Ganesh Chaturthi 2022: गणेशोत्सव: यंदा बुधवारी गणेश चतुर्थी; गणपती बाप्पाला ‘ही’ एकच वस्तू अर्पण करा, अपार लाभ मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 08:28 AM2022-08-19T08:28:24+5:302022-08-19T08:28:43+5:30

Ganesh Chaturthi 2022: यंदाच्या वर्षी श्रीगणेश चतुर्थी बुधवारी येत असून, या दिवशी केलेले गणपती बाप्पाचे पूजन, नामस्मरण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जाणून घ्या...

ganesh chaturthi 2022 importance of lord ganesha pujan on wednesday and get auspicious benefits of budhwar ganpati puja on ganeshotsav 2022 | Ganesh Chaturthi 2022: गणेशोत्सव: यंदा बुधवारी गणेश चतुर्थी; गणपती बाप्पाला ‘ही’ एकच वस्तू अर्पण करा, अपार लाभ मिळवा

Ganesh Chaturthi 2022: गणेशोत्सव: यंदा बुधवारी गणेश चतुर्थी; गणपती बाप्पाला ‘ही’ एकच वस्तू अर्पण करा, अपार लाभ मिळवा

googlenewsNext

चातुर्मासातील श्रावण सरत आला की, सर्वांना वेध लागतात, ते लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे. मराठी वर्षात लाडक्या गणेशाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. विविध स्वरुपात गणपती पूजन केले जाते. महादेव शिवशंकर, भगवान विष्णू यांच्याप्रमाणे गणपतीनेही विविध अवतार धारण केल्याच्या कथा पुराणांमध्ये आढळतात. गणेशविषयक विशेष दिवस वैशाख पौर्णिमेपासून सुरू होतात, अशी मान्यता आहे. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. यापैकी एक वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजचे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. पैकी भाद्रपद चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीपासून पुढे १० दिवस गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. (Ganesh Chaturthi 2022)

चातुर्मासातील सर्वांत महत्त्वाचे आणि मुख्य आकर्षण म्हणजे गणेश चतुर्थी किंवा गणेशोत्सव. भाद्रपद महिना म्हटला की, केवळ आणि केवळ आठवतो तो गणेशोत्सव. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कला अधिपती असलेल्या गणेशाचे पूजन या महिन्यात केले जाते. चातुर्मासातील दुसरा महिना म्हणजे भाद्रपद. याचे वैदिक नाव नभस्य असे आहे. मात्र, या महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र पूर्वा किंवा उत्तरा भाद्रपदा नक्षत्राजवळ असतो म्हणून या महिन्याला भाद्रपद हे नाव दिले आहे. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी घराघरात पार्थिव गणेशाची स्थापना केली जाते. यंदा, बुधवार, ३१ ऑगस्ट २०२२ रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे. (Ganeshotsav 2022)

बुधवारी गणेश पूजनाचे अनन्य साधारण महत्त्व

गणपती बाप्पाच्या केवळ नामस्मरणाने सकारात्मकता येते. एका चैतन्यमय उर्जेचा संचार होतो. महादेव आणि पार्वती देवींचा पुत्र गणेश प्रथमेश मानला गेला आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम गणपती स्मरण केले जाते, हे सर्वश्रुत आहे. साधारणपणे मंगळवारी गणपतीचे विशेष पूजन, नामस्मरण करण्याला प्राधान्य दिले जाते. मात्र, बुधवारी केलेल्या विशेष गणपती पूजन, भजन, नामस्मरण यालाही अनन्य साधारण महत्त्व आहे.

बुधवारी बाप्पाची पूजा, नामस्मरण शुभ-लाभदायक

ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला वाणी, वाणिज्य, लेखन, कायदा आणि गणित यांचे कारक मानले गेले आहे. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमकुवत असेल, तर बुधवारी गणपती बाप्पाची पूजा, नामस्मरण करणे लाभदायक ठरते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. गणपतीला प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होतो, असे मानले जाते. 

बुधवारी दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी

बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख-समृद्धी आणि बुद्धीप्रदान करतात, असे सांगितले जाते. धार्मिक पुराणांमध्ये गणपतीला बुद्धीचा देवता मानले गेले आहे. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

बुधवारी बाप्पाचा आवडता नैवेद्य करा अर्पण

गणपती पूजनानंतर गणपती बाप्पाला आवडणारे जास्वदाचे एखादे फूल वाहावे आणि लाडू किंवा मोदक यांचा नैवेद्य दाखवावा. लाडू किंवा मोदक नसतील, तर गोडाचा नैवेद्य दाखवावा, असे सांगितले जाते. गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू, गोष्टी अर्पण केल्यास ते भाविकांसाठी शुभलाभदायक ठरू शकते, असे सांगितले जाते. तसेच गणपतीचा ‘ॐ गं  गणपतये नम:’ हा मंत्र १०८ वेळा किंवा जितका शक्य असेल, तितक्या वेळा म्हणावा, असे म्हटले जाते. 
 

Web Title: ganesh chaturthi 2022 importance of lord ganesha pujan on wednesday and get auspicious benefits of budhwar ganpati puja on ganeshotsav 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.