Ganesh Chaturthi 2023: गजानाबरोबर गजलक्ष्मीचेही घरात होईल आगमन; गजमूर्तीची जोडी आणा आणि लाभ मिळवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 03:26 PM2023-09-15T15:26:37+5:302023-09-15T15:27:21+5:30
Vastu Shastra : गजानाबरोबर गजलक्ष्मीचेही घरात होईल आगमन; गजमूर्तीची जोडी आणा आणि लाभ मिळवा!
आपले वर्तमान आणि भविष्य कसे असणार आहे, हे आपल्या मेहनतीवर आणि नशिबावर अवलंबून असते. मेहनत तर आपण करतोच, पण त्याला बाप्पाचे शुभाशीर्वादही मिळावेत म्हणून वास्तुशास्त्र आणि फेंगशुईमध्ये याविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. फेंगशुईनुसार, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांना घरात ठेवल्याने आयुष्य सकारात्मक वळण घेऊ लागते आणि अनेक चांगल्या घटना आयुष्यात घडू लागतात. यामुळे कुटुंबाला आर्थिक बळ तर मिळतेच पण आरोग्यही चांगले राहते. आज जाणून घेणार आहोत गजमूर्ती ठेवण्याचे फायदे.
श्रीगणेशाची कृपा राहते
शास्त्रांमध्ये हत्तीला यश आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. असे म्हणतात की हत्तीची मूर्ती ठेवल्याने सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात. ज्या घरात हत्तीची मूर्ती असते, त्या घरावर गणेशाची कृपा राहते. हत्ती हे वैभवाचे प्रतीक आहे. पूर्वी राजे महराजे हत्तीच्या अंबारीत बसून स्वारी करत असत. आताच्या काळात हत्ती पाळणे जरी शक्य नसले तरी हत्तीची पितळ्याची किंवा काष्ट अर्थात लाकडाची मूर्ती आपल्याला घरात नक्कीच आणता येईल. त्या मूर्तीमुळे निर्माण होणारी सकारात्मकता तुम्हाला वैभव प्राप्तीकडे नेईल.
आर्थिक संकटातून सुटका
जर तुम्ही आर्थिक संकटाशी सामना करत असाल आणि तुमच्या उत्पन्नाच्या तुलनेत तुमचा खर्च वाढत असेल, तर नवीन वर्षात हत्तीच्या दोन मूर्ती आणा. दोन्ही मूर्ती घराच्या मुख्य दारात ठेवा. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि कुटुंबात पैशाचा प्रवाह वाढू लागतो.
फेंगशुईमध्ये हत्ती ठेवण्याचे नियम आहेत
लक्षात ठेवा की काळ्या रंगाचा हत्तीचा पुतळा कधीही खरेदी करू नका. हा रंग शोक आणि दु:खाचे प्रतीक आहे, ज्यामुळे घरातील इतर सदस्य देखील संकटात सापडतात. त्याऐवजी पांढऱ्या रंगाचा हत्ती खरेदी करणे चांगले मानले जाते. यामुळे कुटुंबात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. पांढरा हत्ती मिळाला नाही तर राखाडी किंवा तपकिरी रंगाचा हत्ती आणा, मात्र काळा हत्ती आणू नका.
मूर्तींचे मुख या दिशेला ठेवावे
तुम्ही हत्तींची जोडी खरेदी करत असाल, तर ते एकमेकांसमोर उभे राहणार नाहीत याची काळजी घ्या. असे केले नाही तर घरात कलह आणि भांडणाचे वातावरण निर्माण होते. म्हणूनच त्यांना नेहमी बाजूबाजूला उभे केले पाहिजे. हत्तीची मूर्ती खरेदी केल्यावर ती नेहमी घराच्या उत्तर दिशेला ठेवावी.