Gajanan Maharaj Life Story: …अन् गजानन महाराजांनी उष्ट्या पत्रावळीवरची शितं खाल्ली!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 09:48 AM2020-08-24T09:48:21+5:302020-08-24T10:05:05+5:30

Gajanan Maharaj Story: उष्ट्या पत्रावळी खात असलेल्या इसमाला पाहून, बंकटलालांनी दामोदरपंतांना तातडीने देविदास पंतांच्या घरी पाठवून एक पात्र मागवून घेतले. पंचपक्वान्नांनी भरलेले ते पात्र त्या इसमाकडे ठेवल्यानंतर त्याने त्यामधील सगळे पदार्थ एकत्र कालविले आणि खाण्यास सुरुवात केली.

Gajanan Maharaj Life Story; first darshan in Shegaon and his message Anna he Purnabrahma  | Gajanan Maharaj Life Story: …अन् गजानन महाराजांनी उष्ट्या पत्रावळीवरची शितं खाल्ली!

Gajanan Maharaj Life Story: …अन् गजानन महाराजांनी उष्ट्या पत्रावळीवरची शितं खाल्ली!

googlenewsNext
ठळक मुद्देगजानन महाराजांचं शेगावमध्ये पहिल्यांदा दर्शन झालं, त्या लीलेची गोष्ट मोठी रंजक आहे. 'अवघी पक्वान्ने एक केली । आवड-निवड नाही उरली ।'‘अन्नं ब्रह्मेति’ हा एक जरी संदेश आपण आचरणात आणला तरी आपले जीवन जगणे सफल झाले असे म्हणता येईल.

>> राजेश शेगोकार

शेगाव... विदर्भाची पंढरी म्हणून आज शेगावची ओळख असली तरी शेगाव एक सर्वसाधारण गाव होते. मध्य रेल्वेच्या स्थानकावरचं एक गाव एवढीच काय ती शेगावची ओळख होती. मात्र, या गावात एक अवलिया प्रकटला आणि या गावाचं सोनं झालं. ते अवलिया म्हणजे संत गजानन महाराज.

गजानन महाराजांचं शेगावमध्ये पहिल्यांदा दर्शन झालं, त्या लीलेची गोष्ट मोठी रंजक आहे. झालं असं की, शेगावातील देविदास पंत पातुरकर यांच्या मुलाच्या ऋतू शांतीचा कार्यक्रम होता. देविदास पंत गावातील नामवंत असामी. त्यामुळे सहाजिकच शेकडो पान उठत होती. पंगती सुरू झाल्या. पंगतीमधील उष्ट्या पत्रावळी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका नाल्याजवळ टाकल्या जात होत्या. पंगती मागे पंगती उठत होत्या आणि उष्ट्या पत्रावळींचा ढीग नाल्याच्या काठावर लागत होता. या रस्त्यावरून शेगावातील त्याकाळची बडी असामी बंकटलाल अग्रवाल आणि त्यांचे मित्र दामोदर पंत कुलकर्णी जात होते. त्यांनी देविदास पंत पातुरकरांच्या वाड्यासमोरील रस्त्यावर उष्ट्या पत्रावळीमधील शिते वेचून खाताना एका इसमाला बघितले. दिगंबर अवस्थेतील व्यक्ती पत्रावळीवरील उष्टे अन्न खात होती.

"मी गेलो ऐसे मानू नका। भक्तीत अंतर करू नका ।"

सद्गुरु वाचोनि सापडेना सोय..!

बंकटलाल यांना सहाजिकच हे थोडे विचित्र वाटले. जर ही व्यक्ती पोटार्थी असती, अन्नार्थी असती तर त्याने भोजनाची याचना केली असते आणि देविदास पंतांनीही ती पुरवली असती. कारण ते भले व्यक्ती होते. मग हा इसम असं का करत?, म्हणून त्यांना शंका आली. ती त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या दामोदर पंतांकडे बोलून दाखवली. दोघांनी चर्चा केली. हे काहीतरी वेगळंच दिसतंय, हा प्रकार काहीतरी वेगळा आहे, हे बंकटलाल यांच्या लक्षात आले आणि त्यांनी त्या इसमाकडे धाव घेतली. त्यांना नमस्कार करून विचारले, भूक लागली आहे का? असेल तर जेवणाची व्यवस्था करता येईल, अशा उष्ट्या पत्रावळी का खाता? हे वाक्य ऐकल्यावर इसमाने बंकटलाल यांच्याकडे बघितले आणि मानेनेच होकार दिला. 

