Ganesh Chaturthi 2022: गणेशोत्सव: गणेश चतुर्थीला करा गणपती अथर्वशीर्षाचे पारायण; १० नियम लक्षात ठेवा अन् चुका टाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 10:20 AM2022-08-28T10:20:30+5:302022-08-28T10:20:30+5:30

Ganesh Chaturthi 2022: अनेकविध गणेशस्तोत्रे, श्लोकांमध्ये अथर्वशीर्षाला अत्याधिक महत्त्व असून, गणपती अथर्वशीर्ष म्हणताना नेमक्या कोणत्या गोष्टींचे भान ठेवावे? जाणून घ्या...

ganesh chaturthi 2022 know 10 rules of ganapati atharvashirsha reciting significance and get auspicious blessings in ganeshotsav 2022 | Ganesh Chaturthi 2022: गणेशोत्सव: गणेश चतुर्थीला करा गणपती अथर्वशीर्षाचे पारायण; १० नियम लक्षात ठेवा अन् चुका टाळा

Ganesh Chaturthi 2022: गणेशोत्सव: गणेश चतुर्थीला करा गणपती अथर्वशीर्षाचे पारायण; १० नियम लक्षात ठेवा अन् चुका टाळा

googlenewsNext

गणपती बाप्पाचे केवळ नाव उच्चारताच मन अगदी चैतन्यमय होऊन जाते. चातुर्मासातील श्रावण सरत आला की, सर्वांना वेध लागतात, ते लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कला अधिपती असलेल्या गणेशाचे पूजन या महिन्यात केले जाते. प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध चतुर्थी सिद्धिविनायकी चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. तर भाद्रपद महिन्यात येणारी शुद्ध चतुर्थी महासिद्धिविनायकी चतुर्थी मानली जाते. यंदाच्या वर्षी ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. (Ganesh Chaturthi 2022)

मराठी वर्षात लाडक्या गणेशाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. विविध स्वरुपात गणपती पूजन केले जाते. महादेव शिवशंकर, भगवान विष्णू यांच्याप्रमाणे गणपतीनेही विविध अवतार धारण केल्याच्या कथा पुराणांमध्ये आढळतात. गणेशविषयक विशेष दिवस वैशाख पौर्णिमेपासून सुरू होतात. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. यापैकी एक वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजचे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. पैकी भाद्रपद चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीपासून पुढे १० दिवस गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. (Ganapati Atharvashirsha)

गणपती अथर्वशीर्ष महत्त्व

गणपती बाप्पाचे अनेकविध मंत्र, श्लोक, स्तोत्र, आरत्या प्रचलित आहेत. काही घरांमध्ये नियमितपणे त्याचे पठणही केले जाते. मात्र, यामध्ये सर्वांत वरचा क्रमांक लागतो, ते म्हणजे गणपती अथर्वशीर्ष. अथर्वशीर्ष हे एक उपनिषद आहे. ते अथर्ववेदाशी संबंधित आहे. यामध्ये गणेशविद्या सांगितलेली आहे. गणेशाच्या उपासकांमध्ये या उपनिषदाला विशेष महत्व आहे. अथर्वशीर्ष हे गणक ऋषी यांनी लिहिले आहे. थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर. शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते, असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय, असा याचा अर्थ लावला जातो. यात प्रथम गणपतीच्या सगुणब्रह्माची उपासना सांगून शेवटी गणपती म्हणजेच परब्रह्म होय, असे म्हटले आहे.गणपती हा तीन देहांच्या पलीकडचा असला, तरी "गं" हे त्याचे तांत्रिक शरीर आहे आणि तोच त्याचा महामंत्रही आहे. गणपती हा विश्वाचा आधार असून, तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे. व्रातपती, शिवाच्या गणांचा अधिपती असा असलेल्या गणपतीला यामध्ये नमस्कार केलेला आहे. यानंतर याची फलश्रुती सांगितलेली आहे. या उपनिषदाचे एक हजार वेळा पठन केल्याने जे हवे ते प्राप्त होईल, असे म्हटले आहे.

गणपती अथर्वशीर्ष पठणाचे नियम

- गणपती अथर्वशीर्ष म्हणताना उच्चार अगदी स्पष्ट असावे.

- अथर्वशीर्ष अगदी संथपणे एका लयीत, गतीत म्हणावे.

- अथर्वशीर्ष पठण भावपूर्वक म्हणजे त्याचा अर्थ समजून केले पाहिजे.

- एकापेक्षा अधिक वेळा अथर्वशीर्ष म्हणावयाचे असेल, म्हणजेच पारायण करायचे असेल, तेव्हा 'वरदमूर्तये नमः।' येथेपर्यंतच म्हणावे. त्यापुढे फलश्रुती देण्यात आली असून, ती शेवटच्या आवर्तनानंतर म्हणावी.

- अथर्वशीर्षाचे पारायण करताना सुरुवातीला देण्यात आलेला शांतीमंत्र प्रत्येक पठणापूर्वी न म्हणता सुरुवातीस एकदाच म्हणावा.

- अथर्वशीर्षाची एकवीस आवृत्ती म्हणजे एक अभिषेक होय.

- अथर्वशीर्ष म्हणण्यापूर्वी स्नान करावे.

- अथर्वशीर्षाचा पाठ करताना धूतवस्त्राची घडी, मृगाजिन, धाबळी किंवा दर्भाची चटई यांचा उपयोग करावा.

- अथर्वशीर्षाचा पाठ म्हणताना मांडी पालटावी लागू नये, याची काळजी घ्यावी.

- दक्षिण दिशेखेरीज अन्य कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे.

- अथर्वशीर्ष पाठ म्हणण्यापूर्वी वडिलधार्‍यांना तसेच गुरुंना नमस्कार करावा.

- अथर्वशीर्ष पठण करण्यापूर्वी गणपतीची पूजा करून त्याला अक्षता, दूर्वा, शमी आणि तांबडे फूल व्हावे.

- पूजा करणे शक्य नसल्यास गणपतीचे मनोभावे ध्यान करावे, नमस्कार करावा.
 

Web Title: ganesh chaturthi 2022 know 10 rules of ganapati atharvashirsha reciting significance and get auspicious blessings in ganeshotsav 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.