गणेश चतुर्थी: अत्यंत प्रभावी ‘अथर्वशीर्ष’ म्हणा, बाप्पाची अपार कृपा मिळवा; पण ‘हे’ नियम पाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 07:07 AM2024-09-07T07:07:07+5:302024-09-07T07:07:07+5:30

Ganesh Chaturthi 2024 Ganapati Atharvashirsha: गणेशोत्सवात प्रभावी मानले गेलेले गणपती अथर्वशीर्ष आवर्जून म्हणावे. याचे अनेक लाभ सांगितले गेले आहेत. नेमके कोणते नियम पाळायला हवेत? जाणून घ्या...

ganesh chaturthi 2024 recite the most impactful ganapati atharvashirsha and should follow these 10 rules before chanting | गणेश चतुर्थी: अत्यंत प्रभावी ‘अथर्वशीर्ष’ म्हणा, बाप्पाची अपार कृपा मिळवा; पण ‘हे’ नियम पाळा

गणेश चतुर्थी: अत्यंत प्रभावी ‘अथर्वशीर्ष’ म्हणा, बाप्पाची अपार कृपा मिळवा; पण ‘हे’ नियम पाळा

Ganesh Chaturthi 2024 Ganapati Atharvashirsha: घरोघरी गणरायाची स्थापना होत आहे. पार्थिव गणपती पूजन झाल्यानंतर घराघरात अगदी चैतन्य, उत्साहाचे वातावरण असणार आहेत. मंडळांच्या गणपतीत गेले अनेक दिवस घेतलेल्या मेहनतीचे साकार स्वरुप पाहताना समाधानाची भावना असणार आहे. १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती गणपती बुद्धिदाता प्रथमेश आहे. गणेशोत्सव काळात गणपती पूजनासह विविध प्रकारची स्तोत्रे म्हटली जातात. श्रवण केली जातात. त्यापैकी सर्वांत प्रभावी मानले गेलेले स्तोत्र म्हणजे ‘गणपती अथर्वशीर्ष’.

प्रथमेश असलेल्या गणरायाची काही मंत्र अतिशय प्रभावी मानले गेले आहेत. मराठी वर्षात गणपतीच्या तीन अवतार साजरे केले जातात. त्यापैकी भाद्रपदात येणाऱ्या गणेश चतुर्थी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. कोट्यवधी घरांत, हजारो मंडळांमध्ये गणपती विराजमान होतो. पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती मंडळातर्फे दरवर्षी हजारो भाविक एकत्र जमून सामूहिक ‘गणपती अथर्वशीर्ष’ पठण करतात. गणपती अथर्वशीर्ष हे सर्वाधिक प्रभावी मानले जाते. काही घरांमध्ये नियमितपणे पठण केले जाते. असे असले तरी गणेश चतुर्थीला किंवा गणेशोत्सवात ‘गणपती अथर्वशीर्ष’ आवर्जून म्हणावे, असे सांगितले जाते. गणपती अथर्वशीर्ष म्हणताना काही गोष्टींचे भान ठेवावे लागते. काही नियम पाळावे लागतात. नियम पाळून केलेली उपासना अधिक लवकर फलद्रुप ठरू शकते, असे सांगितले जाते.

गणपती म्हणजेच परब्रह्म होय

अथर्वशीर्ष हे गणक ऋषी यांनी लिहिले आहे. गणेशाच्या उपासकांमध्ये या स्तोत्राला अनन्य साधारण विशेष महत्व आहे. अथर्वशीर्ष हे एक उपनिषद आहे. ते अथर्ववेदाशी संबंधित आहे. यामध्ये गणेशविद्या सांगितलेली आहे. या स्तोत्रात गणरायाच्या अमूर्त स्वरूपाचे वर्णन केले आहे. यात प्रथम गणपतीच्या सगुणब्रह्माची उपासना सांगून शेवटी गणपती म्हणजेच परब्रह्म होय, असे म्हटले आहे. गणेशाचे स्वरूप मर्यादित नाही, तर तो चराचरात, कणाकणात सामावला आहे. थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर. शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते, असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय, असा याचा अर्थ लावला जातो. 

गणपती अथर्वशीर्षाचे एक हजार वेळा पठण केल्यास मनोकामना पूर्ति

गणपती अथर्वशीर्षाचे एक हजार वेळा पठण केल्याने जे हवे ते प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता प्रचलित असल्याचे सांगितले जाते. गणपती बाप्पा आपल्या सदा सर्वदा सन्निध असतो. त्याची प्रार्थना करणारे हे स्तोत्र आपल्याला आत्मरुपाची प्रचिती देणारे आहे. गणपती हा तीन देहांच्या पलीकडचा असला, तरी "गं" हे त्याचे तांत्रिक शरीर आहे आणि तोच त्याचा महामंत्रही आहे. गणपती हा विश्वाचा आधार असून, तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे. व्रातपती, शिवाच्या गणांचा अधिपती असा असलेल्या गणपतीला यामध्ये नमस्कार केलेला आहे. यानंतर याची फलश्रुती सांगितलेली आहे.

गणपती अथर्वशीर्ष म्हणताना हे नियम पाळाच

- गणपती अथर्वशीर्ष म्हणताना उच्चार अगदी स्पष्ट असावे.

- अथर्वशीर्ष अगदी संथपणे एका गतीत म्हणावे.

- अथर्वशीर्ष पठण भावपूर्वक म्हणजे त्याचा अर्थ समजून केले पाहिजे.

- देवासमोर बसून एक तल्लीन होऊन हे स्तोत्र म्हटले किंवा ऐकले पाहिजे. 

- पूर्व दिशेला सुखासनात अर्थात मांडी घालून आसनावर बसून हे स्तोत्र म्हणावे. 

- स्तोत्र म्हणताना इतर गोष्टी बोलू नयेत.

- स्तोत्राचे पावित्र्य जपण्यासाठी शुचिर्भूतता पाळावी.

- अथर्वशीर्षाचा पठण करताना धूतवस्त्राची घडी, मृगाजिन, धाबळी किंवा दर्भाची चटई यांचा उपयोग करावा. 

- गणेशाची पूजा करून त्याला वंदन करून स्तोत्र पठणाला सुरुवात करावी. 

- पूजा करणे शक्य नसल्यास गणपतीचे मनोभावे ध्यान, स्मरण करावे, नमस्कार करावा.

- अथर्वशीर्षाच्या आधी देण्यात आलेला शांतीमंत्र प्रत्येक पठणापूर्वी न म्हणता सुरुवातीस एकदाच म्हणावा.

- एकापेक्षा अधिक वेळा अथर्वशीर्ष म्हणावयाचे असेल, तेव्हा 'वरदमूर्तये नमः।' येथेपर्यंतच म्हणावे. त्यापुढे फलश्रुती देण्यात आली असून, ती शेवटच्या आवर्तनानंतर म्हणावी.

- अथर्वशीर्षाची एकवीस आवृत्ती म्हणजे एक अभिषेक होय.

- सहस्त्र आवर्तने शक्य नसतील तर ३,७,९,११, २१ वेळा आवर्तने करावीत. मात्र जेवढे म्हणाल तेवढे मनापासून म्हणा, तरच लाभ होईल.   

- गणपती अथर्वशीर्ष पाठ नसेल तर श्रवण करावे. मात्र, डोळ्यासमोर स्तोत्राचे शब्द ठेवावे. जेणेकरून मन भटकणार नाही आणि उद्देश पूर्ण होईल. 

॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥
 

Web Title: ganesh chaturthi 2024 recite the most impactful ganapati atharvashirsha and should follow these 10 rules before chanting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.