चौथा श्रावणी सोमवार: ‘ही’ शिवामूठ वाहावी, शिवपूजनाची सोपी पद्धत; पाहा, महात्म्य अन् महत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 08:24 AM2024-08-24T08:24:23+5:302024-08-24T08:24:47+5:30
Forth Shravani Somvar 2024: चौथ्या श्रावणी सोमवारी श्रीकृष्ण जयंतीचा शुभ योग जुळून आला आहे. कोणती शिवामूठ वाहावी? व्रताचरण कसे करावे? जाणून घ्या...
Forth Shravani Somvar 2024: श्रावण महिना आता हळूहळू सांगतेकडे आला आहे. २६ ऑगस्ट रोजी चौथा श्रावणी सोमवार आहे. याच दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे हरि-हराचे पूजन एकाच दिवशी केले जाणार आहे. या दिवशी अनेकविध अद्भूत, शुभ जुळून येत आहेत. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. चौथ्या श्रावणी सोमवारची पूजा कशी करावी? व्रताचरणाची सोपी पद्धत तसेच कोणती शिवामूठ वाहावी, ते जाणून घेऊया...
श्रावणात शिवशंकराची उपासना, आराधना आणि पूजन करण्याची प्राचीन परंपरा असल्याचे पाहायला मिळते. श्रीविष्णूंच्या अनुपस्थितीत जगाचा कार्यभार महादेवांकडे असतो, अशी मान्यता आहे. म्हणूनच महादेवांचे आवाहन करून त्यांची करुणा भाकण्यासाठी रुद्राभिषेक, पूजा-अर्चा केली जाते, असे सांगितले जाते. चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ म्हणून जव वाहण्याची परंपरा आहे. सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते.
शिवामूठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा?
चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ म्हणून जव वाहावे. लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे स्त्रिया हे शिवास्त म्हणजेच शिवामूठ वाहण्याचे व्रत करतात. श्रावणी सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर शिवामूठ वाहिली जाते. शिवामूठ वाहताना 'नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने। शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।' असा मंत्र म्हणावा. मंत्रोच्चार करणे शक्य नसल्यास, शिवा शिवा महादेवा... माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू-सासरा, दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा, अशी प्रार्थना करावी. शिवमूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो.
चौथ्या श्रावणी सोमवारी कसे व्रताचरण करावे?
श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा. श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा. यानंतर महादेव शिवशंकरांचे ध्यान करावे. 'ॐ नमः शिवाय' या मंत्रोच्चारासह शिवशंकरांची तर, 'ॐ नमः शिवायै' या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित षोडशोपचारी पूजा करावी. या दिवशी एकभुक्त राहावे. शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन यावे. अशा तऱ्हेने हे व्रत एकूण चौदा वर्षे करून मग त्याचे यथासांग उद्यापन करावे, असे सांगितले जाते.
शिवशंकराला प्रिय असलेले बेलाचे केवळ एक पान वाहावे
देशभरातील कोट्यवधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकरांची विशेष पूजा करतात. जलाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो. शक्य असल्यास निराहार उपवास करावा. आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी. जर शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शिवाच्या प्रतिमेची पूजा करावी. शिवाची प्रतिमा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी. वरीलपैकी काहीही शक्य नसेल, तर केवळ शिवशंकरांचा 'ॐ नमः शिवाय' हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो. शिवशंकराला प्रिय असलेले बेलाचे केवळ एक पान वाहिले, तरी पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे.