Ganesh Chaturthi 2022: गणेशोत्सव: गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची ‘श्रीगणेश चालीसा’ म्हणा; सुख-समृद्धी, शुभलाभ मिळवा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 10:20 AM2022-08-23T10:20:30+5:302022-08-23T10:20:30+5:30
Ganesh Chaturthi 2022: गणपती बाप्पाचे अथर्वशीर्ष, मंत्र, स्तोत्र यांप्रमाणे श्रीगणेश चालीसाही अनन्य महत्त्व असून, पठणाचे नियम माहिती असणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले जाते. जाणून घ्या...
गणपती बाप्पाचे केवळ नाव उच्चारताच मन अगदी चैतन्यमय होऊन जाते. चातुर्मासातील श्रावण सरत आला की, सर्वांना वेध लागतात, ते लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे. चातुर्मासातील सर्वांत महत्त्वाचे आणि मुख्य आकर्षण म्हणजे गणेश चतुर्थी किंवा गणेशोत्सव. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कला अधिपती असलेल्या गणेशाचे पूजन या महिन्यात केले जाते. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी घराघरात पार्थिव गणेशाची स्थापना केली जाते. यंदा, बुधवार, ३१ ऑगस्ट २०२२ रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे. (Ganesh Chaturthi 2022)
मराठी वर्षात लाडक्या गणेशाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. विविध स्वरुपात गणपती पूजन केले जाते. महादेव शिवशंकर, भगवान विष्णू यांच्याप्रमाणे गणपतीनेही विविध अवतार धारण केल्याच्या कथा पुराणांमध्ये आढळतात. गणेशविषयक विशेष दिवस वैशाख पौर्णिमेपासून सुरू होतात, अशी मान्यता आहे. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. यापैकी एक वैशाख पौर्णिमेला पुष्टिपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजचे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. पैकी भाद्रपद चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीपासून पुढे १० दिवस गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. (Shree Ganesh Chalisa)
गणेश चालीसा स्तोत्राचे पठण शुभपुण्यदायक
गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाच्या दिवसांत गणपती बाप्पाचे मंत्र, श्लोक, स्तोत्रे यांचे पठण केले जाते. गणपती अथर्वशीर्षाप्रमाणे गणेश चालीसाला तितकेच महत्त्व असल्याचे सांगितले जाते. कोणतेही शुभ व मंगल कार्य सुरू करण्यापूर्वी श्रीगणेशाची पूजा करणे हा नियम आहे, जेणेकरून सर्व कार्य निर्विघ्न पार पडतात. श्रीगणेशाची मनोभावे पूजा केल्याने घरात समृद्धी, व्यवसायात समृद्धी आणि प्रत्येक कामात यश मिळते. गणेश चालीसा स्तोत्राचे पठण शुभपुण्यदायक मानले गेले असून, यामुळे जीवनात सुख-समृद्धी मिळू शकते, असेही सांगितले जाते. मात्र, गणेश चालीसा पठणाचे काही नियम आवर्जुन पाळावे, असा सल्ला दिला जातो.
गणेश चालीसाचे अनन्य साधारण महत्त्व
गणेश चालीसा स्तोत्राचे प्रामाणिक अंतःकरणाने पठण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख दूर होते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. श्रीगणेशाची आराधना केल्याने कुटुंबातील सर्व समस्या दूर होतात. गणेश चालीसा स्तोत्राचे नियमित पठण करणाऱ्या भक्तांना आयुष्यभर कशाचीही कमतरता भासत नाही आणि कुटुंबात सदैव सुख-शांती नांदते, अशी मान्यता आहे.
गणेश चालीसा पठणाचे नियम
- दररोज सकाळी आपापले कुळधर्म, कुळाचार याप्रमाणे गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर गणेश चालीसा पठण केले तरी चालते.
- बसण्याची जागा आणि वस्त्र स्वच्छ असावे
- गणेश चालिसाचे पठण करताना कोणतेही वाईट विचार मनात येऊ देऊ नये.
- पाठ करताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करावे.
- भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भगवान शिव आणि माता पार्वतीचेही ध्यान करावे.
- पठण करताना किंवा पठण झाल्यानंतर गणपतीच्या मूर्तीवर दूर्वा अर्पण करायला विसरू नये.
- गणेश चालीसा पठण करताना शक्य असल्यास तुपाचा दिवा देवासमोर लावावा
- नित्यनेमाने गणपतीची आराधना करणाऱ्या भक्तांच्या जीवनातून दु:खाची छाया दूर होते. श्रीगणेश चालीसाचे यथायोग्य पठण केल्याने गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतो आणि व्यक्तीला अपेक्षित फळ मिळू शकते, अशीही मान्यता असल्याचे सांगितले जाते.