Ganesh Chaturthi 2021 : यंदा गणेश पूजेबरोबर होईल धनलक्ष्मीचा लाभ; जुळून येत आहे शुभ योग!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 11:12 AM2021-09-08T11:12:45+5:302021-09-08T11:14:26+5:30
Ganesh Chaturthi 2021 : यंदा १० सप्टेंबर रोजी बाप्पाचे आगमन होत आहे. हा क्षण मंगलमयी आहेच, परंतु त्याबरोबर ग्रहस्थितीसुद्धा उत्तम जुळून येत आहे. पंचागाच्या दृष्टिकोनातून या दिवसाचे महत्त्व जाणून घेऊ.
भाद्रपद शुक्ल चतुर्थी हा दिवस आपण गणेश चतुर्थी म्हणून साजरा करतो. कारण या दिवशी पार्वती मातेने गणपती बाप्पाची निर्मिती केली होती. म्हणून हा दिवस अखिल विश्वासाठीच आनंदाचा दिवस मानला जातो. दर दिवशी हा दिवस धुमधडाक्यात साजरा केला जातो. महाराष्ट्रात तर गणेशोत्सवाचे स्वरूपच आगळे वेगळे असते. दहा दिवसांचा पाहुणचार घेतल्याशिवाय बाप्पाचे भक्त त्याची सुटका करत नाहीत. यंदा १० सप्टेंबर रोजी बाप्पाचे आगमन होत आहे. हा क्षण मंगलमयी आहेच, परंतु त्याबरोबर ग्रहस्थितीसुद्धा उत्तम जुळून येत आहे. पंचागाच्या दृष्टिकोनातून या दिवसाचे महत्त्व जाणून घेऊ.
६ ग्रहांची शुभस्थिती
या दिवशी ६ ग्रह श्रेष्ठ स्थितीत असणार आहेत. बुध कन्या राशीत, शुक्र तूळ राशीत, राहू वृषभ राशीत, शनी मकर राशीत, केतू वृश्चिक राशीत विराजमान असणार आहेत. या राशींसाठी हे ग्रह अनुकूल असल्याने या राशींसाठी हा भाग्योदयाचा काळ म्हटला पाहिजे.गणेश चतुर्थीपासून नोकरी, व्यवसाय, उद्योगात भरभराट होण्याचे हे शुभ लक्षण आहे.
सूर्यदेवाच्या साक्षीने गणेश पूजन
गणेश चतुर्थीला चित्रा आणि स्वाती नक्षत्र याबरोबर रवी योग जुळून येत असल्यामुळे हा दिवस ग्रहमानानुसार उजळून निघणारा आहे. त्या दिवशी चित्रा नक्षत्र दुपारी पावणे पाच पर्यंत असणार आहे व नंतर स्वाती नक्षत्र लागेल. तर रवी योग सकाळी पावणे सहा पासून दुपारी पाऊण पर्यंत असणार आहे. हा योग उन्नती दर्शवणारा आहे. या योगामध्ये गणेश पूजन करणे उचित ठरेल.
गणेश पूजेबरोबर होईल धनलक्ष्मीचा लाभ
भाद्रपद मासाच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी यंदा शुक्रवारी येत आहे. या दिवशी चित्रा नक्षत्र, ब्रह्म योग, वाणिज करण योग आणि तूळ राशीत चंद्राचे स्थैर्य ही सर्व स्थिती धनलक्ष्मीच्या लाभासाठी अनुकूल आहे. म्हणून या दिवशी गणपती पूजनाबरोबर लक्ष्मीपूजा करायला विसरू नका!