बंकटलालांनी दामोदरपंतांना तातडीने देविदास पंतांच्या घरी पाठवून एक पात्र मागवून घेतले. पंचपक्वान्नांनी भरलेले ते पात्र त्या इसमाकडे ठेवल्यानंतर त्याने त्यामधील सगळे पदार्थ एकत्र कालविले आणि खाण्यास सुरुवात केली. याचे वर्णन 'गजानन विजय' ग्रंथामध्ये दासगणू महाराजांनी केले आहे. ते म्हणतात, 'अवघी पक्वान्ने एक केली । आवड-निवड नाही उरली ।' बंकटलाल आणि दामोदर पंत दोघे अवाक् झाले. ही काहीतरी वेगळी असामी आहे, कुणीतरी सिद्धपुरुष आहे जो आपल्या शेगावी प्रकटला, असे बंकटलालांना मनोमन पटले. 

त्या इसमाचे भोजन झाले होते. त्यांना पाणी विचारले. महाराजांजवळ फक्त एक भोपळा होता. तोही कोरडा. पाणी घेऊन येणार, तेवढ्यात महाराजांनी तो भोपळा नाल्याच्या पाण्यात पाडला आणि ते पाणी पिऊन तृप्तीचा ढेकर दिला. हीच व्यक्ती म्हणजे गजानन महाराज. शेगावातील त्यांच्या पहिल्या दर्शनाने बंकटलाल भारावून गेले. ते पाहातच राहिले. दिगंबर अवस्थेतील महाराजांचा तेजःपुंज चेहरा आणि चेहऱ्यावरील विलक्षण भाव त्यांच्या मनामध्ये कोरले गेले. ‘धन्य आपुले शेगाव, दृष्टीस पाहिला योगिराव’ असे भाव झाले. 

कृष्णावतारी... म्हणून 'संत ज्ञानेश्वरांना' श्रीकृष्णाचा अवतार मानतात

तोचि साधु ओळखावा.. देव तेथेचि जाणावा !

बंकटलाल विचार करत असतानाच महाराज उठले आणि निघून गेले. बंकटलालांना मात्र महाराजांची ओढ लागली आणि पुढे त्यांच्याच ओढीने महाराज पुन्हा शेगावात परतले. महाराजांचे हे पहिले दर्शन आणि त्यांची पहिली कृती ‘अन्न हे परब्रह्म’ याची साक्ष देते. या एकाच कृतीमध्ये किती मोठा आशयबोध सामावलेला होता. तो सामान्य माणसांच्या आकलनाचा विषय नसला तरी जगद् नियंत्या परमेश्वराचा संदेश त्यांना समाजाला द्यायचा होता. अन्नाचा कण न् कण हा वाया जाऊ देता कामा नये. हा बोध घेणे आज १२७ कोटींच्या विशालकाय भारतीय समाजाला किती आवश्यक आहे. भूकबळींची संख्या ऐकतो तेव्हा त्याची खात्री पटते की संत गजानन महाराजांनी दिलेला तो एकच संदेश किती महत्त्वपूर्ण व यथोचित होता. 

उपनिषदामधील अन्नाची महती दासगणू महाराजांनी अशी वर्णन केली आहे - कां की गर्जोन सांगे श्रुती। अन्न हेच ब्रह्म निगुती। ‘अन्न ब्रह्मेति’ ऐसी उक्ती । उपनिषदांठायी असे । संत गजानन महारांजाच्या प्रकटदिनी व सर्वच महोत्सवात व प्रत्येक दिवशी महाप्रसादासाठी सुद्धा भक्तांच्या सोईसाठी कर्मयोगी शिवशंकरभाऊ यांनी आपल्या नियोजनातून सर्व भक्तांकरीता भोजनाची व्यवस्था केली आहे. अफाट नियोजनाचे ते प्रतीक आहे. आपल्या घरी जर चार माणसे पाहुणे म्हणून आली तर त्यांची सरबराई करताना आपली तारांबळ उडते. इथे तर हजारोंचा समुदाय असतो. म्हणून समाजमनाने एकच गोष्ट मनावर बिंबवून ठेवणे गरजेचे आहे की, संत गजानन महाराजांनी सांगितलेला ‘अन्नं ब्रह्मेति’ हा एक जरी संदेश आपण आचरणात आणला तरी आपले जीवन जगणे सफल झाले असे म्हणता येईल. 

योगीयोगेश्वर संत गजाननाच्या प्रगट दिनी लाखो भक्तांची मांदियाळी संतनगरीमध्ये प्रकट होते. त्या सर्वांना अन्नप्रसाद मिळणे ही संस्थानची कार्य करण्याची पद्धती विलोभनीय आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही माणसाला अभिमान वाटावा अशी त्यांची कार्यपद्धती आहे. त्यामुळे आज कितीही लोकांना अन्नदान करण्याची क्षमता गजानन महाराज संस्थानमध्ये असल्याचा प्रत्यय सर्वांना येतो. तुम्ही मनामध्ये कोणताही शुद्ध व सत्य संकल्प करा, संत गजानन सत्य संकल्पाचे दाता असल्याने तुमच्या संकल्पाला सिद्धीस नेण्याचे कार्य ते करतात, असा भक्तांचा अनुभव आहे.

Web Title: Gajanan Maharaj Life Story; first darshan in Shegaon and his message Anna he Purnabrahma 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.