गणेश चतुर्थी: घरात गणपती असेपर्यंत दररोज बाप्पाची पूजा कशी करावी? पाहा, महत्त्वाचे नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 04:03 PM2024-09-04T16:03:58+5:302024-09-04T16:11:18+5:30
Ganesh Chaturthi 2024: तुमच्याकडे किती दिवस गणपती असतो? दररोज गणपतीचे पूजन कसे करावे? जाणून घ्या...
Ganesh Chaturthi 2024: आता अगदी काही तासांवर गणरायाचे आगमन येऊन ठेपले आहे. आनंद, उत्साह आणि तयारीची लगबग शिगेला पोहोचलेली पाहायला मिळत आहे. घराची स्वच्छता, डेकोरेशन यासाठी मेहनत, कष्ट घेतले जात आहेत. घरी येणाऱ्या गणपती बाप्पाासाठी सर्वोत्तम आणि सर्वोच्च देण्यासाठी मंडळी प्रयत्नशील आहेत. बाप्पाचे काही राहता कामा नये, काही कमी पडू नये, यासाठी याद्या निश्चित केल्या जात आहेत. कोट्यवधी घरांमध्ये श्रीगणेश चतुर्थीला पार्थिव गणपतीची स्थापना केली जाते. परंतु, पार्थिव गणेशाचे पूजन झाल्यानंतर गणपती असेपर्यंत दररोज न चुकता गणपती बाप्पाची पूजा होणे महत्त्वाचे असते.
श्रीगणेश चतुर्थीला पार्थिव गणपती मूर्ती आणून त्याचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे प्रचलित आहे. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, दहा दिवस अशी गणपती सेवा केली जाते. गणपती आणल्या जाणाऱ्या प्रत्येक घरात आपापले रितीरिवाज, कुळाचार, कुळधर्म, परंपरा यांनुसार गणपती आणून त्याचे पूजन केले जाते. परंतु, केवळ पहिल्या दिवशी पार्थिव गणपती पूजन केले म्हणजे झाले असे नाही. तर मंडळे असो किंवा घरचा गणपती असो. जितके दिवस गणपती आहे, तितके दिवस गणपतीची सकाळी आणि सायंकाळी शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा होणे आवश्यक आहे, असे सांगितले जाते.
घरात गणपती असेपर्यंत दररोज बाप्पाची पूजा कशी करावी?
पार्थिव गणपती पूजा झाल्यानंतर त्या दिवशी सायंकाळी अनावश्यक गोष्टी बाजूला करून ठेवाव्यात. फुले, दुर्वा, धूप, दीप आणि नैवेद्य दाखवावा. आप्तेष्टांसह आरती करावी. मंडळांचा गणपती असेल तर आरती अधिक उशिरा घेऊ नये. दीड दिवसांचा गणपती असतो, अशा घरी अधिक वेळ आरती केली जाते. परंतु, अधिक रात्री उशिरा आरती करू नये. रात्री झोपण्यापूर्वी गणपतीच्या आजूबाजूची जागा अगदी स्वच्छ करून ठेवावी. शक्य असेल तर भजन, गीत-संगीत-वादन करून जागरण करावे. रात्री झोपण्यापूर्वी गणपतीला मनोभावे नमस्कार करावा. पार्थना करावी. दिवसभरात जी सेवा झाली, त्याबाबत कृतज्ञता व्यक्त करावी आणि अनावधानाने काही चूक झाली असेल, तर त्याबाबत क्षमयाचना करावी.
दररोज सकाळी षोडषोपचार पूजन करावे
दुसऱ्या दिवसापासून दररोज सकाळची पूजा लवकर करावी. षोडषोपचार पद्धतीने पूजन करावे. षोडषोपचार पद्धतीने पूजन करणे शक्य नसल्यास पंचोपचार पद्धतीने पूजन करावे. पूजा झाल्यावर विविध गणेशस्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, गणेश सहस्रनामावली म्हणावी. तसेच गणपतीच्या मंत्रांचा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा. मुलांनाही स्तोत्रे शिकवावीत. दुर्वा निवडण्यास शिकवावे. फुले आणि पत्री यांची माहिती द्यावी. नैवेद्याला दाखवले जाणारे मोदक, त्याची माहिती आणि ते कसे बनवायचे याबाबत मुलांना सांगावे. शक्य असेल तर एखाद-दोन मोदक मुलांकडून करून घ्यावेत. म्हणजे आपणही बाप्पाची काही सेवा केल्याचे समाधान त्यांना मिळेल.
'या' गोष्टी अवश्य कराव्यात
- घरात गणपती असेपर्यंत न चुकता प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी पंचोपचार पूजा करावी.
- गणेशमूर्तीसमोरचा भाग नेहमी स्वच्छ ठेवावा.
- फळे आणि नैवेद्य वेळोवेळी काढून घ्यावा.
- प्रसादाचे सर्वांना वाटप करावे.
- फळांची आणि पेढे इत्यादींची योग्य व्यवस्था करावी.
- पूजेतील फुले ताजी, स्वच्छ आणि नेटनेटकी असावी. अशीच फुले बाप्पाच्या पूजनात वापरावीत.
- घरातील वातावरण अगदी आनंदी, सकारात्मक असावे.
- गणपती बाप्पाची कृपा राहावी, यासाठी अनन्य साधारण भावाने सेवा करावी. आपल्याकडून कोणतीही कमतरता राहणार नाही, याची पूरेपूर काळजी घ्यावी.
- अनावधानाने काही चूक झाल्यास मनापासून क्षमायाचना करावी.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...!!!