Ganesh Chaturthi 2023: तुमच्याही घरी गणपती येत असेल तर 'हे' २० नियम तुम्हाला माहित असलेच पाहिजेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 04:57 PM2023-09-13T16:57:06+5:302023-09-13T17:01:07+5:30

Ganesh festival 2023: गणेशाची प्राणप्रतिष्ठा ते विसर्जन हा गणेशोत्सवाचा सोहळा हे मोठ्या जबाबदारीचे काम; त्याची शास्त्रोक्त माहिती!

Ganesh Chaturthi 2023: 'These' 20 Rules You Must Know If You Are celebrating A Ganesh Idol puja At Home! | Ganesh Chaturthi 2023: तुमच्याही घरी गणपती येत असेल तर 'हे' २० नियम तुम्हाला माहित असलेच पाहिजेत!

Ganesh Chaturthi 2023: तुमच्याही घरी गणपती येत असेल तर 'हे' २० नियम तुम्हाला माहित असलेच पाहिजेत!

googlenewsNext

आपल्या सर्वांचे लाडके बाप्पा यंदा १९ सप्टेंबर रोजी आपल्या घरी पाहुणचार घ्यायला येणार आहेत. इतर पाहुण्यांच्या पाहुणचारात आपण कोणतीही कसूर ठेवत नाही, मग बाप्पाच्या बाबतीत उणीव राहून कसे चालेल? यासाठीच बाप्पाचे आगमन, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, पूजा, नैवेद्य, आरती आणि विसर्जन या सर्व बाबतीत कोणकोणत्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे ते जाणून घेऊ. यासाठी श्रीनिवास जोशी गुरुजींनी दिलेली सविस्तर नियमावली एकदा नीट वाचून घ्या!

श्री गणेश प्राणप्रतिष्ठा पूजा मांडणी कशी कराल?

१) श्री गणेशांचे आगमन घरात होताना,यजमानांच्या पायावर दरवाज्यामधेच दूध-पाणी घालून,औक्षण करावे.

२) श्री गणेश मूर्ती ज्या ठिकाणी ठेवणार आहात त्या स्थानी थोडे तांदूळ घालून त्यावर पाट ठेवून,त्यावर मूर्ती स्थापित करावी.मूर्तीचे मुख वस्राने आच्छादन करुन ठेवावे. (मूर्ती पूजेच्या दिवशीच त्या जागी ठेवावी,असे नाही.आधी ठेवली तरी काहीच हरकत नाही.)

३) पूजेच्या दिवशी प्रातःकाळी स्नान करुन शुचिर्भूत व्हावे.कपाळी तिलक(गंध)धारण करावे.मुंज झालेली असल्यास यज्ञोपवित धारण करुन रहावे.

४) घरच्या देवतांची पूजा करुन घ्यावी.(शक्यतो त्याशिवाय इतर पूजाविधी करु नयेत. पूजा घरच्या पुरुष मंडळींनीच करावी. महिला वर्गावर हा भार टाकू नये.

५) आता मूर्तीवर आच्छादन केलेले वस्र काढून ठेवावे.

६) शक्यतो मूर्तीच्या ऊजव्या बाजूला समई,निरांजन,ऊदबत्ती,कापूर आदीची योजना करावी.(पूजा करताना आपले मुख पूर्वेकडे राहील अशी योजना असावी.म्हणजे देव आपल्या समोर पूर्वेला,पश्चिमेकडे म्हणजेच आपल्याकडे तोंड करुन ठेवावेत.हे जमत नसल्यास याऊलट चालेल.पण शक्यतो दक्षिणोत्तर नकोत)

७) दिवे आदल्या दिवशी स्वच्छ घासून,पुसून,समईमधे,निरांजनामधे वाती,तेल,तूप वगैरे भरुन तयार करुन ठेवावेत.ऊदबत्ती स्टँड मधे रोवून ठेवावी.काडेपेटी जवळ ठेवावी. समईच्या खाली एखादी ताटली ठेवावी. हल्ली काचेमधले दिवे मिळतात,दिवा न विझण्याच्या दॄष्टीने ते ऊपयुक्त ठरतात.जमल्यास ते दिवे वापरावेत.त्यामधे तेल,तूप ही भरपूर वेळ राहते. दिव्यांना गंध,हळद,कुंकू लावून ठेवावे.

८) विड्याची दोन पाने(देठ देवाकडे करुन)त्यावर सुट्टे पैसे,त्यावर सुपारी,याप्रमाणे पाच विडे तयार करावेत.देवाच्या कुठल्याही बाजूला किंवा दोन्ही बाजूंना मिळून असे विडे ठेवावेत.विड्यांजवळच दोन नारळ,फळे यांची योजना करावी.(शक्यतो देवासमोर ठेवू नयेत.पूजा करताना अडचण होते.).या विड्यांवरच(असल्यास) अक्रोड,खारीक आदि पंचखाद्य मांडून ठेवावे.

९)नैवेद्यासाठी दूध+साखर,गूळ+खोबरे,मोदक,पेढे ई.देवासमोर मांडून ठेवावेत.मांडतानाच त्याखाली पाण्याने चौकोनी मंडल करुन ठेवावे.

