गणेश चतुर्थी: केवळ सुखकर्ता दुःखहर्ता नाही, यंदा गणेशोत्सवात आवर्जून म्हणा ‘या’ गणपती आरत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 06:09 PM2024-09-06T18:09:46+5:302024-09-06T18:12:27+5:30

Ganesh Chaturthi 2024: गणपतीत आरत्या म्हणणे हा आनंद सोहळा असतो. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत तल्लीन होऊन तास तासभर आरत्या करतात.

ganesh chaturthi 2024 recite this ganpati aarti during ganesh utsav | गणेश चतुर्थी: केवळ सुखकर्ता दुःखहर्ता नाही, यंदा गणेशोत्सवात आवर्जून म्हणा ‘या’ गणपती आरत्या

गणेश चतुर्थी: केवळ सुखकर्ता दुःखहर्ता नाही, यंदा गणेशोत्सवात आवर्जून म्हणा ‘या’ गणपती आरत्या

Ganesh Chaturthi 2024: शनिवार, ०७ सप्टेंबर २०२४ रोजी गणेश चतुर्थी आहे. या दिवशी घरोघरी, मंडळांमध्ये गणरायाची स्थापना होऊन पुढे १० दिवस गणेशोत्सव साजरा केला जाईल. गणेश चतुर्थीला गणपतीची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. श्रीगजानन हे विद्येचे दैवत आहे. त्यामुळे विद्येचे उपासक, साहित्यिक, लेखक अशा अनेकांनी गजाननाची स्तुतिस्त्रोत्रे मनापासून गायली आहेत. गणपतीच्या आरत्या तर अगणित आहेत. गणपतीचे गुणवर्णन करताना त्याच्या भक्तांना शब्दांची उणीव कधीच भासत नाही. 

गणपती पूजनानंतर सर्वांच्या आवडीचा भाग म्हणजे मोठ्या आवाजात, मनापासून गणपतीच्या आरत्या म्हणणे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ माणसापर्यंत अगदी तल्लीन होऊन गणपतीच्या आरत्या म्हणतात. दुपारी आणि सायंकाळी आवर्जून गणपतीची आरती केली जाते. गणपती विसर्जनाच्या दिवशी विशेष आरती केली जाते. अनेक ठिकाणी अनेक तास आरत्या चालतात. सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती आपण म्हणतोच, त्याशिवाय आणखीही काही गणपतीच्या प्रचलित आरत्या आहेत, त्याही आवर्जून म्हणाव्यात.

सुखकर्ता दुःखहर्ता

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥

जय देव, जय देव जय मंगलमूर्ती। दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुमकुम केशरा ।।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ॥२॥ ॥ जय देव जय देव०॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।।
दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना ॥३॥ ॥ जय देव जय देव०॥

नाना परिमळ दूर्वा शेंदूर शमिपत्रें

नाना परिमळ दूर्वा शेंदूर शमिपत्रें । लाडू मोद्क अन्ने परिपूरित पात्रें ।।
ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे । अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें ।। १ ।।

जय देव जय देव जय मंगलमूर्ती । तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ।। ध्रु० ।।

तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती । त्यांची सकलही पापे विघ्नेंही हरती ।।

वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती । सर्वहि पावती अंती भवसागर तरती ।। २ ।। ॥ जय देव जय देव०॥

शरणांगत सर्वस्वें भजती तव चरणी । कीर्ती तयांची राहे जोवर शशितरणि ।।
त्रैलोक्यी ते विजयी अदभूत हे करणी । गोसावीनंदन रत नामस्मरणी ।। ३ ।। ॥ जय देव जय देव०॥

शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको 

शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको । दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहरको ।

हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवरको । महिमा कहे न जाय लागत हूं पादको ॥१॥

जय जय श्री गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता, जय देव जय देव ॥ध्रु०॥

अष्टौ सिद्धि दासी संकटको बैरि । विघ्नविनाशन मंगल मूरत अधिकारी ।

कोटीसूरजप्रकाश ऐबी छबि तेरी । गंडस्थलमदमस्तक झूले शशिबिहारि ॥२॥ ॥ जय देव जय देव०॥

