गणेशोत्सव: गणेश चतुर्थीला चुकून चंद्रदर्शन झाले? का मानले जाते निषिद्ध? कारण जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 07:00 AM2023-09-17T07:00:07+5:302023-09-17T07:00:07+5:30

Ganesh Chaturthi 2023: श्रीगणेश चतुर्थीला कलंक चतुर्थी असेही म्हटले जाते. या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानले जाते. चुकून वा अनावधानाने चंद्र पाहिल्यास नेमके काय करावे?

ganesh chaturthi 2023 why moon sighting is inauspicious on ganesh chaturthi and know remedies and mythological stories | गणेशोत्सव: गणेश चतुर्थीला चुकून चंद्रदर्शन झाले? का मानले जाते निषिद्ध? कारण जाणून घ्या

गणेशोत्सव: गणेश चतुर्थीला चुकून चंद्रदर्शन झाले? का मानले जाते निषिद्ध? कारण जाणून घ्या

googlenewsNext

Ganesh Chaturthi 2023: भाद्रपद महिन्याला सुरुवात झाली असून, शुद्ध चतुर्थीला घरोघरी गणपती बसवायची प्राचीन परंपरा आहे. मंगळवार, १९ सप्टेंबर रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे. विशेष म्हणजे यंदा दुर्मिळ, अद्भूत मानला गेलेला अंगारक योग जुळून आलेला आहे. या दिवशीपासून पुढील १० दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. या शुद्ध चतुर्थी महासिद्धिविनायकी चतुर्थी मानली जाते. ही चतुर्थी रविवारी किंवा मंगळवारी आल्यास तिचे महात्म्य अधिक असते. याच तिथीला वरद चतुर्थी किंवा शिवा असेही म्हटले जाते. भाद्रपद चतुर्थी साजरी करण्यामागे अनेक पौराणिक कथा मिळतात. महादेव शिवशंकरांनी प्रथम जन्मोत्सव साजरा केला, असे सांगितले जाते. तर श्रीगणेशाने सिंदूर दैत्यावर विजय मिळवला, तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी हाच होता. त्याप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करण्यात आला. मात्र, या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानले गेले आहे. 

भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच श्रीगणेश चतुर्थीला कलंक चतुर्थी असेही म्हटले जाते. या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानले गेले आहे. गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन घडल्यास चोरीचा आळ येतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. विष्णु पुराणातील एका उल्लेखानुसार, श्रीकृष्णांना एकदा गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन घडले होते. त्यानंतर स्यमंतक मणी चोरल्याचा आरोप झाला श्रीकृष्णांवर झाला होता. या दिवशी चंद्रदर्शन का निषिद्ध मानले जाते? चुकून वा अनावधानाने चंद्रदर्शन झाल्यास काय करावे? यावर उपाय काय? जाणून घेऊया...

चंद्राचे उपहासाने हसणे गणपतीला रुचले नाही

एका पौराणिक कथेनुसार, गणपती मूषकासह कैलासावर फेरफटका मारत होते. नुकतेच जेवण झाल्यामुळे गणपतीचे उदर चांगलेच लंबोदर दिसत होते. बालगणेशाच्या त्या रुपाला पाहून चंद्राला आपले हसू आवरले नाही आणि तो जोरजोराने हसू लागला. मूषकासोबत जात असताना चंद्राने असे उपहासाने हसणे गणपतीला अजिबात रुचले नाही. त्यांनी याबद्दल चंद्राला जाब विचारला. मात्र, चंद्राचे हसणे थांबले नाही. शेवटी गणपतीला राग अनावर झाला. चंद्रदेव, तुम्हाला तुमच्या रुपावर फार गर्व आणि अहंकार आहे ना. यापुढे तुमचे तोंड कोणीही पाहणार नाही. जो कोणी पाहील त्यावर खोटा आळ येईल, असा शाप दिला. पाहता पाहता एकेक दिवस चंद्राचा क्षय होऊ लागला. चंद्र भयभीत झाले. शेवटी ते महादेवांना शरण गेले.

शेवटी गणपतीने चंद्राला शापमुक्त केले

चंद्राने महादेव शिवशंकरांची कठोर तपश्चर्या केली. चंद्रदेवाला महादेवांनी अभय दिले आणि आपल्या मुकुटावर धारण केले. चंद्राच्या प्रार्थनेवरून महादेव ज्योतिर्लिंग स्वरुपात प्रकट झाले आणि सोमनाथ नावांनी प्रसिद्ध झाले. महादेवासह सर्व देवतांनी गणपतीला खूप समजावेल. शेवटी गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. परंतु, भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहील, त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल, असे स्पष्टपणे सांगितले.

चुकून वा अनावधानाने चंद्रदर्शन झाल्यास काय करावे?

भाद्रपद चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी चुकून वा अनावधानाने चंद्रदर्शन झाल्यास घाबरून जाण्याचे कारण नाही. चुकून चंद्रदर्शन झालेल्यांनी संकष्ट चतुर्थी व्रत करावे. यथासांग, यथाशक्ती हे व्रत केल्यास खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन घडल्यामुळे श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता. श्रीकृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे तो आळ गेला, अशी एक कथा सांगितली जाते.

दरम्यान, गणेश चतुर्थीच्या दिवशी जर चंद्र पाहिला तर चोरीचा आळ येतो ही चुकीची समजूत आहे. चंद्रदर्शनाचा आणि चोरीचा आळ येण्याचा काहीही संबंध नाही, असे तज्ज्ञ सांगतात. मात्र, गणेश चतुर्थीच्या दिवशी चुकून वा अनावधानाने चंद्रदर्शन झाल्यास, “सिंहःप्रसेनमवधीत्, सिंहो जाम्बवता हतः। सुकुमारक मा रोदीस्तव, ह्येष स्यमन्तकः।।”, सदर मंत्राचा २८, ५४ किंवा १०८ वेळा जप करावा. तसेच श्रीमद्भागवताच्या दहाव्या स्कंदातील ५७ वा अध्याय पाठ केल्यानेही चंद्रदोष नाहीसा होतो, असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे संकष्ट चतुर्थीचे व्रत आचरावे. गणपती विघ्नहर्ता, तापहीन मानला जातो. त्यामुळे मनापासून आणि प्रामाणिकपणे केलेली गणेश उपासना लाभदायक ठरते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
 

Web Title: ganesh chaturthi 2023 why moon sighting is inauspicious on ganesh chaturthi and know remedies and mythological stories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.