श्रीगणेश चतुर्थी: यंदा अद्भूत अंगारक योग; गणपती कधी बसवावे? जाणून घ्या, सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 04:44 PM2023-09-08T16:44:18+5:302023-09-08T16:44:35+5:30
Ganesh Chaturthi 2023: यंदाचा गणेशोत्सव अतिशय विशेष मानला गेला असून, श्रीगणेश चतुर्थीची नेमकी तारीख काय? गणेशपूजन केव्हा करावे? वाचा...
Ganesh Chaturthi 2023: चातुर्मासातील उत्साहाचा, चैतन्याचा मानला गेलेला भाद्रपद महिना सुरू होणार आहे. भाद्रपद महिना म्हटला की, केवळ आणि केवळ आठवतो तो गणेशोत्सव. हळूहळू सगळ्यांना लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. डेकोरेशनपासून ते गणपती पूजनाच्या साहित्यापर्यंतच्या खरेदीसाठी बाजारात लगबग सुरू झाली आहे. चाकरमानी गावी जाण्याची तयारी करत आहेत. यातच यंदाचा गणेशोत्सव अतिशय विशेष आणि अद्भूत मानला गेला आहे. कारण यावर्षीच्या श्रीगणेश चतुर्थीला अंगारक योग जुळून येत आहे. यंदा श्रीगणेश चतुर्थी कधी आहे? गणपती कधी बसवावे? जाणून घ्या...
केवळ देशात नाही, तर परदेशातील अनेक ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विविध स्वरुपात गणपतीचे पूजन केले जाते. महादेव शिवशंकर, भगवान विष्णू यांच्याप्रमाणे गणपतीनेही विविध अवतार धारण केल्याच्या कथा पुराणांमध्ये आढळतात. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. पैकी भाद्रपद चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीपासून पुढे १० दिवस गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.
श्रीगणेश चतुर्थीला अंगारक योग
मराठी वर्षातील प्रत्येक महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षातील चतुर्थी गणेशाला समर्पित असून, या दिवशी अनुक्रमे विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. मात्र, चतुर्थी तिथी मंगळवारी आली की, अंगारक योग जुळून येतो. म्हणून याला अंगारकी चतुर्थी किंवा अंगारक चतुर्थी असे म्हटले जाते. यंदा सन २०२३ मध्ये मंगळवारी श्रीगणेश चतुर्थी येत आहे. त्यामुळे या दिवशी अंगारक योग जुळून आले आहे.
गणेश पुराण किंवा मुद्गल पुराणात अंगारकी चतुर्थीची कथा
गणेश पुराण किंवा मुदगल पुराणात अंगारकी चतुर्थीबद्दल कथा सांगितली जाते, ती अशी- अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लालभडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेशमंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला, की 'माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी कृष्ण पक्षातील चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल! अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते.
यंदा गणपती नेमके कधी?
सन २०२३ मध्ये गणपती बसवण्यावरून संभ्रम असल्याचे पाहायला मिळत आहे. यंदा गणपती नेमके कधी? १८ की १९ सप्टेंबर रोजी? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवाची सुरुवात देशभरातील अनेक पंचांगात १८ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीने होणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. तर महाराष्ट्रात काही पंचांगात गणेश चतुर्थीची तारीख १९ सप्टेंबर दाखवण्यात आली आहे. काही पंचांगाप्रमाणे १८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजून ५३ मिनिटांनी गणेश चतुर्थी लागत असल्याचे दाखवण्यात आले आहे. तर काही पंचांगात १८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजून ३८ मिनिटांनी गणेश चतुर्थीचा प्रारंभ दाखवण्यात आला आहे.
गणपती कधी बसवावे?
गणपती कधी बसवावेत, याबाबत शास्त्रात काही माहिती देण्यात आली आहे. सूर्योदयापासून गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत असली तरी मध्यान्ह काळी गणपतीची विशेष पूजा करावी, असे सांगितले गेले आहे. दुपारी ११ वाजून १५ मिनिटांपासून ते ०१ वाजून ४१ मिनिटांपर्यंत मध्यान्ह काळ असल्याचे शास्त्र सांगते. त्यामुळे या मध्यान्ह काळात चतुर्थी मिळणे आवश्यक असून, त्यानुसार गणपती पूजन करावे, असे सांगितले जात आहे. आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. पंचांगातही सूर्योदयाच्या तिथीप्रमाणे गोष्टी दिलेल्या असतात. यंदाच्या गणेश चतुर्थीबाबत बोलायचे झाल्यास, मंगळवार, १९ सप्टेंबर रोजी सूर्योदयावेळी चतुर्थी तिथी आहे. चतुर्थी तिथी दुपारी ०१ वाजून ४४ मिनिटांनी समाप्त होत आहे. मध्यान्ह काळी गणपतीची विशेष पूजा करावी, असे जे शास्त्रात सांगितले गेले आहे. ही बाब १९ सप्टेंबर रोजी लागू होते. त्यामुळे आपापले कुळाचार, कुळधर्म आणि परंपरानुसार गणेश चतुर्थीला गणेश पूजन तसेच गणपतीची प्राणप्रतिष्ठा करावी, असे सांगितले जात आहे.