Ganesh Chaturthi 2021: विशेषतः भाद्रपद चतुर्थीला 'मोदकाचा'च नैवेद्य का दाखवावा, त्यामागील शास्त्रीय कारण वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 03:35 PM2021-09-07T15:35:18+5:302021-09-07T15:37:48+5:30

Ganesh Chaturthi 2021: कितीही विकतचे मोदक आणले तरी किमान एक दिवसतरी घरी मोदकांचा घाट घातला जातोच आणि तो घालायलाच हवा.. स्वतःसाठी आणि घरातील सर्वांच्या-आमंत्रितांच्या तब्येतीसाठीही!

Ganesh Chaturthi 2021: Especially on Bhadrapad Chaturthi, why only 'Modakacha' should be offered, read the scientific reason behind it! | Ganesh Chaturthi 2021: विशेषतः भाद्रपद चतुर्थीला 'मोदकाचा'च नैवेद्य का दाखवावा, त्यामागील शास्त्रीय कारण वाचा!

Ganesh Chaturthi 2021: विशेषतः भाद्रपद चतुर्थीला 'मोदकाचा'च नैवेद्य का दाखवावा, त्यामागील शास्त्रीय कारण वाचा!

googlenewsNext

‘मोदक' ह्या शब्दातच आनंद दडला आहे. 'मोद' म्हणजे आनंद. बाप्पाचा आणि समस्त भक्तांचा प्रिय असलेला मोदक कोणीही नाकारू शकत नाही. त्याचे रूप-रंग-गुण त्याच्या प्रेमात पडायला भाग पाडतात. पण एवढ्यावर त्याचे महत्त्व संपत नाही. तो आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी आहे, म्हणूनच तर बुद्धीच्या देवतेने अर्थात आपल्या गणपती बाप्पाने नैवेद्य म्हणून मोदकाची निवड केली. चला तर जाणून घेऊया मोदकाचे महत्त्व... 

पुणे येथील संजीव वेलणकर सांगतात, भाद्रपद महिना हा वास्तविक पावसाळ्याचा जोर संपत येत शरद ऋतूतील ऊष्म्याकडे घेऊन जाणारा काळ. लवकरच अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र येईल आणि त्याच बरोबर शरदाचे कडक ऊन ज्याला सर्वसामान्य भाषेत ‘ऑक्टोबर हीट’ असे म्हणतात तो काळ सुरू होईल. ऊष्म्याने पित्ताचा प्रकोप होतो. त्यातच वर्षाऋतूत वातही वाढलेला असतो. पावसाळ्यात पोटातील अग्निही मंद होतो. अशा मंद अग्निसाठीच लंघनरूपी वेगवेगळी व्रते सांगितली आहेत. या व्रतांच्या निमित्ताने चातुर्मासातील देवपूजनाचे फळ मिळतेच, तसेच उपवासाने पोटास आराम मिळून पचनही बिघडत नाही. व्रते नसताना मात्र हवे तसे सण साजरे करा वा जड पक्वान्ने खा असा संदेश मात्र मुळीच नाहीये. उलट या वाढलेल्या वात-पित्ताला काबूत ठेवण्यासाठीच नारळ-खोबरे-तांंदूळ-गहू-साखर-गूळ-साजूक तूप असे आहारातील नेहमीचेच घटक, लाभदायक तरीही पौष्टिक, तृप्तीकारक पदार्थांचे सेवन करावे असे सांगितले आहे. गौरीसाठी घावन-घाटले हेही तांदूळपिठी, गूळ, खोबरे यांचाच संयोग.

मोदकाचे घटक, त्यांचे उकडणे वा तळणे हे संस्कार हे सर्व देशापरत्वे बदलते. किनारपट्टीला उष्णता असते पण हवा दमट असते, तसेच नारळाचा मुबलक वापर असतो – अशावेळी आहारात दुसऱ्या स्निग्धतेची फार आवश्यकता आहे, असे नाहा. म्हणूनच किनारपट्टीपर तळणीचे पदार्थ कमीच व उकडून करायचे पदार्थ जास्त केले जातात. पीठा, मोदक, कोळकटै हे पदार्थ सागरी किनारपट्टीवरचेच.

याउलट – देशावर – रूक्षता जास्त म्हणून स्निग्धतेचे प्रमाण आहारात जास्त असावे लागते यासाठीच तळणीचे पदार्थ व जेवणात तेलबियांच्या वापराचे प्रमाणही जास्त. म्हणूनच तळणीचे मोदक व गौरीसाठी पोट भरायला फराळाचे पदार्थ हेही त्याचसाठी केले जातात. 

वर्षभर या ना त्या कारणांनी, निमित्तानी, सणा-समारंभाला वा कोणताही आनंद साजरा करायला गोड पदार्थांचे नियोजन केले जातेच. श्रीखंड, गुलाबजाम, पुरणपोळी याखेरीज पनीर पासून बनविलेले पदार्थ यांची मोठी चलती आहे. भरीसभर व लगेच उपलब्ध, सर्वांना आवडतात म्हणून केक व पेस्ट्रीजची नवी नवी दुकानेही उघडत आहेत व बरकतीत चालतच आहेत. या सगळ्यात आपण आपल्या परंपरा त्याजून वा सोयीस्करपणे बाजूला सारून आपलेच नुकसान करत असतो.

तेव्हा 'नेवैद्य ना?' मग तो कोणताही गोड पदार्थ असे आपण सोयीचे करून घेतले असले तरीसुद्धा इतर कोणतेही पक्वान्न असताना निदान गणपतीत तरी मोदकांची उणीव भासतेच! कितीही विकतचे मोदक आणले तरी किमान एक दिवसतरी घरी मोदकांचा घाट घातला जातोच आणि तो घालायलाच हवा.. स्वतःसाठी आणि घरातील सर्वांच्या-आमंत्रितांच्या तब्येतीसाठीही.

अशा या मोदकांनी आपले वात-पित्त आटोक्यात आले असतील, रूक्षता-कोरडेपणा, अतिरिक्त उष्णता कमी केली असेल, रसादि सात धातूंचे पोषण करून, शरीरास आवश्यक स्निग्धता, तृप्ती दिली असेल, बळ दिले असेल, पौष्टिक असूनही वजन वाढवले नसेल असा विश्वास मला आहेच. तुम्हांलाही साजूक तुपाची धार मोदकांवरून घेताना व मनापासून त्यांचा आस्वाद घेताना फक्त कॅलरीज, फॅट , प्रोटीनचे आकडे डोळ्यापुढे न दिसता – व कोणतीही बोच वा खंत वा अपराधी न वाटता आपल्या पूर्वजांना आजच्या नित्य-नूतन संशोधनातून विचार बदलणाऱ्या आहारतज्ज्ञांपेक्षा जास्त बुद्धि-प्रज्ञा व मानवाची-त्यांच्या येऊ घातलेल्या पिढ्यांची जास्त काळजी होती हा विश्वास वाटून त्यांचे मनापासून आभार मानावेसे वाटले तरच हे मोदकपुराण पचले असे म्हणेन मी. आत्तापर्यंतच्या पिढ्यांनी त्या प्रथा-संकेत विश्वासाने आपल्या पिढी पर्यंत पोचवले यासाठी त्या पिढ्यांचे-पूर्वजांचे आभार मानू या. 

Web Title: Ganesh Chaturthi 2021: Especially on Bhadrapad Chaturthi, why only 'Modakacha' should be offered, read the scientific reason behind it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.