Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीला बाप्पाच्या गळ्यात पोवतं घालण्याची कोकणी परंपरा आहे, त्याबद्दल जाणून घेऊ!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 11:29 AM2023-09-15T11:29:06+5:302023-09-15T11:35:28+5:30
Ganesh Festival 2023: ठिकठिकाणची संस्कृती वेगळी, तरी सणांचा, उस्तवाचा गाभा एकच, निर्भेळ आनंद; अशाच संस्कृतीचा एक पारंपरिक भाग वाचा.
>> स्वानंद जोशी
श्रावण महिना सणांचा राजा. रोज काही ना काही साजरं होतं आणि त्याबरोबर जुन्या परंपरा , रितीभाती जपल्या जातात. कोकणातली अशीच एक परंपरा पोवत्याची!
विशीष्ट प्रकारचे दोरे घेऊन गाठी मारुन विविध आकाराची पोवती केली जातात. श्रावणाच्या सुरवातीला ग्रामदेवतेला पोवतं वाहून झालं की देवीचा गुरव गावात घरपट फिरुन पोवती वाटतो. शिमग्यात ज्या ज्या घरांमधे गावदेवीची पालखी येते त्या सगळ्या घरांमधे गुरवाकडून पोवत्याचं वाटप होतं.
नागपंचमीला नागोबाला , जिवतीबरोबरच्या नरसोबाला आणि घरच्या देवांना पोवतं वाहतात. नारळी पौर्णिमेला जशी बहीण भावाला राखी बांधते तसंच इष्ट देवतेला त्या दिवशी पोवतं बांधलं जातं. रक्षण हाच हेतू. हे पोवतं गळ्यात घालू शकतो किंवा हातात बांधायचं. घरातील सारे सदस्यही श्रावणात हे देवीचं पोवतं घालतात. आणि एक पोवतं बाजूला ठेवून दिलं जातं गणरायासाठी. भाद्रपद चतुर्थीला गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली की पोवतं घालतात आणि विसर्जनादिवशी ही सगळी पोवती गणपतीबरोबर विसर्जित केली जातात
.
या पोवत्यामागची कहाणी ठाऊक नाही. पण राखण हाच हेतू असावा. आणि शहरीकरण झालेलं असलं तरी आमच्याकडे देवीचा गुरव ही पोवती घेऊन येतो. मापटंभर तांदुळ आणि सव्वाअकरा रुपये देऊन त्याचा मान करतात.
कोकणातल्या या जुन्या पद्धती. बऱ्याच ठिकाणी आजही जपल्या जातायत आनंदाने. यंदाही सगळ्यांना पोवती घालून झाली, एक पोवतं राहिलंय देवांजवळच्या कोनाड्यात. ज्याचं आहे तो येतोय चार दिवसात...!