीची जाणीवही मनातून पुसून टाका. तरच आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकाल.

Web Title: 'Forget the past, the future awaits you' says Lord Buddha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.