रस्त्यावर उतरून डीजे बंद करायला लावणाऱ्या खासदार मेधा कुलकर्णींची गणेश मंडळांना साद; म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 02:01 PM2024-09-04T14:01:55+5:302024-09-04T14:03:25+5:30
Ganesh Chaturthi 2024: येत्या ७ सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरु होत होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी शेअर केला एक व्हिडीओ!
पुण्याच्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी ३ सप्टेंबर रोजी त्यांच्या सोशल मीडिया हॅन्डलवर एक व्हिडीओ शेअर केला, त्यात त्यांनी गणेश मंडळांना उद्देशून आवाहन केले आहे. त्यात त्या म्हणाल्या, 'आपल्याला खूप मोठा आवाज दीर्घ काळासाठी ऐकावा लागला तर त्रास होतो. त्या आवाजाने आपल्या वसाहतीतील ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, आजारी व्यक्तींच्या हृदयाची धडधड वाढते, तब्येत आणखी बिघडते. या सर्वांची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. सर्व गणेश मंडळांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी आवाजाची मर्यादा पाळावी आणि उत्सवासाठी गाण्यांची डोळसपणे निवड करावी. मोजक्या पारंपरिक वाद्यांची निवड करून हा उत्सव साजरा करावा.' त्यांच्या या व्हिडीओवर नागरिकांनी सहमती दर्शवली आहे, तसेच कायदा कडक करण्याचेही सुचवले आहे.
गणेशोत्सवाप्रमाणेच चार महिन्यांपूर्वी रामनवमी उत्सवाच्या वेळी मेधा कुलकर्णी यांनी पुण्यातील MIT कॉलेजच्या परिसरात ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा अधोरेखित केला होता. उत्सवाच्या नावावर कानठळ्या बसवणारे डीजे आणि अश्लील गाणी, लेझर शो यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी मेधा कुलकर्णी यांना बोलावून घेतले. तेव्हा हा उत्सव करणाऱ्या तरुणांशी चर्चा केली आणि डीजे बंद करण्यास भाग पाडले. तेव्हा बहुजन समाजाला रामाची आरती करू दिली नाही, असे म्हणत त्यांच्यावर आयोजकांनी आरोप केले. त्या आरोपांचे खंडन करण्यासाठी सोशल मीडियाचाच आधार घेत मेधा कुलकर्णी यांनी सदर परिस्थिती पुराव्यासहित कथन केली आणि त्या व्हिडीओमधून इशारा दिला, ' हिंदूंचा सण उत्साहाने साजरा झालाच पाहिजे, त्याचबरोबर तो सभ्यतेने झाला पाहिजे. जर कोणी उत्सवाच्या नावावर धांगडधिंगा करत असेल, अश्लील गाणी लावत असेल तर आम्ही विरोध करणार.'
गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडली, असे नागरिकांकडून म्हटले जात असले. तरीदेखील त्यांनी घातलेली साद किती मंडळांपर्यंत पोहोचते आणि किती मंडळांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांना कळकळीचे विनम्र आवाहन 🚩#ganeshfestival#ganeshotsav#hindu#hindufestivalpic.twitter.com/LpQRFZr1x2
— Dr. Medha Kulkarni (@Medha_kulkarni) September 3, 2024