गाव आणि समाज अंतर्बाह्य स्वच्छ करणारे समाजशिक्षक गाडगे बाबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 07:09 PM2020-12-19T19:09:17+5:302020-12-19T19:11:01+5:30

गाडगे महाराज कठोर परिश्रम करून जीवन जगत होते. गाडगे महाराजांनी बारा वर्षे अज्ञातवासात काढली. या काळात गाडगे महाराजांनी कदान्न सेवन करून, चिंध्या पांघरून, मस्तकी गाडगे धारण करून देहश्रमाची पराकाष्ठा केली. लोक त्यांना गाडगे महाराज म्हणून आदराने हाक मारू लागले.

Gadge Baba, a social educator who cleanses the village and body inside and out! death anniversary of gadge maharaj! | गाव आणि समाज अंतर्बाह्य स्वच्छ करणारे समाजशिक्षक गाडगे बाबा!

गाव आणि समाज अंतर्बाह्य स्वच्छ करणारे समाजशिक्षक गाडगे बाबा!

googlenewsNext

डेबूजी झिंगराजी जानोरकर हे नाव वाचले, तर व्यक्तिपरिचय होणे कठीण आहे, मात्र गाडगे बाबा म्हणताच व्यक्ती, कार्य आणि त्यांचे समस्त जीवन आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. ‘गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला’ म्हणत अध्यात्माच्या मार्गातून त्यांनी समाजप्रबोधनही केले. २० डिसेंबर रोजी त्यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने गाडगे बाबांच्या महान कार्याची थोडक्यात तोंड ओळख करून घेऊ आणि त्यांची शिकवण अनुसरण्याचा प्रयत्न करू. 

गाडगे बाबा हे एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भेट देत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधारक आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.

गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संतामधील सुधारक आणि सुधारकांमधील संत होते. त्यांचे कीर्तन म्हणजे लोकप्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती.

हेही वाचा : वासुदेव फडके जयंती विशेषः प्रखर दत्तभक्त आणि धर्म-राष्ट्राची उपासना 'बळवंत' असणारे आद्य क्रांतिकारक

तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे. 

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. 

घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले. 

त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले. गाडगे महाराजांच्या नावाने महाराष्ट्रातील काही स्वच्छ गावांच्या ग्रामपंचायतींना गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार दिला जात असे. 

गाडगे बाबांनी केवळ समाज स्वच्छ केला नाही, तर लोकांची मनेही अंतर्बाह्य स्वच्छ केली. अशा या पुण्यात्म्याने २० डिसेंबर १९५६ रोजी जगाचा निरोप घेतला. परंतु जाता जाता समाजाला आपल्या बहुमूल्य विचारांची देणगी दिली. त्यांना त्रिवार वंदन. 

हेही वाचा : ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा बहुमूल्य विचार!

Web Title: Gadge Baba, a social educator who cleanses the village and body inside and out! death anniversary of gadge maharaj!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.