Ganesh Chaturthi 2023: 'घालीन लोटांगण...' सुरू झाल्यावर स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी की नाही; नेमकं शास्त्र काय? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 04:26 PM2023-09-22T16:26:13+5:302023-09-22T16:28:05+5:30

Ganesh Chaturthi 2023: आरती झाल्यावर प्रदक्षिणा घालावी की नाही या द्विधा मनःस्थितीत तुम्ही सुद्धा असाल तर ही माहिती तुमच्यासाठी!

Ganesh Chaturthi 2023: Whether to circumambulate yourself when 'Ghaleen Lotangan...' begins; What exactly is ritual? Read on! | Ganesh Chaturthi 2023: 'घालीन लोटांगण...' सुरू झाल्यावर स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी की नाही; नेमकं शास्त्र काय? वाचा!

Ganesh Chaturthi 2023: 'घालीन लोटांगण...' सुरू झाल्यावर स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी की नाही; नेमकं शास्त्र काय? वाचा!

googlenewsNext

सध्या गणेशोत्सव सुरू आहे. त्यानिमित्ताने सगळ्या देवादिकांच्या आरती मोठ्या भक्तिभावाने म्हटल्या जातात. ज्यांची आरती पाठ नसते, ते लोक 'जयदेव जयदेव' म्हणत ठेका धरतात. तास दोन तास आरती झाल्यावर वेळ येते शेवट करण्याची! त्यावेळी आपण जे पद म्हणतो तो संत नामदेवांनी लिहिलेला एक अभंग आहे. त्यातील समर्पित भाव पाहता तो अभंग आरती नंतर म्हणण्याचा प्रघात सुरू झाला.

आरती म्हणजे आर्ततेने मारलेली हाक आणि त्याचा शेवट ज्या अभंगाने केला आहे त्यात देवाशी संवाद साधत नामदेवांनी म्हटले आहे, 'भगवंता, यदाकदाचित जेव्हा तू आम्हाला भेटशील तेव्हा मी तुझ्यासमोर लोटांगण घालेन आणि चरणांना वंदन करेन. '

हा भावार्थ लक्षात घेता 'घालीन लोटांगण' हे चरण सुरू झाल्यावर आणि आरती संपण्यापूर्वी स्वतः भोवती प्रदक्षिणा घालण्याची गरज नाही. तसे करण्याबद्दल शास्त्रात कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे आरती संपेपर्यंत देवाभोवती आणि स्वतः भोवती प्रदक्षिणा न घालता आरती पूर्ण करावी. नंतर मंत्रपुष्पांजली म्हणून झाल्यावर मंदिराला प्रदक्षिणा घालावी आणि नंतर देवासमोर साष्टांग नमस्कार घालावा. जिथे देवाभोवती प्रदक्षिणेसाठी जागा नसेल तिथे आरती संपल्यावर स्वतःभोवती प्रदक्षिणा घालून साष्टांग नमस्कार घालावा असे शास्त्र आहे.

स्वतः भोवती प्रदक्षिणा घालण्याचा मंत्र :  

यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च |
तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे ||

हा मंत्र म्हणत तीन वेळा प्रदक्षिणा घालत प्रार्थना केली जाते, की 'हे देवा माझ्याकडून कळत-नकळत झालेल्या पापांचे क्षालन कर, केवळ या जन्मातलेच नाही तर मागच्या जन्मातील पापेही नष्ट कर.'

लोटांगण : स्वतःभोवती प्रदक्षिणा घालून झाल्यावर देवासमोर लोटांगण घालावे. लोटा अर्थात सपाट बुड असलेला तांब्या जसा जमिनीवर अलगद टाकला असता जसा घरंगळत जातो आणि वर्तुळाकार फिरतो, तसा देवासमोर देह टाकून डोक्याच्या वर सरळ रेषेत हात जोडून स्वतःभोवती लोळत लोळत देवाभोवती प्रदक्षिणा करणे म्हणजे लोटांगण. तसे करताना देवासमोर डाव्या बाजूला तीन वेळेस आणि उजव्या बाजूला तीन वेळेस लोळण घेणे आणि मूळ जागी येऊन साष्टांग नमस्कार घालणे याला लोटांगण घालणे असे म्हणतात.

मात्र सगळ्या ठिकाणी किंवा घरगुती ठिकाणी लोटांगण घालण्यासाठी पुरेशी जागा नसते, अशा वेळी वरील श्लोक म्हणत आरती झाल्यावर स्वतः भोवती प्रदक्षिणा घालावी असे सांगितले जाते.

साष्टांग नमस्कार स्त्रियांनी घालू नये :

साष्टांग नमस्कार म्हणजे ज्यात अष्ट अंग जमिनीला टेकतात त्याला सह अष्ट अंग अर्थात साष्टांग नमस्कार असे म्हणतात. यात डोकं, दोन्ही हात, दोन्ही पाय, हृदय, दोन्ही डोळे जमिनीला टेकतात. मात्र शास्त्रानुसार स्त्रियांनी पंचांग नमस्कार घातला पाहिजे. त्यात दोन गुडघे, दोन हात आणि डोकं जमिनीला टेकले पाहिजे. स्त्रियांनी आपले पूर्ण शरीर जमिनीवर पालथे पडू देऊ नये, म्हणून त्यांनी पंचांग नमस्कार करावा असे सांगितले आहे.

त्यामुळे पुढच्या वेळी आरती झाली की सगळे प्रदक्षिणा घालतात म्हणून तुम्ही सुद्धा घालीन लोटांगण सुरु होताच प्रदक्षिणा घालू नका. आरती पूर्ण करा आणि आरती झाल्यावर इतरांनाही ही माहिती देऊन त्यांच्या ज्ञानात भर घाला!

Web Title: Ganesh Chaturthi 2023: Whether to circumambulate yourself when 'Ghaleen Lotangan...' begins; What exactly is ritual? Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.