Ganesh Chaturthi 2021 : यावर्षी तुम्हाला घरी गणपती बसवता येणार नाही? काळजी करू नका, शास्त्र काय सांगते वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 04:55 PM2021-09-08T16:55:05+5:302021-09-08T17:04:50+5:30
Ganesh Chaturthi 2021: गणेश पूजन हे एक व्रत आहे. ते स्वीकारताना दूरदृष्टीने विचार करूनच अंगिकारले पाहिजे.
गणपती हे आपल्या सर्वांचे आवडते दैवत. बाप्पा आपल्या घरी यावा, त्याने आपल्याकडचा पाहुणचार घ्यावा असे प्रत्येक भक्ताला वाटते. अनेकदा लहान मुलांच्या आग्रहास्तव घरात गणपती आणण्याची प्रथा नसतानाही गणपती बसवला जातो, परंतु पुढच्या वर्षी उत्साह मावळला, की गणपती बसवणे सक्तीचे वाटू लागते. मग त्यात भक्तीभाव न राहता केवळ सोपस्कार उरतो. असे केल्याने पाप-पुण्याचा प्रश्न उद्भवत नाही, परंतु जी गोष्ट आपल्याला सातत्याने टिकवता येणार नाही, त्याचा दूरदृष्टीने विचार करून सुरुवात करायला हवी. असा पाहुणचार आपल्याला तरी आवडेल का? मग देवाचा तरी अवमान आपण का करावा? हा साधा विचार आपण केला पाहिजे. तसे असले, तरी काही प्रासंगिक अडचणी लक्षात घेता, शास्त्राने कोणती तडजोड सांगितली आहे, ते पाहू.
गणपती बसवणे हा कुळाचार नाही. भाद्रपदातील गणेशाच्या मूर्तीला आपण पार्थिव म्हणतो. तो मातीपासून हातावर बसेल एवढ्याच उंचीचा बनवायचा, त्याची प्राणप्रतिष्ठा करायची, पूजन करायचे व लगेच विसर्जन करायचे. ही मूळ प्रथा होती. भक्तांनी आपल्या सोयीने, उत्साहाने त्यात भर घातली.
गणपतीचा उत्सव केला. दोन दिवस, पाच दिवस, दहा दिवस घरी बसवला आणि निरोप दिला. गणपतीनेही भक्तांचा यथाशक्ती केलेला पाहुणचार वेळोवेळी स्वीकारला. एखाद वर्षी कोणाला गणपती बसवणे शक्य झाले नाही, तर त्याच्यावर कधी अवकृपा केली नाही. की कधी भक्तांचा राग धरला नाही, पुढच्या वर्षी तेवढ्याच उत्साहात तो वाजत गाजत आला.
Ganesh Chaturthi 2021 : यंदा गणेश पूजेबरोबर होईल धनलक्ष्मीचा लाभ; जुळून येत आहे शुभ योग!
त्यामुळे एक वर्षी गणपती बसवला आणि दुसऱ्या वर्षी खंड पडला आणि पुढेही पडत राहीला तर त्यात कोणतेही पाप लागणार नाही. देवाची क्षमा मागून आपली अडचण सांगून देवाला निरोप दिला, तरी देव आपले अपराध पोटात घेतो. पण म्हणून, देवाला गृहीत धरणेही योग्य नाही. हे व्रत आहे, घेतले तर पाळले पाहिजे, आणि जमणार नसेल तर भक्तीभावाने दोन हस्तक व तिसरे मस्तक जोडून देवाला नमस्कार केला पाहिजे.