Ganesh Chaturthi 2023: गणपतीची मूर्ती मातीचीच का असावी? तिचे विसर्जन कसे व कधी झाले पाहिजे याबाबत धर्मशास्त्र सांगते...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 06:47 PM2023-09-18T18:47:45+5:302023-09-18T18:49:58+5:30
Ganesh Festival 2023: भाद्रपद शुद्ध चतुर्थीला महासिद्धी विनायकी म्हणतात. या दिवशी बाप्पा मोरया म्हणत गणेशाचे मातीच्या मूर्तीचेच का पूजन केले जाते, ते जाणून घेऊ.
गणेशोत्सव आपल्या सगळ्यांचा आवडता सण असला तरी त्यात अलीकडच्या काळात व्यावसायिकरण आणि विद्रुपीकरण वाढले आहे. धर्मशास्त्रात या उत्सवाची माहिती वाचली असता लक्षात येते, की भाद्रपदात येणारा बाप्पा आणि त्याची पूजा किती साधी सुधी आणि भावपूर्ण होती. त्याच्या मूळ उद्देशापासून आपण फारच दुरावलो आहोत. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर लिहितात, -
गणपती हा महाराष्ट्राच्या आवडी निवडीशी एकरूप झाला आहे. इथल्या लाल मातीचा रंग त्याने धारण केला आहे. इथल्या मातीतूनच त्याची मूर्तीत होते आणि पुन्हा ती मातीतच विरून जाते. अशा रीतीने मातीची पूजा करण्याचा म्हणजे मातृभूमीला वंदन करण्याचा, राष्ट्रभक्तीचा संदेश गणपतीची पार्थिव पूजा आपल्याला देते.
आपण गणपतीची पूजा करतो तेव्हा अटींच्या मूर्तीत प्राणांची प्रतिष्ठा करतो, मातीची मूर्ती सजीव झाली अशी आपली भावना असते. महाराष्ट्राच्या इतिहासात शालिवाहन राजाने मातीच्या मूर्तीत प्राण फुंकले आणि त्या मूर्ती सजीव करून त्याने सैन्य उभारले. आपल्या शत्रूंचा निःपात केला, अशी कथा आहे. आपण जो गुढीपाडवा करतो तो शालिवाहन राजाच्या नावाच्या शकाचा प्रारंभ आहे. गणेश चतुर्थी हे एक प्रकारे मातीच्या मूर्तीचे पूजन आणि मातीच्या मूर्तीतून वीरश्रेष्ठ गजाननाचे दर्शन यामुळे शालिवाहनाची आठवण होते आणि मातीत प्राण फुंकण्याचे मोल कळते.
मूळ गणेश पूजा विधी :
गणपतीची शाडूची मूर्ती आणावयास जाताना समवेत पाट, ताम्हन व रुमाल घेऊन जावा. पावसाच्या पाण्यापासून मूर्ती सुरक्षित राहावी म्हणून एखादी छत्री न्यावी. गणपती आणताना त्यापुढे दक्षिणा व गोंविंद विडा ठेवावा. तो घरी आणताना रंगीत रुमालाने झाकून आणावा व त्यावेळी त्याचे मुख आपल्या घराकडे असावे. वाद्यांच्या गजरात 'गणपती बाप्पा मोरया' असा जयघोष करत मूर्ती घरी आणल्यावर घरात प्रवेश घेण्यापूर्वी गणपतीला तांदूळ व पाणी ओवाळून ते बाहेर टाकावे. गणपती आणणाऱ्या व्यक्तीच्या पायावर कोमट पाणी, दूध व पुन्हा पाणी घालावे. गणपती व त्याला आणणाऱ्या दोघानांही कुंकू लावावे. पाच सुवासिनींनी औक्षण करावे. घरात आणल्यावर पाटावर तांदूळ पसरून त्यावर ती मूर्ती ठेवावी. ती पूर्वी, पश्चिम वा उत्तराभिमुख असावी. पुरोहितांकडून मूर्तिपूजा करावी. प्राणप्रतिष्ठा आणि षोडशोपचार पूजा केल्यावर आरती, मंत्रपुष्पांजली व प्रार्थना करावी. सर्व मंडळींनी देवाला शमी, केतकी, दुर्वा, शेंदूर वाहावे. मोदकांचा नैवेद्य दाखवावा. सायंकाळी धुपारती करावी.
पूर्वापार पद्धतीनुसार दीड, पाच, सात वा दहा दिवसांचा गणपती ठेवून नंतर विसर्जित करावा. विसर्जनाच्या वेळी गणपती मूळ जागेवरून हलवावा व पाटावर ठेवावा. विसर्जनास निघताना गणपतीचे मुख प्रवेश द्वाराकडे असावे. त्या मार्गे जाताना भजन, गणेश गीते म्हणत वाजत गाजत जावे. वारंवार जयघोष करावा आणि पुढच्या वर्षी येण्याची विनंती करावी. समुद्र, नदी, तलाव किंवा विहीर अशा ठिकाणी केमिकल विरहित मातीची मूर्ती विसर्जित करावी. तरच ती पर्यावरण पूरक ठरते आणि निसर्गाशी एकरूप होते. दुर्वा वाहून आरती करावी. गणपतीपुढे नारळ वाढवून साखर, खोबरं, फुटाणे नैवेद्य म्हणून वाटावेत. हीच उत्तरपूजा. मूर्ती विसर्जित करताना पाण्यात योग्य खोलीपर्यंत जाऊन गणपती दोन वेळा पाण्यात बुडवून वर काढावा मग पाण्यात सोडावा. विसर्जन स्थळावरून घरी येताना वाळू किंवा खडे आणावेत. ती वाळू किंवा खडे घराच्या चारही कोपऱ्यात टाकले असता जनावरांची भीती राहत नाही अशी लोकसमजूत आहे. पाटावरील जागा मोकळी राहू नये म्हणून पाटावर पाण्याचे भांडे, कलश व पळी ठेवतात. काही ठिकाणी त्या कलशावर नारळ ठेवतात. घरी आल्यावर त्या कलशाची पूजा करून आरती आणि मंत्रपुष्पांजली म्हणतात.
हा आहे खरा भाद्रपदातला गणेशोत्सव! यात कुठेही झगमगाट, डॉल्बी साउंडवर हादरे आणि कानठळ्या बसवणारी गाणी, उत्तेजक हालचाली करणारे नृत्य, धिंगाणा याचा समावेश नाही! त्यामुळे आपणही उत्सवाच्या मूळ स्वरूपाकडे वळण्याचा प्रयत्न करूया आणि पर्यावरणाला हातभार लावून धर्म, संस्कृती आणि निसर्ग रक्षक होऊया!