Gajanan Maharaj: उष्ट्या पत्रावळीतले अन्न खाऊन गजानन महाराजांनी केला अन्न संस्कार; अधिक वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 11:02 AM2023-02-13T11:02:24+5:302023-02-13T11:02:55+5:30
Gajanan Maharaj Prakat Din: आज गजानन महाराजांचा प्रगट दिन, त्यांची केवळ उपासना करून भागणार नाही तर त्यांच्याप्रमाणे आपणही अन्नाची किंमत केली तर ती खरी भक्ती ठरेल!
>> सर्वेश फडणवीस
वऱ्हाडातल्या खामगाव तालुक्यातील शेगाव हे एक गाव. आता शेगाव ही तालुका ठिकाण आहे. गाव लहान पण त्याचे भाग्य महान म्हणून या गावात श्रीगजानन महाराज प्रगट झाले. आज माघ वद्य सप्तमी, अर्थात श्री गजानन महाराजांचा प्रगट दिवस. महाराज फार उच्च पदाला पोहोचलेले विदर्भातील प्रमुख संत होते.
खरंतर गजानन महाराज म्हणजे विलक्षण कृपामुर्तीचे धनी आहे. आज त्यांच्या प्रगट दिवसाला अनेक जण घरोघरी श्री गजानन विजय ग्रंथाचे वाचन करतील. प्रसंगी महाप्रसाद होईल. झुणका, भाकर, कांदा म्हणजे महाराजांचे अत्यंत आवडते पदार्थ आहेत. आज महाप्रसाद ग्रहण करताना अन्नाची नासाडी होणार नाही हा संकल्प घ्यायला हवा आहे. श्री गजानन महाराजांच्या जीवन चरित्रात पहिलाच विचार अन्न आणि अन्नाचं महत्व यावरून सिद्ध होतो,
श्रीगजानन विजय ग्रंथात दासगणू महाराज लिहितात ,
ती समर्थाची स्वारी । बैसोनिया रस्त्यावरी ।।
शोधन पत्रावळींचे करी । केवळ निजलीलेने ।।
शीत पडल्या दृष्टिप्रत । ते मुखी उचलुनी घालीत ।।
हे करण्या हाच हेत । 'अन्नपरब्रह्म' कळवावया ।।
महाराज पत्रावळीवरची शित उचलून मुखी घालत होते.आपल्याला या वरून अन्नाचं महत्व समजून येते. आम्ही पोथीचे पारायण करतोच पण आज त्या परायणाच्या माध्यमातून महाराजांचा एक विचार आचरण्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात यशस्वी होऊया. आज माणसं कुठेही आणि कुणाकडेही जेवायला-खायला गेली,की तिथल्या अन्नपदार्थांबद्दल बोलत असतात.पण आज या प्रगट दिवशी श्री महाराजांचे स्मरण करून पाळाव , की मी अन्नाची निंदा करणार नाही आणि हेळसांड ही करणार नाही. अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्रीगजानन महाराज यांच्या प्रसंगी लहान लहान कृती आपल्याला खूप काही शिकवत आहेत. "सर्वे भवन्तु सुखिनः" "शिवभावें जीवसेवा" या व्रतांचा अंगीकार करून श्रीमहाराज आम्हा सर्वांना ते आचरणात आणण्यासाठी सुख,शांती, समृद्धी व निरामय आरोग्य प्रदान करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे.
आम्हा वैदर्भीय भक्तांचे हक्काचे श्रद्धा आणि विश्रांती स्थान आहे. मंगलकार्य असो, प्रसंगी कुठलीही आनंदाची बातमी असो आम्ही विदर्भातील मंडळी शेगावच्या गजानन महाराजांना कधी जाऊन सांगतो इतकी दर्शनाची आतुरता आमच्या प्रत्येकाच्या देहबोलीत महाराजांच्या प्रति कायमच जाणवते. शनिवार-रविवार आणि लागून सुट्या आल्या की सहज गाडी वळते ती थेट शेगावलाच. प्रसंगी संकल्प, अनुष्ठान त्याची सांगता हे ही सारे मनात असतेच. स्वच्छता, सुंदर रमणीय परिसर आणि शांतता ह्या साऱ्या गोष्टींसाठी शेगाव आज विश्वपटलावर स्थान मिळवण्यासाठी अग्रेसर आहेच. आज संपूर्ण महाराष्ट्र प्रसंगी देश-विदेशातील मंडळी सुद्धा महाराजांच्या दर्शनासाठी येतात आणि मनःशांतीची, अनुभवांची शिदोरी घेत माघारी परतण्याचा प्रवास करतात. संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या अवताराविषयी दासगणू महाराज गजानन विजय ग्रंथात लिहितात,
ऐन तरुण्याभीतरी । गजानन आले शेगावनगरी ।
शके अठराशेभीतरी । माघ वद्य सप्तमीला ।।
आजच्या दिवशी शेगाव येथे लाखो भाविकांचा मेळा जमलेला असतो, पण श्री महाराज आपल्या अवतीभवती,आपल्या प्रत्येक कृतीतून आपल्यासोबत आहे हाच भाव निरंतर ठेवत सकारात्मक वाटचाल करूया आणि अन्नाची हेळसांड होणार नाही हाच संकल्प प्रगट करूया..
जय गजानन !!