Ganesh Chaturthi 2021: श्रीगणेश चतुर्थी: ‘या’ शुभ मुहुर्तावर करा गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा; पाहा, पूजा साहित्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 01:11 PM2021-09-08T13:11:59+5:302021-09-08T13:12:27+5:30
शुभ वेळ आणि योग्य मुहूर्त पाहूनच पार्थिव गणपती पूजन करणे मंगलकारी ठरेल, असा सल्ला दिला जातो.
सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. गणपतीच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. गपणती बाप्पाचे आगमन हा सर्वोच्च आनंदाचा दिवस. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. शुक्रवार, १० सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. गणेश पुराणात यास विनायकी चतुर्थी असे संबोधले गेलेआहे. काही पुराणांमध्ये ही तिथी महासिद्धिविनायकी चतुर्थी, वरद चतुर्थी किंवा शिवा या नावांनीही उल्लेखली गेली आहे. गणेश भक्त आणि उपासकांत भाद्रपद चतुर्थी अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या गणेश पूजनाचे, नामस्मरणाचे, आराधनेचे लवकर फळ मिळते, असे सांगितले जाते.
गणपती पूजन दुर्वांशिवाय अपूर्ण का मानले जाते? जाणून घ्या कथा, मान्यता आणि दुर्वामहात्म्य
यंदाच्या वर्षीही कोरोनाचे संकट
गतवर्षी भारतात शिरकाव केलेल्या कोरोनाचे संकट अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक मंडळांनी आपापले गणेशोत्सव रद्द केले. मात्र, घराघरात गणपती बाप्पाचे आगमन अगदी जोशात, जल्लोषात, उत्साहात आणि आनंदात होईल, यात शंका नाही. या दिवशी चित्रा नक्षत्र असून, हे उत्तम मानले जात आहे. शुभ वेळ आणि योग्य मुहूर्त पाहूनच पार्थिव गणपती पूजन करणे मंगलकारी ठरेल, असा सल्ला दिला जातो.
घरातील गणपती बाप्पाची ‘अशी’ काळजी घ्या अन् भरघोस लाभ मिळवा
गणेश चतुर्थी गणपती प्रतिष्ठापनेसाठी शुभ मुहूर्त
भाद्रपद चतुर्थी प्रारंभ : गुरुवार, ०९ सप्टेंबर २०२१ रोजी रात्रौ १२ वाजून १८ मिनिटे.
भाद्रपद चतुर्थी समाप्ती : शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१ रोजी रात्रौ ९ वाजून ५८ मिनिटे.
श्रीगणेशाची प्रतिष्ठापना शुक्रवार, १० सप्टेंबर रोजी सकाळी सूर्योदयापासून दुपारपर्यंत करावी, असे सांगितले जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी ०६ वाजून २५ मिनिटांनी सूर्योदय आहे. या दिवशी सकाळी ११ वाजून ०३ मिनिटांपासून ते १२ वाजून ३५ मिनिटांपर्यंत राहुकाळ असल्यामुळे यादरम्यान कोणतेही शुभ कार्य करू नये, असे सांगितले जाते.
भाद्रपद मासारंभ, बाप्पाच्या आगमनाची आतुरता, काय मागावं बाप्पाकडे? वाचा!
गणेश चतुर्थीच्या दिवशी शुभ योग
गणेश चतुर्थीला चित्रा आणि स्वाती नक्षत्र याबरोबर रवी योग जुळून येत असल्यामुळे हा दिवस ग्रहमानानुसार उजळून निघणारा आहे. त्या दिवशी चित्रा नक्षत्र दुपारी पावणे पाच पर्यंत असणार आहे व नंतर स्वाती नक्षत्र लागेल. तर रवी योग सकाळी पावणे सहा पासून दुपारी पाऊण पर्यंत असणार आहे. हा योग उन्नती दर्शवणारा आहे. या योगामध्ये गणेश पूजन करणे उचित ठरेल.
भाद्रपद मासात येणारे सण, व्रत विधी आणि त्यांची सविस्तर माहिती!
गणपती बाप्पाच्या पूजेसाठी साहित्य
गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर. पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ, आंब्यांचे डहाळे, सुपाऱ्या, पाण्याने भरलेला तांब्या, पळी, पंचपात्री, ताम्हण, समई, अक्षता, वस्त्र, जानवे, हळद-कुंकू, अष्टगंध, पत्री, दुर्वा, फुले, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरिता मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ, असे पूजा साहित्य घ्यावे. आपला कुळधर्म, कुळाचाराप्रमाणे अन्य गोष्टींची तयारी करावी, असे सांगितले जाते.