गाडगे महाराज म्हणजे लोकजागृती करणारं चालतं फिरतं विद्यापीठच!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 10:40 AM2021-02-23T10:40:45+5:302021-02-23T10:41:09+5:30

गाडगे महाराजांनी कदान्न सेवन करून, चिंध्या पांघरून, मस्तकी गाडगे धारण करून देहश्रमाची पराकाष्टा केली. त्यांचे रुपडे पाहता डेबुजी झिंगराजी ही त्यांची मूळ ओळख विसरून लोक त्यांना गाडगेबाबा, गाडगे महाराज म्हणून आदराने हाक मारू लागले. 

Gadge Maharaj was a mobile university. | गाडगे महाराज म्हणजे लोकजागृती करणारं चालतं फिरतं विद्यापीठच!

गाडगे महाराज म्हणजे लोकजागृती करणारं चालतं फिरतं विद्यापीठच!

Next

गाडगे महाराजांनी वयाच्या आठव्या वर्षापासून आपल्या घरातील विपन्न परिस्थितीचे, आपल्या समाजाच्या मागासलेपणाचे, समाजाच्या अडाणीपणाचे निरीक्षण केले. महाराजांनी मामाची शेती स्वत:च्या अपरिमित परिश्रमातून फुलवून अज्ञान, दारिद्रय, अंधश्रद्धा असलेल्या आपल्या समाजापुढे आपल्या श्रमांचा आदर्श ठेवला.

गाडगे महाराज कठोर परिश्रम करून जीवन जगत होते. एके दिवशी एका जटाधारी तेजस्वी योग्याने शेतात येऊन त्यांना प्रसाद दिला. रात्रभर त्यांना स्मशानात बसवून घेउन आपली पारमार्थिक साधना त्यांनी गाडगे महाराजांना दिली. गाडगे महाराजांना त्या जटाधारी योगी सत्पुरुषाने देवीदास म्हणून संबोधले. 

एके दिवशी रात्रीच्या वेळी सर्व झोपी गेले असता सर्वस्वाचा त्याग करून ते निघू गेले. गाडगे महाराजांनी बारा वर्षे अज्ञातवासात काढली. नंतर आपले तन, मन, धन जनसेवेत वेचण्यासाठी, लोक कल्याणासाठी त्यांनी कठोर तप आचरिले. या काळात गाडगे महाराजांनी कदान्न सेवन करून, चिंध्या पांघरून, मस्तकी गाडगे धारण करून देहश्रमाची पराकाष्टा केली. त्यांचे रुपडे पाहता डेबुजी झिंगराजी ही त्यांची मूळ ओळख विसरून लोक त्यांना गाडगेबाबा, गाडगे महाराज म्हणून आदराने हाक मारू लागले. 

लोकजीवन तेजाने उजळण्यासाठी हातच्या खराट्याने गावाचे रस्ते झाडीत ते महाराष्ट्रात सर्वत्र फिरले. विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून त्यांनी लोकांची मने स्वच्छ केली. खेडोपाडी, शहरोशहरी जाऊन कीर्तने केली. शिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून दिले. साक्षरतेचा प्रसार केला. गाडगे महाराज म्हणजे लोकजागृती साधणारे एक फिरते विद्यापीठ होते.

गाडगे महाराज जास्त शिकलेले नव्हते. परंतु संतांचे अभंग त्यांना तोंडपाठ होते. 'गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला'  असा गजर केल्यानंतर ते लगेच हरिपाठ म्हणत़...`सुंदर ते ध्यान...'

गाडगे महाराजांचे कीर्तन असले म्हणजे ते ऐकण्यासाठी लोक दूरदूरहून येत असत. गाडगे महाराजांनी पंढरपूर, देहू, आळंदी, नाशिक, मुंबई येथे धर्मशाळा बांधल्या. जनकल्याणाची अनेक कामे त्यांनी यशस्वीरित्या राबवली. आपले जीवन त्यांनी विरागी व धर्मशील वृत्तीने व्यतीत केले. जाती, धर्म व वर्ण यांतील भेद त्यांच्याजवळ नव्हता. समतेच ते पुरस्कर्ते होते. त्यांच्या अंत:करणात लोककल्याणाची जबरदस्त भावना होती. लोकांनी त्यांनी संत समजून त्यांच्याविषयी भक्ती बाळगली. सामान्य लोकांसाठी त्यांनी खूप कार्य केले. अखेर अमरावती येथे त्यांनी खूप कार्य केले. अखेर अमरावती येथे त्यांनी आपला देह ठेवला. महाराजांनी जगाच्या कल्याणात आपले जीवन कष्टविले. आपल्या कर्तृत्त्वाने ते वंदनीय ठरले. 

Web Title: Gadge Maharaj was a mobile university.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.