१०)पंचामॄत(दूध,दही,तूप,मध,साखर) एकत्र अथवा वेगवेगळे तयार करुन ठेवावे.

११)मोदक,पेढे ई.बाॅक्ससकट न ठेवता एखाद्या स्वच्छ वाटीत काढून घ्यावेत.

१२)यज्ञोपवित(जानवे) सोडवून,मोकळे आणि ओले करुन एखाद्या ठिकाणी अडकवून ठेवावे. जेणेकरुन आयत्यावेळी धावपळ होणार नाही.(घाई मध्ये जानवे हमखास गुंतते आणि सुटता सुटत नाही.आणि चिडचिड होते.)

१३)कापसाचे वस्र असल्यास २१मण्यांचे गणपतीसाठी तयार ठेवावे.

१४)यजमानांनी शक्यतो कद(सोहळं),ऊपरणं असा पोशाख करावा.नसल्यास धोतर,किंवा स्वच्छ धूत वस्र परिधान करावे. हात पुसण्यासाठी एक स्वच्छ रुमाल जवळ ठेवावा. बसायला किंवा ऊभे राहायला एक आसन असावे.

१५)गणपतीसमोर पूजेसाठी तांब्या,ताम्हन,पळी भांडे ठेवावे.

१६)आपल्या समोर आपल्या डाव्या हाताला पिण्याच्या पाण्याने भरलेला तांब्या,त्याच्या ऊजव्या बाजूला त्याच पाण्याने भरलेले फुलपात्र,त्यामध्ये पळी किंवा चमचा,त्याच्या उजव्या बाजूला ताम्हन असावे.

१७)देवाला घालावयाचे काही दागिने असतील तर ते मोकळे करुन ठेवावेत.गुरुजींनी पूजा सांगून झाल्यावर ते दागिने देवाला घालावेत किंवा आधी घालून ठेवले तरी हरकत नाहीत.

१८) एका मोठ्या ताटामधे आणलेली सर्व प्रकारची फुले थोडी थोडीच काढून घ्यावीत.जमल्यास प्रत्येक प्रकारची फुले वेगळी मांडून ठेवावीत.ताटात फुलांची फार गर्दी करु नये.लागली तर परत घेता येतात. त्रिदल दूर्वांच्या २१दूर्वांच्या ५-६जुड्या तयार करुन ठेवाव्यात.तीन पानांचा आणि छिद्र नसलेल्या पानांची ७-८बिल्वपत्रे असावीत.तुळस अगदी मोजकीच असावी.शमी असल्यास जुडी सोडून,मोकळी करुन ठेवावी म्हणजे घाईघाईत काटे टोचणार नाहीत.
२१प्रकारच्या पत्री ऊपलब्ध झाल्या तर त्या एका ताटात नीट नावासकट मांडून ठेवाव्यात.

१९)हळद,कुंकू,गुलाल,शेंदूर,बुक्का,केशर अष्टगंध पावडर हे छोट्या वाट्या अथवा द्रोण यामधे मोजकेच काढून ठेवावे.ही सगळी तयारी आपल्या ऊजव्या बाजूला असावी.फुलांचे ताटही ऊजव्या बाजूलाच असावे.

२०) पूजा सुरु झाली की कुणा नातेवाईकांना फुलपात्रात गरम पाणी आणून देण्यास सूचना करुन ठेवावी.

२१)सगळ्यात महत्त्वाची सूचना पूजा करताना अतिशय श्रद्धेने,सावधचित्त होऊन पूजा करावी.पूजेव्यतिरिक्त ईतर ठिकाणी लक्ष देऊ नये.पूजा करताना भ्रमणध्वनी(मोबाईल)चा अडथळा असू नये. यानंतर पूजा झाल्यावर लगेच किंवा दुपारी भोजनापूर्वी देवाला महानैवेद्य दाखवून यथाशक्ती महाआरती करावी.  संध्याकाळी आरती करायच्या आधी पुन्हा देवाला हळद,कुंकू,गंध,फुलं,दूर्वा वहाव्यात.काही नैवेद्य दाखवावा व नंतर आरती करावी. विसर्जनापर्यंतच्या काळामध्ये सकाळ संध्याकाळ अशाच प्रकारे पूजा करावी.आदल्या दिवशीची फुले(निर्माल्य)काढून मूर्ती कपड्याने  हळूवार स्वच्छ करावी.व नंतर नवीन हार वगैरे घालावा.

उत्तरपूजेच्या दिवशी बाप्पाबरोबर दूध पोहे अथवा दही पोहेअशी शिधोरी द्यावी.घरी आरती केल्यावर,सगळ्यांचा देवाला नमस्कार करुन झाल्यावरच देवाच्या मस्तकी ऊत्तरपूजेच्या अक्षता वहाव्यात.आणि देवाचे आसन थोडेसे हलवावे. विसर्जन स्थळी पुन्हा आरती करण्याची गरज नाही.

श्री गणेश सर्व भक्तांचे मंगल करो.
॥शुभम् भवतु॥

Web Title: Ganesh Chaturthi 2023: 'These' 20 Rules You Must Know If You Are celebrating A Ganesh Idol puja At Home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.