भावभगत से कोई शरणागत आवे । संतत संपत सबही भरपूर पावे ।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे । गोसावीनंदन निशिदिन गुन गावे ॥३॥ ॥ जय देव जय देव०॥

गणपतीपुळेची प्रसिद्ध आरती

आरती सुंदर वदनाची । गिरिजा शशिघर तनयाची ।
स्वयंभू पश्चिम दिग्विसी । प्रकटला भक्त रक्षणासी ।
सन्मुख सागर समदृष्टी । शोभतो हरित गिरिपृष्टी ।
विराजे सिंदुर सर्वांगा । वाहते सव्य नाभीगंगा ।
वर्णु काय तीर्थ महिमा ऽऽऽ ।

स्थान हे पुलिन, असे जरी विजन, निवासे परम कृपेने पावन ते जाणिले ।
त्रिभूवनी क्षेत्र धन्य झाले । देखता मूर्ती गणेशाची । होईना तृप्ती नयनांची ।
आरती सुंदर वदनाची । गिरिजा शशिघर तनयाची ।
जय जय सुमुख एकदंता । वरदा ऋद्धिसिद्धीकांता ।
जपता द्वादश नामांसी । कामना सिद्धी पदा नेसी।
शोभवी प्रणव रुप वदना । क्षाळितो तीर्थराज चरणां।
अहा ती अस्तसमय शोभाऽऽऽ ।

पूजितो तरणी। स्वर्णमय किरणी । निनदे गगनी । गर्जना मंद अंबुधीची । चालते दिव्य दुंदुभीची ।
आरती सुंदर वदनाची । गिरिजा शशिघर तनयाची ॥2॥
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला । भक्तगण येत दर्शनाला ।
उगवता धन्य माघमास । लागते रीघ यात्रिकांस ।
सकलजन नारी-नर येती । दर्शने पाप मुक्त होती ।
काय तो यात्रेचा दिवस ऽऽऽ ।

मिळेना वाट, उसळली लाट, स्वारीचा थाट, दाटते गर्दी भाविकांची । पालखी निघे मोरयाची ।
आरती गाऊनी सदभावे । त्रिविक्रम शांतिसुखा पावे ।
आस ही पुरवी दासाची । भक्ती दे अखंड चरणाची ।
आरती सुंदर वदनाची । गिरिजा शशिघर तनयाची ।

जय देव जय देव जय मोरेश्वरा

वेदशास्त्रांमाजी तूं मंगलमूर्ती। अगणित महिमा तुझा कल्याण स्फूर्ती॥
भक्तांलागी देसी विद्या अभिमत ती। मोरेश्वर नाम तुझे प्रसिद्ध या जगती ॥१॥

जय देव जय देव जय मोरेश्वरा। तुझा न कळे पार शेषा फणिवरा ॥ध्रु०॥

पुळ्यापश्ये नांदे महागणपती। माघ चतुर्थीला जनयात्रे येती।।
जें जें इच्छिति तें तें सर्वही पावती। गणराजा मज बाळा द्यावी अभिमती ॥२॥ ॥ जय देव जय देव०॥

एकवीस दुर्वांकुरा नित्ये नेमेसी। आणूनि जे अर्पिती गणराजयासी॥
त्याचे तू भवबंधन देवा चुकविसी। विठ्ठलसुत हा ध्यातो तुझिया चरणासी॥ जय देव जय देव जय मोरेश्वरा॥३॥ ॥ जय देव जय देव०॥

प्रार्थना

घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।
प्रेमें आलिंगीन आनंद पूजन । भावे ओवाळिन म्हणे नामा ।।

त्वमेव माता पिता त्वमेव । त्वमेव बन्धु: सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देवदेव ।।

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा । बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् ।
करमि यद्यत् सकलं परस्मै । नारायणायेती समर्पयामि ।।

अच्युतं केशवं राम नारायणम् कृष्णदामोदरं वासुदेवं भजे।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम् जानकीनायकं रामचंद्र भजे ।।

हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।

।। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ।।

 

Web Title: ganesh chaturthi 2024 recite this ganpati aarti during ganesh utsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.