Ganesh Chaturthi 2022: गणेशोत्सव: गणेश चतुर्थीला मनापासून करा गणपती पूजन; ‘हे’ ग्रह होतील शुभ! भाग्योदय, नशीब चमकेल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 10:20 AM2022-08-29T10:20:30+5:302022-08-29T10:20:30+5:30
Ganesh Chaturthi 2022: प्रथमेश असलेल्या गणपती बाप्पाची मनोभावे पूजन केल्यास या दोन ग्रहांचा प्रतिकूल प्रभाव कमी होऊन विघ्नहर्ता कृपेने शुभ फल मिळू शकते, असे सांगितले जाते. जाणून घ्या...
भाद्रपद महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणपती बाप्पाचे केवळ नाव उच्चारताच मन अगदी चैतन्यमय होऊन जाते. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कला अधिपती असलेल्या गणेशाचे पूजन भाद्रपद महिन्यात मोठ्या प्रमाणात केले जाते. यंदा ३१ ऑगस्ट २०२२ रोजी गणेश चतुर्थी आहे. (Ganesh Chaturthi 2022)
गणेश चतुर्थीचा सण देशात, विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणेशोत्सव काळातील या दहा दिवसांत गणपतीची विधिवत पूजा केली जाते. त्यांच्या पूजेने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येते, असे मानले जाते. याशिवाय कुंडलीतील काही ग्रह शांत होऊन शुभ फल प्रदान करतात, अशी मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मुख्यतः बुध आणि केतु हे दोन ग्रह गणेश उपासनेचे शुभ फल देतात. म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी नियमानुसार गणेशजींची पूजा करावी. यामुळे कुंडलीत बुध आणि केतु यांचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत होऊ शकते, असे सांगितले जाते.
बुध, केतुचा प्रतिकूल प्रभाव कमी, शुभ होईल
ज्योतिषशास्त्रात बुध हा शुभ ग्रह मानला जातो. बुध हा मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी आहे. कर्क ही बुधाची उच्च रास मानली जाते आणि मीन ही बुधाची नीच राशी मानली जाते. अंकशास्त्रानुसार, बुध हा मूलांक ५ चा स्वामी आहे. ज्योतिषशास्त्रात, बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, वाणी, शिक्षण, गणित, लेखन, मनोरंजन, वाद, प्रकाशन, व्यवसाय, मित्र यांचा कारक ग्रह मानण्यात येतो. कुंडलीत बुध शुभ स्थितीत असल्यास बुद्धिमत्ता, वाणी, शिक्षण, व्यवसाय क्षेत्रात यश आणि प्रगती साध्य करता येऊ शकते. ज्योतिषशास्त्रात केतूला पाप ग्रहाच्या श्रेणीत ठेवले आहे. त्याला छाया ग्रह असेही म्हणतात. तो तर्क, बुद्धिमत्ता, ज्ञान, अलिप्तता, कल्पनाशक्ती आणि मानसिक गुणांचा कारक ग्रह मानला जातो. केतू ग्रह लोकांना चौकटीबाहेर काम करण्यास भाग पाडतो, असे म्हटले जाते.
गणेश चतुर्थीला ग्रहांची शुभ-स्थिती
यंदाच्या वर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र हा बुधाचे स्वामित्व असलेल्या कन्या राशीत असेल. या दिवशी शुक्र कर्क राशीतून सूर्याचे स्वामित्व असलेल्या सिंह राशीत प्रवेश करेल. या दिवशी शुक्र संक्रांती असेल. गुरु आपल्या राशीत मीन राशीत असेल. शनी स्वराशीत म्हणजेच मकर असेल. सूर्य आपलेच स्वामित्व असलेल्या सिंह राशीत असेल. बुधही आपल्याच म्हणजे कन्या राशीत असेल. म्हणजेच या दिवशी चार ग्रह स्वराशीत असतील. ग्रह नक्षत्रांचा हा संयोग भक्तांसाठीही शुभ ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.